भारत स्‍वतंत्र असला, तरी आपली शिक्षणपद्धत पारतंत्र्यातील ! – जगदीश चौधरी, निर्देशक, बालाजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूशन्‍स, हरियाणा

श्री. जगदीश चौधरी

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – वर्ष १८२९ मध्‍ये भारतामध्‍ये ६ लाख ७५ सहस्र विद्यापिठे होती. वर्ष १८४९ मध्‍ये इंग्रजांनी केलेल्‍या सर्वेक्षणानुसार भारतातील ९१ टक्‍के भारतीय शिक्षित होते. असे असूनही ‘प्राचीन भारतामध्‍ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्‍हता’, असा खोटा प्रचार करण्‍यात येतो. ‘जोपर्यंत भारतीय शिक्षणव्‍यवस्‍था नष्‍ट होत नाही, तोपर्यंत भारतावर राज्‍य करू शकत नाही’, हे इंग्रजांनी ओळखले. त्‍यामुळे भारतीय विद्यापिठे नष्‍ट करून ब्रिटिशांनी स्‍वत:च्‍या पद्धतीची शिक्षणव्‍यवस्‍था भारतात लागू केली. आध्‍यात्मिक उन्‍नतीचा मार्ग शिक्षणाने खुला होतो. भारतीय शिक्षणपद्धत उद़्‍ध्‍वस्‍त करून इंग्रजांनी हा आध्‍यात्मिक उन्‍नतीचा मार्ग बंद केला. भारत स्‍वतंत्र झाला असला, तरी आपण शिक्षणामध्‍ये अद्यापही पारतंत्र्यातच आहोत. भारतामध्‍ये इतिहासाच्‍या पाठ्यपुस्‍तकामध्‍ये आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो. ज्‍यामध्‍ये भारतीय संस्‍कृतीचा समावेश नाही, असा इतिहास शिकवला जात आहे. विज्ञानाच्‍या पाठ्यपुस्‍तकात भारतातील शोधकार्याऐवजी परदेशातील शोधकार्यांची माहिती दिली जाते. भारतीय स्‍वावलंबी न होता कायम गुलाम रहावेत, अशी शिक्षणपद्धत इंग्रजांनी निर्माण केली. अशा प्रकारच्‍या शिक्षणपद्धतीने इंग्रजांनी भारतियांचा कणा मोडून टाकला. भारतीय शिक्षण मोक्षप्राप्‍तीसाठी दिशा देणारे आहे. अशा महान शिक्षणपद्धतीचा समावेश भारतीय शिक्षणामध्‍ये करायला हवा, असे आवाहन हरियाणा येथील ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूशन्‍स’चे निर्देशक श्री. जगदीश चौधरी यांनी केले. ते येथे १६ ते २२ जून या कालावधीत आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त उपस्‍थितांना संबोधित करत होते.

…तर हिंदु युवती गाय कापणार्‍यांसह पळून गेल्‍या नसत्‍या ! – सौ. मीनाक्षी शरण, संस्‍थापक, अयोध्‍या फाऊंडेशन, मुंबई

सौ. मीनाक्षी शरण

कोट्यवधी हिंदूंनी या भारतभूमीच्‍या रक्षणासाठी प्राण दिले आहेत. असे असतांना या भूमीचे तुकडे अन्‍य धर्मियांसाठी कसे काय देऊ शकतो ? भारतीय परंपरा, संस्‍कृती आपल्‍या थोर ऋषिमुनींनी मानवाच्‍या हितासाठी निर्माण केल्‍या आहेत. सकाळी उठल्‍यानंतर प्रथम भूमीला वंदन करणे, सूर्यनारायणाला वंदन करणे, ही हिंदूंची संस्‍कृती आहे. भगवंताला अर्पण करण्‍यासाठी फूल तोडण्‍यापूर्वी त्‍या झाडाची अनुमती घेण्‍याची हिंदु धर्माची शिकवण आहे. अशा संस्‍कृतीमध्‍ये पर्यावरणाचा र्‍हास कसा होऊ शकेल ? भारतीय संस्‍कृती मुळातच पर्यावरणाचे संवर्धन शिकवते. वर्ष २०२१-२२ मध्‍ये भारतातून ११ लाख ७५ सहस्र मेट्रिक टन ‘बीफ’ (गोमांस) निर्यात झाले. हे आपला धर्म आणि शास्‍त्र यांच्‍या विरोधात आहे. आपल्‍या संस्‍कृतीमध्‍ये गायीला चारा घालण्‍यास सांगितले जाते. आपल्‍या पाल्‍यांना गायीला चारा घालण्‍यास शिकवले असते, तर जे गायीला कापतात, त्‍यांच्‍यासमवेत हिंदूंच्‍या युवती पळून गेल्‍या नसत्‍या. स्‍वत:च्‍या पाल्‍यांना हिंदूंनी आपली संस्‍कृती शिकवली असती, तर लव्‍ह जिहादच्‍या घटना घडल्‍या नसत्‍या. हिंदूंनी आपली भारतीय संस्‍कृती स्‍वत:च्‍या पाल्‍यांना शिकवायला हवी. तसेच हिंदूंनी धर्मशास्‍त्र समजून घेऊन त्‍यानुसार आचरण करावे, जेणेकरून धर्मावरील आघात रोखता येतील.

धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी संस्‍कृत भाषा उपयुक्‍त ! – डॉ. अजित चौधरी, प्राचार्य, यशवंतराव चव्‍हाण पॉलिटेक्निक, बीड

डॉ. अजित चौधरी

हा देश अनादी काळापासून हिंदु राष्‍ट्र होता आणि पुढेही हिंदु राष्‍ट्र असेल. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्‍यासाठी संस्‍कृत भाषेविना पर्याय नाही. आपल्‍या संस्‍कृतीमध्‍ये सर्व धर्मशिक्षण हे संस्‍कृत भाषेमध्‍ये आहे. ते जाणून घेण्‍यासाठी संस्‍कृत भाषा जाणून घेणे आवश्‍यक आहे. परिणामकारक धर्मजागृती करण्‍यासाठी हिंदु धर्माचे स्‍वरूप जाणून घेतले पाहिजे. त्‍यासाठीही संस्‍कृत भाषा आली पाहिजे. तसेच धर्मावरील आघात परतवून लावण्‍यासाठीही संस्‍कृत भाषाच उपयुक्‍त ठरते, हे श्रीरामजन्‍मभूमी खटल्‍याने दाखवून दिले. श्रीरामजन्‍मभूमी ही प्रभु श्रीरामाचीच आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयासमोर आपल्‍या अधिवक्‍त्‍यांना संस्‍कृतमधील धर्मग्रंथांचेच पुरावे सादर करावे लागले होते.

जगभरात कुठेही रहाणार्‍या हिंदूंमध्‍ये संस्‍कृतचाच संचार आहे. आपल्‍या धर्माचरणातील संस्‍कार संस्‍कृतमध्‍ये आहेत. आपल्‍या दिवसाचा प्रारंभ आणि अंतही संस्‍कृत श्‍लोकानेच होतो. मेकॉले शिक्षणपद्धतीने आपल्‍याला संस्‍कृत भाषेपासून वेगळे केले असले, तरी आजही ही देवभाषा आपल्‍या जीवनाचे अभिन्‍न अंग आहे. आज विविध संशोधकांकडून संस्‍कृत ही संगणकाच्‍या ‘प्रोसेसिंग’साठी सर्वथा योग्‍य असल्‍याचे सिद्ध झाले आहे. आपली प्राचीन मंदिरे केवळ प्रार्थनास्‍थळे नव्‍हती, तर ती शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचीही केंद्रे होती. सहस्रो वर्षांपूर्वी आपल्‍या ऋषिमुनींनी संस्‍कृत भाषेमध्‍ये अनेक शोध लिहून ठेवले आहेत. अशा सर्वार्थाने आदर्श असलेल्‍या देववाणी संस्‍कृतला व्‍यावहारिक भाषा करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्‍यासाठी प्रत्‍येक कुटुंबाने त्‍यांच्‍या मुलांना लहानपणापासून इंग्रजी नाही, तर संस्‍कृत भाषा शिकवणे आवश्‍यक आहे.

क्षणचित्र 

पाश्‍चात्‍य शास्‍त्रज्ञांनी अलीकडच्‍या काळात लावलेले शोध आपल्‍या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षे आधीच लावले होते आणि ते संस्‍कृत ग्रंथांमध्‍ये लिहून ठेवले होते, हे स्‍पष्‍ट करणारी माहिती महोत्‍सवात ‘प्रोजेक्‍टर’वर दाखवण्‍यात आली.

‘जेव्‍हा जेव्‍हा धर्माला ग्‍लानी येईल, तेव्‍हा तेव्‍हा मी धर्मसंस्‍थापनेसाठी आणि अधर्माच्‍या नाशासाठी अवतरित होईन’, असे वचन भगवान श्रीकृष्‍णाने दिले होते. त्‍याप्रमाणे ४०० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्‍णाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या माध्‍यमातून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली. त्‍यानंतर ८० वर्षांपूर्वी स्‍वातंत्र्यवीर सावरकर अन् डॉ. हेगडेवार यांच्‍या माध्‍यमातून भगवान श्रीकृष्‍णाचे तत्त्व कार्यरत झाले होते आणि आता हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या माध्‍यमातून त्‍याच भगवान श्रीकृष्‍णाचे तत्त्व कार्यरत झाले आहे.’

संपादकीय भूमिका

सर्वार्थाने आदर्श असलेल्‍या देववाणी संस्‍कृतला व्‍यावहारिक भाषा करण्‍यासाठी प्रत्‍येक हिंदूने प्रयत्न करणे आवश्‍यक !