ओरोस – सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत्वाने प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर नवीन शिक्षक भरती होईपर्यंत डी.एड्. आणि बी.एड्. बेरोजगारांना संधी न देता सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध वाढत असून डी.एड्. आणि बी.एड्. बेरोजगारांच्याच या पदांवर नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी. यासाठी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच तात्काळ शिक्षक भरती करून शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल. देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केल्यास त्यांच्या वयानुसार काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या जागी जिल्ह्यातील डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगारांना शिक्षणसेवक म्हणून संधी यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.
जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कडाडून विरोध राहील. या जागांवर जिल्ह्यातील डी.एड्. आणि बी.एड्. पदविधारकांना संधी द्यावी, या मागणीसाठी १७ जुलै या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत आणि संजय पडते यांनी दिली आहे.