देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची जय्यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून सत्ताधारी (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) आणि विरोधक (संयुक्त पुरोगामी आघाडी) ‘आपापल्या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?’, याची चाचपणी करत आहेत. या दोन्ही आघाड्यांची अनुक्रमे देहली आणि बेंगळुरू येथे नुकतीच पार पडलेली बैठक, हा त्याचाच एक भाग होता. तथापि देशात चर्चा अधिक झाली ती संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकीची. यामागचे मुख्य कारण म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीचे केले गेलेले बारसे. यापुढे ही आघाडी ‘इंडिया’ या नावाने ओळखली जाईल. ‘INDIA’ या अक्षरांनुसार ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स’, असे तिचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणे, यात खरेतर चूक काहीच नाही; पण ‘इंडिया’च्या गोंडस नावाखाली एकत्र आलेल्यांच्या पक्षांचा उद्देशच ‘मोदी नको’ हा आहे. विद्वेषावर आधारित युती अनैसर्गिक असते आणि म्हणनूच ती कधीही फार काळ टिकू शकत नाही, हा इतिहास आहे. ‘इंडिया’ या आघाडीने आजपर्यंत कधीही ‘आम्ही जनतेला सुशासन देऊ’, ‘आम्ही विकास करू’, ‘आम्ही जनतेच्या समस्या सोडवू’, असे म्हटलेले नाही. त्यासाठी तिने कधी समान कृती कार्यक्रमही आखलेला नाही. या आघाडीतील सर्वांच्या तोंडी दोनच शब्द असतात, ते म्हणजे ‘मोदी नकोत.’ विरोधकांनी ‘मोदी नकोत’चा असाच अयशस्वी प्रयोग वर्ष २०१८ मध्येही याच बेंगळुरूमध्ये केला होता. तेव्हा कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने भाजपपेक्षा अल्प जागा मिळूनही जनता दल (सेक्युलर) या पक्षाला हाताशी धरून तेथे सरकार स्थापन केले होते. त्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत ती माळ कुमारस्वामी यांच्या गळ्यात घातली होती. या सरकारच्या शपथविधीच्या वेळी ‘इंडिया’ आघाडीतील हेच सर्व नेते, म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती आदींनी माध्यमांसमोर हात उंचावत ‘मोदी नकोत’चा संदेश दिला होता. तथापि वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने वर्ष २०१४ पेक्षा अधिक जागा जिंकल्या. याचा अर्थ नेत्यांच्या संख्येवर निवडणुकीचे निकाल लागत नसतात, तर ‘जनतेला तुमची कामे किती भावतात ?’, यावर गणिते ठरत असतात. त्यामुळे विरोधकांनी मोदीद्वेषाच्या सूत्रावर एकत्र येण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. भाजपच्या विरोधात दात-ओठ खाण्यापेक्षा समाजात ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी बाह्या सरसावल्या पाहिजेत. एकेकाळी या विरोधी पक्षांसाठी झटणारे प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही ‘केवळ नेते एकत्र आले; म्हणून बलशाही पक्षाला पराभूत करता येत नाही’, अशा शब्दांत विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत. या घरच्या अहेरावरून तरी विरोधकांनी शहाणे व्हायला नको का ?
नाव पालटण्याची वेळ का आली ?
देशात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’वर नामकरण करण्याची वेळ का आली ? किंवा त्यांनी आघाडीचे नाव का पालटले ? याविषयी जरी सर्वांनी मिठाची गुळणी धरली असली, तरी त्याचे उत्तर अजिबात अवघड नाही. मुळात हे सर्व पक्ष स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात. ‘पुरोगामी’ या गोंडस नावाखाली या पक्षांनी आजपर्यंत जो हिंदुद्वेष बाळगला, त्यामुळे ‘पुरोगामी’ ही भारतात आता एक शिवी बनली आहे. हिंदुद्वेषाने भारलेल्या ‘पुरोगामी’ नावाच्या काटेरी मुकुटाचे मानकरी व्हायला आता कुणीही सिद्ध नाही. म्हणूनच तर कट्टर पुरोगामी असलेले राहुल गांधी आता स्वतःला आवर्जून ‘जानवेधारी ब्राह्मण’ म्हणवतात आणि निवडणुका आल्यावर का होईना; पण हमखास देवळांमध्ये जातात ! या नामकरणामागे आणखी एक कारण दडले आहे. भाजप अनेक सूत्रांवर राष्ट्रवाद जोपासतो, जो जनतेला भावतो. त्यामुळेच ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे रूपांतर राष्ट्राशी नाते सांगणार्या ‘इंडिया’ या नावात करून स्वतःला राष्ट्रवादी दाखवण्याचाही हेतू यामागे आहे. अर्थात् केवळ नावात पालट केला; म्हणून कुणी राष्ट्रवादी बनत नाही. तसे असते, तर काँग्रेसमधून फुटलेला शरद पवार यांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष आज कुठच्या कुठे गेला असता; पण उलट आज तो संपण्याच्या मार्गावर आहे. दुसरी गंमत म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीतील ज्या नेत्यांनी ‘इंडिया’ असे बारसे केले, तेच नेते जे.एन्.यू.सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या आणि तशा आणाभाका घेणार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. यावरून ही आघाडी म्हणजे ‘नवी बाटली, जुनी दारू’ यातला प्रकार आहेे. त्यांच्यात खरोखरच राष्ट्रवाद असला असता, तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावात इंग्रजीचा वापर केला नसता.
विरोधकांची ‘इंडिया’ ‘फाळणी’च्या उंबरठ्यावर !
बेंगळुरूतील बैठकीनंतरच विरोधकांची ही ‘इंडिया’ ‘फाळणी’च्या उंबरठ्यावर उभी असल्याचे दिसून आले; कारण बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव यांनी बेंगळुरूतून काढता पाय घेतला. त्यांना ‘इंडिया’ या नावावरच आक्षेप होता. हे नाव राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी पुढे रेटल्याचे सांगण्यात येते. तथापि मोदीविरोधी आघाडीसाठी नितीश कुमार यांनी जिवाचे रान करून बैठकांचे आयोजन केले असतांना त्याचे श्रेय मात्र काँग्रेस लाटत असल्याचे पाहून हे त्रिकुट नाराज झाले. अंततः ‘काँग्रेसला पंतप्रधानपदात कुठलाही रस नाही’, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जाहीरपणे सांगावे लागले, ते यासाठीच ! असा बेबनाव असलेल्या ‘इंडिया’ची राजवट हवी कुणाला ?
राजकीय स्वार्थासाठी आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवणार्यांना आता भारतीय नागरिकच निवडणुकीत जागा दाखवतील ! |