सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासम त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी, जशा वेदांसम श्रुति-स्‍मृति !

डावीकडून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यातील मनोगत

श्री. वीरेंद्र मराठे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्तचा ‘ब्रह्मोत्‍सव’ सोहळा हा साधक आणि हितचिंतक यांच्‍यासाठी अविस्‍मरणीय होता. या सोहळ्‍यात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी चालू केलेल्‍या कार्याचे दायित्‍व सांभाळणार्‍या काही साधकांचा परिचय करून देण्‍यात आला. गुरुदेवांनी या सोहळ्‍यात व्‍यक्‍त केलेल्‍या मनोगतात म्‍हटले, ‘वयोमानानुसार वाढत्‍या थकव्‍यामुळे मी गेली अनेक वर्षे कुठे बाहेर गेलेलो नाही. अनेक साधकांनी मला प्रत्‍यक्ष कधीच बघितलेलेही नाही, तरीपण आपण सर्व साधकमंडळी माझ्‍या गुरूंनी सांगितलेले हे कार्य जोमाने पुढे नेत आहात. त्‍यामुळे आज मी तुम्‍हा सर्वांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करतो ! हे सर्व बघून मला खात्री झाली आहे की, हे कार्य पुढील काळात असेच जोमाने उत्तरोत्तर वाढत जाईल !’

२. आध्‍यात्मिक उत्तराधिकारपत्र प्रदान करणे, ही औपचारिकता नसून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या माध्‍यमातून स्‍वतः गुरुदेव कार्यरत रहाणार असणे

 

त्‍यानंतर ११ मे २०२३ या दिवशी ‘ब्रह्मोत्‍सव’ सोहळ्‍यात धातूवर कोरलेले उत्तराधिकारपत्र त्‍यांना प्रदान केले. ही काही औपचारिकता नव्‍हती. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या माध्‍यमातून स्‍वतः गुरुदेव कार्यरत रहाणार आहेत. कार्य उत्तरोत्तर वाढत रहाण्‍यासाठी साधकांना आध्‍यात्मिक अधिष्‍ठानासमवेत सगुण रूपातील श्रद्धास्‍थानाची आवश्‍यकता असते. साधकांची नेमकी हीच आवश्‍यकता सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर आणि त्‍यांच्‍या दोन्‍ही आध्‍यात्मिक उत्तराधिकारी भरून काढतात.

उत्तराधिकारपत्र प्रदान करण्‍यात आल्‍यानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यात अवतारी शक्‍तींचे संक्रमण होण्‍याची प्रक्रिया सूक्ष्मातून घडल्‍याचे सूक्ष्मज्ञान प्राप्‍तकर्त्‍या साधकांनीही (कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांनी) सांगितले आहे.

३. वेदांची श्रुति आणि स्‍मृति नावांची २ अंगे अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या उत्तराधिकारी यांच्‍यातील साम्‍य

या उत्तराधिकार पत्रात गुरुदेवांनी ‘जशी वेदांची श्रुति आणि स्‍मृति नावांची २ अंगे आहेत, त्‍याचप्रमाणे माझी २ अंगे म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या आहेत’, असे म्‍हटले आहे.

वेदोऽखिलो धर्ममूलं स्‍मृतिशीले च तद्विदाम् ।
आचारश्‍चैव साधूनाम् आत्‍मनस्‍तुष्‍टिरेव च ॥

– मनुस्‍मृति, अध्‍याय २, श्‍लोक ६

अर्थ : सर्व वेद हे धर्माचे मूळ आहेत. वेदांचे यथार्थ ज्ञान असणार्‍या ऋषींनी वेदाधारे स्‍मृतींची रचना केली. श्रेष्‍ठ चारित्र्य कशाला म्‍हणावे, तेही सांगितले. ‘सज्‍जनाचे आहार-विहारादी वर्तन कसे असावे’, याचेही सविस्‍तर वर्णन केले.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्माचे मूलभूत विवेचन’)

वरील श्‍लोकाप्रमाणे जसे धर्माचे मूळ वेद, तसे सध्‍याच्‍या काळात धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्याचे मूळ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत. ऋषींनी वेदाधारे स्‍मृतींची रचना केली, त्‍याप्रमाणे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली घडल्‍या आहेत. त्‍या दोघी ‘साधना कशी करावी ?’, ‘शिष्‍याचे आचरण कसे असावे ?’, याचा सर्वोत्तम आदर्श आहेत. श्रुति-स्‍मृति यांमध्‍ये वेद दडलेले आहेत, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दडलेले आहेत.

४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण त्‍यांच्‍या दोन्‍ही आध्‍यात्मिक उत्तराधिकार्‍यांच्‍या माध्‍यमातून मिळत असल्‍याचे साधकांनी अनुभवणे !

सप्‍तर्षींनी जीवनाडीपट्टीच्‍या माध्‍यमातून सांगितलेले ३ गुरूंचे महत्त्व लक्षात घेणे आवश्‍यक आहे. अनेकांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्‍थुलातून कधी अनुभवले नसले, तरी त्‍यांची शिकवण श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या माध्‍यमातून मिळत असल्‍याचे अनेक साधक अन् विशेषतः युवा साधक अनुभवत आहेत.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता !

श्रीमद़्‍परमहंस चंद्रशेखरानंदजी, त्‍यांचे शिष्‍य प.पू. अनंतानंद साईश, प.पू. अनंतानंद साईश यांचे शिष्‍य प.पू. भक्‍तराज महाराज, प.पू. भक्‍तराज महाराज यांचे शिष्‍य प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. डॉ. जयंत आठवले, अशी सनातनची थोर गुरुपरंपरा आहे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आध्‍यात्मिक उत्तराधिकारी घोषित करणे या गुरुपरंपरेनुसारच आहे. सनातनच्‍या ३ गुरूंप्रति, तसेच सनातनच्‍या थोर गुरुपरंपरेप्रति जेवढी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तेवढी अल्‍पच आहे. येणार्‍या आपत्‍काळाला धैर्याने सामोरे जाण्‍यासाठी आणि त्‍यानंतरचे धर्मसंस्‍थापनेचे शिवधनुष्‍य समर्थपणे पेलण्‍यासाठी साधकांना आवश्‍यक असलेले मानसिक अन् आध्‍यात्मिक बळ प्राप्‍त होवो आणि त्‍यांना गुरुचरणांचे सतत स्‍मरण राहो, अशी आजच्‍या गुरुपौर्णिमेच्‍या दिनी तिन्‍ही गुरूंच्‍या चरणी प्रार्थना, तसेच थोर गुरुपरंपरा अन् उत्तराधिकारी दिल्‍याबद्दल कोटीशः कृतज्ञता !

– श्री. वीरेंद्र मराठे, फोंडा, गोवा.

सप्‍तर्षींनी वर्णिलेले ३ गुरूंचे महत्त्व

१. सनातनचे ३ गुरु हे भगवंताचे पृथ्‍वीवरील अवतार !

गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ जे काही बोलतात, ते सर्व आम्‍ही सप्‍तर्षी ऐकत असतो. ‘सनातनचे ३ गुरु हे भगवंताचे पृथ्‍वीवरील अवतार आहेत’, असा वैकुंठाचा शिक्‍का असलेले कागदपत्र (रजिस्‍टर्ड डॉक्‍युमेंट्‍स) म्‍हणजे सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी ! हे कागदपत्र लिहिणारे स्‍वतः ब्रह्मदेव आहेत. ते लिहायला सांगणारे स्‍वयं शिवशंकर आहेत आणि या कागदपत्रावर साक्षात् श्रीमन्‍नारायणाने मोहोर लावली आहे. ‘सनातनचे तीन गुरु ‘अवतार’ नाहीत’, असे कुणी म्‍हणू शकत नाही; कारण यांची कागदपत्रे आम्‍हा सप्‍तर्षींकडे आहेत. – सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९७ (७.३.२०२२)

२. सात्त्विक लोक दोन्‍ही माताजींना (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) पाहून त्‍यांना शरण जातील !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्‍या भोवती नेहमी एक प्रकाशमय आध्‍यात्मिक वलय असते. ते वलय कोटी सूर्य प्रकाशासारखे तेजस्‍वी आहे. हे वलय सूक्ष्म असल्‍याने सर्वसामान्‍य लोकांना कळणे कठीण आहे. पुढे अनेक सात्त्विक लोक या दोन्‍ही माताजींना पाहून त्‍यांना शरण जातील. (सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९३ (२३.११.२०२१)

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघींचा जन्‍म दैवी कार्य पूर्ण करण्‍यासाठी झाला असून हे सर्व ईश्‍वरी नियोजन आहे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघींचा जन्‍म दैवी कार्य पूर्ण करण्‍यासाठी झाला आहे. दोघीही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या आश्रमात सहजपणे आल्‍या आणि सर्व साधकांप्रमाणे त्‍यांनी साधना केली. गुरुदेव कधीही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना शोधत गेले नाहीत, ना त्‍या दोघी गुरुदेवांना शोधत आल्‍या. सर्वकाही सहजपणे घडले आहे. हे सर्व ईश्‍वरी नियोजन आहे.’

– सप्‍तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून, सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. २०४ (१४.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक