गुरुपौर्णिमा ! गुरुचरणी कृतज्ञतेपोटी तन, मन आणि धन अर्पण करण्याचा दिवस ! ‘हे गुरुदेवा, मी आपल्या चरणी वरीलपैकी काय अर्पण करावे, असा प्रश्न मला प्रतिवर्षी पडतो.’ पूर्णवेळ सेवा करतांना विशेष धनप्राप्ती नसल्याने धनाच्या अर्पणाचा प्रश्न नाही. तन अर्पण करण्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुढील ओळी लक्षात येतात.
तन मी तुजला जरी अर्पियले । कोण दयेने प्राप्त हे झाले ।
अजूनही मजला का न उमजले । कसे तुजला अर्पण करू ।
तुझी कशी सेवा करू ॥ ४ ॥
(भजन : ‘देवा तुझेच मी लेकरू ।’)
मन अर्पण करण्याविषयी प.पू. भक्तराज महाराजांनी केलेली प्रार्थना
तू भक्तवत्सल मन माझे चंचल ।
करी कृपा माय-बाप दे भक्ती अचल ॥ ३ ॥
(भजन : ‘जय जय जय जय जय साईनाथा ।’)
तरीही काही अर्पण करायचे म्हटले, तरी अनेक स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त असलेला माझा जीव गुरुचरणी कसा अर्पण करणार ? नंतर आठवले, ते सनातनचे परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका ! ते एवढे महान होते की, वर्ष २०१० मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोग त्यांनी स्वतःवर घेतला.
तसे काही करण्याएवढा मी महान नाही. मग काय करणार ? मग स्वतःच्या सेवेविषयी विचार आला. सध्या मी ज्या पद्धतीने सेवा, साधना करायला हवी, तितक्या तळमळीने ती करत नाही. अशा वेळी माझ्या आयुष्यातील काही वर्षे जर गुरूंच्या आयुष्यासाठी अर्पण झाली तर ? कदाचित् माझ्या आयुष्यातील १० वर्षे अल्प झाली, तर माझ्या गुरूंचे केवळ १० दिवस वाढतील किंबहुना त्याहीपेक्षा अल्प दिवस वाढले, तरी ते समष्टीसाठी जास्त हितकारक ठरेल ! कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे १० दिवस, हे माझ्यासारख्या साधकाच्या १० वर्षांच्या आयुष्यापेक्षा समष्टीसाठी अधिक लाभदायी ठरतील ! असे होणार असेल, तर हे गुरुदेवा, येथून पुढची सगळीच वर्षे आपल्या चरणी अर्पण करून घ्यावीत, ही प्रार्थना !
गुरुदेव, हा विचार देणारे आणि करून घेणारे तुम्हीच आहात. मला स्वार्थामुळे ‘हे आयुष्य माझे आहे’, असे वाटते; प्रत्यक्षात, तेही आपणच मला दिले आहे. त्यामुळे या सर्व विचारांमध्ये योग्य काय, ते मला कळत नाही. ‘मला कळते असे वाटणे’, हा अहंचा पैलू माझ्यात प्रकर्षाने असल्याने कदाचित् ही विचारप्रक्रिया झाली असावी.
हे गुरुदेवा, ‘माझ्यासारख्या जिवाच्या हितापेक्षा ज्यामध्ये समष्टीचे हित अधिक असेल, तेच तुम्ही या गुरुपौर्णिमेला आणि नेहमीच माझ्याकडून अर्पण करून घ्या’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२३)