अज्ञानाने केलेले कर्म !

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

कर्म करतांना किंवा धर्मकृत्य करतांना धार्मिक मार्गदर्शन करतांना आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगावे आणि ते कर्म आपण करू नये अथवा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्याचा उपस्थितीत ते कर्म करावे. त्या विषयाचे सांगोपांग अध्ययन आणि नीट अभ्यास न करता केवळ वरवर वाचून पुस्तकात अथवा ग्रंथात दिले आहे, तेवढेच पाहून त्यात नको ती भर घालून स्वतःचे मत देणे, हे घातक ठरते.

अज्ञं कर्माणि लिम्पन्ति तज्ञं कर्म न लिम्पति ।
लिप्यते सर्पिषा हस्तो रसना न तु सा कदा ।।

– भर्तृहरी नीतिशतक

अज्ञ म्हणजे माहिती नसलेल्या व्यक्तीने एखादे कर्म केले, तर ते त्याला चिकटते त्याला बंधनकारक ठरते; (मराठीत ‘लिंपणे’ हा शब्द संस्कृतमधील आहे. मातीच्या भिंती लिंपतात वगैरे) पण तज्ञ व्यक्तीने ते केले, तर त्याला ते चिकटत नाही. त्याला त्यातून अलगद बाजूला कसे व्हावे, याचे रहस्य ज्ञात असते.

भर्तृहरी फार सुंदर उदाहरण देतांना सांगतो, ‘तूपाने हात लडबडतो, बरबटतो; पण हाताला तूपाची चव घेता येत नाही. त्याचे रसग्रहण करता येत नाही; म्हणून हात अज्ञ आहे; पण जिभेला तूपाचा स्वाद घेता येतो, त्याचा रसग्रहण करता येतो, आनंद घेता येतो आणि रसपान झाल्यावर व्यवस्थितपणे तूपाचा ओशटपणा किंवा चिकटपणा लाळेने कसा दूर करायचा, तेही ज्ञान असते. त्यामुळे जिव्हा (जीभ) ही तज्ञ आहे.

‘धर्मशास्त्र उपाय’ या संदर्भात मार्गदर्शन करतांना फार काळजी घेणे आवश्यक आहे. नाही तर उपायापेक्षा अपाय होण्याचा संभव अधिक असतो.

– वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग (१३.३.२५)