भूतकाळ आणि भविष्‍यकाळ यांच्‍या क्रियापदांचा अन्‍य काळांत केला जाणारा वापर

सनातनचे संस्‍कृतवर आधारलेले नाविन्‍यपूर्ण मराठी व्‍याकरण !

‘संस्‍कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्‍याकरण शिकण्‍यासाठी संस्‍कृतचे व्‍याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत.

३० जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘वर्तमानकाळाची क्रियापदे’ अन्‍य निरनिराळ्‍या काळांत कशी वापरली जातात ?’, याविषयी जाणून घेतले. आजच्‍या लेखात भूतकाळ आणि भविष्‍यकाळ यांतील क्रियापदांचा अशाच प्रकारचा वैशिष्‍ट्यपूर्ण वापर समजून घेऊ.         

(लेखांक १९ – भाग ४)

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/696989.html

मराठी भाषेचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे, ‘एका काळाचे क्रियापद अन्‍य काळांतही वापरले जाते.’ भाषेमध्‍ये शेकडो वर्षांच्‍या कालावधीत ही पद्धत रूढ झाली आहे. या लेखात भूतकाळ आणि भविष्‍यकाळ यांच्‍या क्रियापदांचा अन्‍य काळांतील वापर याची काही उदाहरणे दिली आहेत.

६. भूतकाळाची क्रियापदे

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

६ अ. जवळचा भविष्‍यकाळ (संनिहित भविष्‍यकाळ) दर्शवणे : ‘एवढा खिळा ठोकला की, काम पूर्ण झाले’, या वाक्‍यातील ‘झाले’ हे क्रियापद भूतकाळाचे आहे. हे वाक्‍य ‘एवढा खिळा ठोकला की, काम पूर्ण होईल’, असेही लिहिता येते. यात ‘होईल’ हे भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरता येते. प्रत्‍यक्षातही ‘एवढा खिळा ठोकला की, काम पूर्ण झाले’, या वाक्‍याद्वारे लिहिणार्‍याला ‘…..काम पूर्ण होईल’, असा भविष्‍यकाळच दर्शवायचा आहे; परंतु त्‍याने ‘होईल’ हे भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरण्‍याऐवजी ‘झाले’ हे भूतकाळाचे क्रियापद वापरण्‍याचा पर्याय निवडला आहे आणि तो योग्‍य आहे. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. तू जेवणाची सिद्धता कर, मी आलोच.

२. आजची चित्रकलेची परीक्षा झाली की, वार्षिक परीक्षा संपली.

६ आ. ‘एखादी गोष्‍ट भविष्‍यकाळात निश्‍चितपणे होणार आहे’, असे दर्शवणे (निःसंशय भविष्‍यकाळ) : ‘आता खोडी काढलीस, तर ‘मी बाईंकडे तक्रार केलीच’ असे समज’, या वाक्‍यात ‘केलीच’ हे भूतकाळाचे क्रियापद आहे. या वाक्‍यातील खोडी काढण्‍याचा शेवटचा प्रसंग अजून घडायचा आहे. ‘तो घडल्‍यानंतर मी बाईंकडे तक्रार करणार आहे.’ पूर्णतः भविष्‍यकाळातील या प्रसंगात क्रियापद मात्र ‘केलीच’ असे भूतकाळाचे वापरलेले आहे.

हे वाक्‍य भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरून लिहायचे असल्‍यास ‘आता खोडी काढलीस, तर मी बाईंकडे तक्रार करीन’, असे लिहिता येते. यात ‘केलीच’च्‍या जागी ‘करीन’ हे भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरता येते; परंतु पहिल्‍या मूळ वाक्‍यातील बाईंचा धाक दाखवतांना जो निश्‍चय जाणवतो, तो भविष्‍यकाळाच्‍या क्रियापदाच्‍या दुसर्‍या वाक्‍यात जाणवत नाही. त्‍यामुळे भूतकाळाचे क्रियापद असलेले वाक्‍यच अधिक परिणामकारक ठरते. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. आम्‍ही जरा निवांत बसलो की, मामींनी येऊन काहीतरी काम सांगितलेच समज !

२. रमाकांत आपल्‍या गटात आला, तर आपण जिंकलोच समज !

६ इ. वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया दर्शवणे : ‘लालू, ते पहा तुझे काका आले’, या वाक्‍यातील ‘आले’ हे क्रियापद भूतकाळाचे आहे; परंतु प्रत्‍यक्ष प्रसंगात काकांची येण्‍याची क्रिया पूर्ण झालेली नाही. ते अजून येत आहेत. ‘आले’ या क्रियापदाद्वारे ‘येत आहेत’, हा वर्तमानकाळातील अर्थ बोलणार्‍या व्‍यक्‍तीला सुचवायचा आहे. अशा प्रकारे वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया दर्शवण्‍यासाठीही भूतकाळातील क्रियापदाचा वापर केला जातो. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. ती पहा नवर्‍या मुलाची वरात पोचलीसुद्धा.

२. तो बघ वल्लभ नवीन कपडे घालून आला.

६ ई. इच्‍छा व्‍यक्‍त करणे : ‘मला तुझ्‍याशी थोडे बोलायचे होते’, हे वाक्‍य उच्‍चारणार्‍या व्‍यक्‍तीला खरेतर समोरच्‍या व्‍यक्‍तीशी बोलायचे आहे. ती बोलण्‍यासाठीच आली आहे; परंतु तिने ‘मला तुझ्‍याशी थोडे बोलायचे आहे’, असे वर्तमानकाळातील वाक्‍य उच्‍चारलेले नाही. त्‍याऐवजी ‘….बोलायचे होते’, अशी भूतकाळातील वाक्‍यरचना वापरली आहे. अशी वाक्‍यरचना भाषेत अनेकदा वापरल्‍याचे आढळते. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. मला जरा तुझे साहाय्‍य हवे होते.

२. मला थोड्या वेळापुरती तुझी गाडी हवी होती.

७. भविष्‍यकाळाची क्रियापदे

७ अ. ‘एखादी गोष्‍ट अशक्‍य आहे’, हे दर्शवणे : ‘सगळेच खोटे कसे बोलतील ?’, या वाक्‍यात ‘बोलतील’ हे भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरण्‍यात आले आहे; परंतु वाक्‍यातील जे कुणी जे काही बोलले आहेत, ते त्‍यांचे बोलून झाले आहे. म्‍हणजे त्‍यांची बोलण्‍याची क्रिया भूतकाळात गेली आहे. तरीही ‘त्‍यांचे बोलणे खोटे असणे अशक्‍य आहे’, हे सांगण्‍यासाठी ‘बोलतील’ हे भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरण्‍यात आले आहे.

या वाक्‍याची रचना ‘सगळेच खोटे कसे बोलले ?’, अशी ‘बोलले’ हे भूतकाळाचे क्रियापद वापरून केली, तर वाक्‍याचा अर्थच पालटून जातो. ‘सगळे खोटेच बोलले आहेत’, असा त्‍याचा अर्थ होतो. अशा स्‍थितीत ‘भूतकाळातील प्रसंग चुकीचा असणे अशक्‍य आहे’, हे दर्शवण्‍यासाठी भविष्‍यकाळाचे क्रियापद वापरणे उपयुक्‍त ठरते. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. सगळ्‍यांचीच उत्तरे कशी चुकतील ?

२. सगळेच अयोग्‍य सल्ला कसा देतील ?

७ आ. एखादी गोष्‍ट घडली असण्‍याचा संभव असणे : ‘निरंजन संगणक शिकायला गेला असेल’, हे वाक्‍य उच्‍चारणार्‍या व्‍यक्‍तीला ‘निरंजन संगणक शिकायलाच गेला आहे’, याविषयी निश्‍चिती नाही. तिने एक शक्‍यता वर्तवली आहे. ती वर्तवतांना ‘असेल’ यासारखे भविष्‍यकाळातील क्रियापद वापरले आहे. अशा प्रकारे एखादी शक्‍यता वर्तवतांना भविष्‍यकाळातील क्रियापद वापरले जाते. याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. भारती तिच्‍या खोलीत असेल.

२. शीला मैत्रिणीकडे गेली असेल.’

(समाप्‍त)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२३)