विविध ‘काळां’मधील क्रियापदांचे भाषेतील वैशिष्‍ट्यपूर्ण वापर

सनातनचे संस्‍कृतवर आधारलेले नाविन्‍यपूर्ण मराठी व्‍याकरण !

‘संस्‍कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्‍याकरण शिकण्‍यासाठी संस्‍कृतचे व्‍याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत.

२३ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘काळा’च्‍या ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’ या उपप्रकारांची माहिती घेतली. आजच्‍या लेखात ‘वर्तमानकाळातील क्रियापदे भाषेत वेगवेगळ्‍या प्रकारे आणि निरनिराळ्‍या काळांत कशा पद्धतीने वापरली जातात ?’, याविषयी जाणून घेऊ.

(लेखांक १९ – भाग ३)

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/694989.html

मागील लेखांमध्‍ये आपण काळाचे प्रमुख तीन प्रकार, तसेच उपप्रकार यांची माहिती घेतली. त्‍या माहितीत दिलेल्‍या काळांच्‍या नियमानुसार ठरलेल्‍या क्रियापदांचा भाषेत वापर करतांना मात्र काही वेळा नियमांच्‍या चौकटी मोडल्‍या जातात, असे लक्षात येते. विविध काळांतील वाक्‍यरचनांमध्‍ये वेगवेगळ्‍या प्रकारे आणि अन्‍य काळांतीलही क्रियापदांचा उपयोग केल्‍याचे आढळते. याची सोदाहरण माहिती पुढे दिली आहे.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

५. वर्तमानकाळची क्रियापदे

५ अ. त्रिकालाबाधित सत्‍य (सर्व काळांमध्‍ये सत्‍य) असणार्‍या घटनांविषयी सांगणे : जगातील काही घटना सर्व काळांमध्‍ये सत्‍य असतात. त्‍या सर्व काळी एकाच पद्धतीने घडतात. त्‍यांत कधीही पालट होत नाही, उदा. ‘चंद्र पृथ्‍वीभोवती फिरतो.’ हे वाक्‍य त्रिकालाबाधित सत्‍य आहे. याविषयी कुणाच्‍याही मनात शंका येऊ शकत नाही, तसेच जगाच्‍या अंतापर्यंत या घटनेमध्‍ये पालट होऊ शकत नाही. अशा प्रकारची वाक्‍ये लिहितांना वर्तमानकाळी क्रियापदे वापरली जातात.

‘चंद्र पृथ्‍वीभोवती फिरतो’, या वाक्‍यातील ‘फिरतो’ हे क्रियापद एरव्‍ही साध्‍या वर्तमानकाळी वाक्‍यात वापरले जाते, उदा. ‘राजा उद्यानात फिरतो’; परंतु ‘राजाचे उद्यानात फिरणे’ हे काही काळापुरते मर्यादित आहे. चंद्राचे पृथ्‍वीभोवती फिरणे मात्र गत लक्षावधी वर्षांचे आहे आणि पुढील लक्षावधी वर्षे चालूच असणार आहे. असे असूनही दोन्‍ही वाक्‍यांसाठी ‘फिरतो’ हे एकच वर्तमानकाळी क्रियापद वापरण्‍यात आले आहे. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. सूर्य पश्‍चिमेला मावळतो.

२. पृथ्‍वी स्‍वतःभोवती फिरते.

५ आ. इतिहासात घडून गेलेली गोष्‍ट आता सांगणे : ‘महाराज विराट संतापून कंकाला (अज्ञातवासातील युधिष्‍ठिराला) सोंगटी फेकून मारतात’, या वाक्‍यात वर्णिलेली घटना सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेली आहे; पण वर्तमानकाळात ती सांगतांना ‘मारतात’ हे वर्तमानकाळातील क्रियापद वापरले आहे. हे वाक्‍य ‘महाराज विराट यांनी संतापून कंकाला (अज्ञातवासातील युधिष्‍ठिराला) सोंगटी फेकून मारली’, असे भूतकाळीही लिहिता येते; पण येथे ते वर्तमानकाळात लिहिले आहे. अशा प्रकारची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला भेटण्‍यास निघतात.

२. इंग्रज सुभाषचंद्र बोस यांना नजरकैदेत ठेवतात.

५ इ. जवळचा भविष्‍यकाळ (संनिहित भविष्‍यकाळ) दर्शवणे : ‘तू या परीक्षेत पहिला ये. मी तुला सायकल घेऊन देतो’, या वाक्‍यांतील ‘देतो’ हे क्रियापद वर्तमानकाळातील आहे. ‘मी तुला सायकल घेऊन देतो’, हे पूर्ण वाक्‍यच वर्तमानकाळातील आहे; पण त्‍याच्‍या आधीचे ‘तू या परीक्षेत पहिला ये’, हे वाक्‍य मुलासमोर जवळच्‍या भविष्‍यकाळातील ध्‍येय ठेवते. त्‍यामुळे ‘मी तुला सायकल घेऊन देतो’, हे वाक्‍यही भविष्‍यकाळातील झाले आहे. या वाक्‍यात भविष्‍यकाळातील क्रियापद वापरायचे असल्‍यास ‘देतो’च्‍या ऐवजी ‘देईन’ असे लिहावे लागेल; परंतु तसे लिहिलेले नाही. अशा प्रकारे जवळचा भविष्‍यकाळ दर्शवण्‍यासाठी वर्तमानकाळात क्रियापद वापरले जाते.  जवळच्‍या भविष्‍यकाळाला ‘संनिहित भविष्‍यकाळ’ असेही म्‍हणतात. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. मी शेवटचे गणित सोडवून येतो.

२. तुम्‍ही आधी खेळा. मग आम्‍ही खेळतो.

५ ई. जवळचा भूतकाळ (संनिहित भूतकाळ) दर्शवणे : ‘मी घरी पोचतो, तोच मित्र मागून आला’, या वाक्‍यात ‘पोचतो’ हे वर्तमानकाळातील क्रियापद आहे. हे वाक्‍य ‘मी घरी पोचलो, तोच मित्र मागून आला’, असेही लिहिता येते. यात ‘पोचलो’ हे भूतकाळाचे रूप वापरता येते. त्‍याचसह जवळचा भूतकाळ दर्शवण्‍यासाठी ‘पोचतोे’ हे वर्तमानकाळातील रूप वापरणेही योग्‍य ठरते.

१. मी जेवून उठतो, तोच भ्रमणभाष वाजला.

२. सर्व कामे आटोपून आडवा पडतो, एवढ्यात मोठा गलका ऐकू आला.

५ उ. पूर्वी होऊन गेलेले संत, लेखक, कवी इत्‍यादींचे विचार मांडणे : ‘संत तुकाराम महाराज म्‍हणतात, ‘सुंदर तें ध्‍यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥’ या वाक्‍यातील अभंगाची ओळ संत तुकाराम महाराज यांनी १७ व्‍या शतकात म्‍हटली आहे. त्‍यांची ती ओळ आज सांगतांना मात्र वाक्‍यात ‘म्‍हणतात’ हे वर्तमानकाळी क्रियापद वापरण्‍यात आले आहे.

५ ऊ. एखादी गोष्‍ट पुन्‍हा पुन्‍हा घडते, हे सांगणे : ‘हे तरुण नेहमी या कट्ट्यावर बसतात’, या वाक्‍यात ‘तरुणांचे कट्ट्यावर बसणे पुन्‍हा पुन्‍हा घडते’, हे सांगण्‍यासाठी ‘बसतात’ हे वर्तमानकाळातील क्रियापद वापरले आहे. ‘रीती वर्तमानकाळात’ही एखाद्या गोष्‍टीची किंवा व्‍यक्‍तीच्‍या एखाद्या कृतीची पुनरावृत्ती दर्शवलेली असते; मात्र त्‍यात वाक्‍याच्‍या शेवटी ‘अस’ या धातूचे क्रियापद वापरले जाते. वरील वाक्‍य ‘रीती वर्तमानकाळा’त लिहायचे असेल, तर ‘हे तरुण नेहमी या कट्ट्यावर बसत असतात’, या प्रकारे लिहिले जाते; परंतु या सूत्रातील मूळ उदाहरणात ‘बसतात’ हे साधे वर्तमानकाळी क्रियापद वापरले आहे. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. काका फिरायला गेल्‍यावर नेहमी फळांचा रस पितात.

२. मधुरा सतत संगीत ऐकते.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२३)