वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधनेचा लाभ घ्‍या ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वन्‍दे श्री गुरुपरंपरा ! गुरुवर श्री सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या चरणी साष्‍टांग नमस्‍कार. घोर कलियुगात अज्ञानी, पापी, मायेत अडकलेल्‍या जिवांचा उद्धार करण्‍यासाठी भूतलावर भगवंतच साक्षात् गुरुतत्त्वाच्‍या रूपात कार्यरत झाले आहेत. अशा घोर अंधःकारात जे जीव साधनेसाठी, गुरुसेवेसाठी, गुरुकार्य प्रसारासाठी, गुरुकृपाप्राप्‍तीसाठी, धर्मरक्षण कार्यासाठी, राष्‍ट्ररक्षण कार्यासाठी, सात्त्विक समाजाच्‍या रक्षणासाठी अविरत झटत आहेत, त्‍यांच्‍यावर अनन्‍य कृपा करून त्‍यांचा उद्धार करण्‍यासाठी गुरुतत्त्व सहस्रपटींनी कार्यरत झाले आहे. गुरुरूपी भगवंताची दया, करुणा अनुभवण्‍याचा काळ जिज्ञासू आणि मुमुक्षु यांना उपलब्‍ध झाला आहे. यथाशक्‍ती गुरुकार्यात, धर्मकार्यात, हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या कार्यात सहभागी होणार्‍यांचा उद्धार निश्‍चित आहे. आता भारताला धर्माधिष्‍ठित राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी, म्‍हणजेच भारतात रामराज्‍य स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे, हीच वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधना आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्‍यावा ! यासाठी गुरुवर, आपणच सर्वांना बुद्धी द्यावी, ही आपल्‍या चरणी प्रार्थना ! (३१.५.२०२३)