गुरुपौर्णिमेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात काढलेल्‍या गुरुपादुकांच्‍या रांगोळीविषयी सौ. स्नेहल गांधी यांना आलेल्‍या अनुभूती

‘१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या स्‍वागतकक्षाबाहेर गुरुपादुकांची रांगोळी काढली होती. त्‍याच्‍याखाली लिहिले होते, ‘नमस्‍कार साष्‍टांग गुरुपादुकांना !’ रात्री मी ती रांगोळी पाहिल्‍यावर माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. दुसर्‍या दिवशी सायंकाळी माझे लक्ष पुन्‍हा त्‍या रांगोळीकडे गेल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद जाणवू लागला.

वर्ष २०२२ मध्‍ये सनातनच्‍या रामनाथी येथील आश्रमाच्‍या प्रवेशद्वारावर घातलेली रांगोळी

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुपूजन झाल्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घातल्‍याचे दृश्‍य आठवून रांगोळीतील गुरुपादुकांना प्रदक्षिणा घालणे

सौ. स्नेहल गांधी

माझ्‍या मनात देवाने विचार दिला, ‘कालच गुरुपौर्णिमा झाली आहे. गुरुपूजनाचा आनंद देवाने ‘याची देही, याची डोळा’ अनुभवायला दिला आहे. त्‍याचा लाभ घेऊया.’ काल श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुपूजन झाल्‍यानंतर दत्तात्रेय रूपातील सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घातली. ते दृश्‍य पहातांना माझी पुष्‍कळ भावजागृती झाली होती. त्‍यामुळे ‘आज सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मलासुद्धा ही संधी देत आहेत’, असा मी विचार केला. त्‍यानंतर ‘गुरुपादुकांना, म्‍हणजेच गुरुदेवांना प्रदक्षिणा घालत आहे’, या भावाने मी हळूहळू त्‍या रांगोळीला (गुरुपादुकांना) प्रदक्षिणा घालू लागले.

२. ‘प्रत्‍यक्ष सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तिथे विराजमान असून मी त्‍यांच्‍याभोवतीच प्रदक्षिणा घालत आहे’, असे जाणवून मन शांत आणि स्‍थिर होणे

पहिल्‍या प्रदक्षिणेच्‍या वेळी माझे मन पूर्ण निर्विचार होऊन मला पुष्‍कळ आनंद वाटून हलकेपणा जाणवला. दुसर्‍या प्रदक्षिणेच्‍या वेळी माझी भावजागृती होऊन माझ्‍या डोळ्‍यांत आनंदाश्रू आले. ‘प्रत्‍यक्ष सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच तिथे विराजमान असून मी त्‍यांच्‍याभोवतीच प्रदक्षिणा घालत आहे’, असे मला जाणवत होते. तिसर्‍या प्रदक्षिणेच्‍या वेळी मी स्‍थिर होऊन मला एकदम शांत वाटले आणि मला आजूबाजूचे भानच राहिले नाही. तेव्‍हा ‘प्रदक्षिणाच घालत रहावे’, असे मला वाटत होते.

मी तीन प्रदक्षिणा घालून थांबले आणि कृतज्ञता व्‍यक्‍त केली, ‘गुरुदेवांनीच मला प्रदक्षिणा घालण्‍याचे सुचवून पुढील आनंद दिला. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता !’ (१५.७.२०२२)

– सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक