गुरुपरंपरेचे स्‍मरण !

आज आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस ! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक अन् शिष्‍य यांच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरूंच्‍या कृपेने शिष्‍याचे परममंगल होते म्‍हणजेच त्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती होते. गुरु शिष्‍याला त्‍याच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीच्‍या प्रवासात पावलोपावली प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्ष, सूक्ष्मातून अशा विविध माध्‍यमांद्वारे सतत मार्गदर्शन करत असतात, शिकवत असतात आणि ते मार्गदर्शन ग्रहण करूनच शिष्‍य पावले टाकत असतो. गुरूंच्‍या मनात शिष्‍याची उन्‍नती व्‍हावी, असा विचार येऊन त्‍या कृपेच्‍या आधारे शिष्‍य त्‍याच्‍या जन्‍माचे ध्‍येय साध्‍य करतो. गुरु जेव्‍हा शिष्‍यावर पूर्ण कृपा करतात, तेव्‍हा शिष्‍याला आयुष्‍यात कुठलीच न्‍यूनता तर नाहीच भासत उलट तो इतरांना देण्‍यास समर्थ होतो.

माहिती आणि आत्‍मज्ञान !

एखादी व्‍यक्‍ती शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, तसेच पुढे पदवी आणि पदव्‍युत्तर शिक्षण पूर्ण करून एखाद्या विषयात प्रावीण्‍य मिळवते. गुरूंच्‍या कृपेने शिष्‍याला या सर्व माहितीच्‍या पलीकडील आत्‍मज्ञान प्राप्‍त होते आणि तेच खरे ज्ञान आहे. व्‍यावहारिक भाषेत ज्‍याला ज्ञान म्‍हणतो, ती तर प्रत्‍यक्षात एखाद्या विषयाची माहिती आहे आणि त्‍यातील बारकावे म्‍हणजे तिचे बुद्धीने समजून घेतलेले विश्‍लेषण आहे. आत्‍मज्ञान तर या पलीकडील आहे. पूर्वीच्‍या काळी गुरुकुलात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी त्‍या त्‍या विद्येचे शिक्षण घेतांना आश्रमसेवा, गुणग्रहण, आदर्श आचरणाचा प्रयत्न यांमध्‍येच व्‍यतीत करत असल्‍याचे दिसते. शिष्‍याच्‍या क्षमतेनुसार त्‍याला विद्या ग्रहण होऊ शकते; स्‍वत:च्‍या साधनेने आणि आचरणाने एकदा गुरूंचे मन जिंकले की, होणारे आत्‍मज्ञान सर्वोच्‍चच असते. शिष्‍य विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धीशी जोडला जात असल्‍याने त्‍याला व्‍यावहारिकदृष्‍ट्या एखाद्या विषयाची पूर्ण माहिती असली किंवा नसली, तरी त्‍याला ती विश्‍वबुद्धीतून सहज प्राप्‍त होऊ शकते. म्‍हणजे एखाद्याने व्‍यावहारिक शिक्षण घेण्‍यात वेळ घालवण्‍याऐवजी गुरूंची कृपा संपादन करण्‍यात, गुरूंचे मन जिंकण्‍यात वेळ दिला, तर त्‍याच्‍यासमोर गुरु विश्‍वाचे ज्ञानभांडार खुले करू शकतात. एवढे सामर्थ्‍य गुरूंमध्‍ये असते. यामुळेच गुरुकुलांचे महत्त्व होते, आहे आणि पुढेही रहाणारच आहे. या गुरुशिष्‍य आणि गुरुकुल परंपरेनुसारच ज्ञानगंगा पुढील पिढ्यांपर्यंत प्रवाहित होत असे. असे युगानुयुगे चालू असल्‍यामुळेच भारतीय सभ्‍यता, परंपरा, संस्‍कृती, वेद, पृथ्‍वी आणि संपूर्ण मानवजात टिकून आहे. ही गुरुकुल व्‍यवस्‍था असल्‍यामुळे मोगलांसारख्‍या क्रूर, कपटी नर, पिशाच्‍चांचे आक्रमण होऊनही हिंदु संस्‍कृती आणि हिंदु धर्म टिकून राहिला. ब्रिटिशांनी हे लक्षात घेऊन गुरुकुल व्‍यवस्‍था नष्‍ट करण्‍यावर भर दिल्‍यावर मात्र भारतियांच्‍या खर्‍या अर्थाने अध:पतनास प्रारंभ झाला. तो आजघडीला त्‍याच्‍या अंतिम सीमेवर येऊन पोचला आहे.

गुरु-शिष्‍य परंपरेची महती !

भारतावर जेव्‍हा मोठी भीषण संकटे आली, तेव्‍हा अन्‍य कुणीही नाही, तर गुरुपरंपरेनेच भारत आणि हिंदू यांचे रक्षण केले आहे. महाभारत काळी अनेक आसुरी शक्‍ती पृथ्‍वीवर उत्‍पात घडवत असतांना श्रीकृष्‍ण आणि अर्जुन, जुलमी धनानंदाची अत्‍याचारी राजवट नष्‍ट करणारे चंद्रगुप्‍त आणि त्‍यांचे गुरु आचार्य चाणक्‍य, मोगलांच्‍या आक्रमणाने हिंदु समाज होरपळून निघत असतांना हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु समर्थ रामदासस्‍वामी, दक्षिणेत मोगलांना निष्‍प्रभ करून विजयनगर साम्राज्‍याची मुहूर्तमेढ रचणारे हरिहर आणि बुक्‍क अन् त्‍यांचे गुरु विद्यारण्‍यस्‍वामी, ब्रिटिशांच्‍या राजवटीत हिंदु धर्म चहुबाजूंनी संकटात असतांना साता समुद्रापार जाऊन हिंदु धर्माची ध्‍वजा गौरवाने फडकावणारे स्‍वामी विवेकानंद आणि त्‍यांचे गुरु रामकृष्‍ण परमहंस ही गुरु-शिष्‍य परंपरेची उदाहरणे आहेत. सध्‍याच्‍या परिस्‍थितीचा विचार केला, तर भारत, हिंदू आणि एकूणच जग यांच्‍यापुढे भयावह संकटे उभी आहेत. धर्मांध, साम्‍यवादी, निधर्मी यांच्‍यामुळे हिंदू, हिंदु धर्म आणि भारत संकटात आहे. लव्‍ह जिहाद, अपहरण, अत्‍याचार यांमुळे हिंदु मुली-महिला यांचे शील भ्रष्‍ट होत आहे. दंगली, हिंदूंवरील आक्रमणे, दिवसाढवळ्‍या होणार्‍या हत्‍या यांमुळे सर्वत्र असुरक्षिता, अशांतता पसरली आहे. पोलीस आणि प्रशासन हिंदू अन् एकूणच भारतीय समाजाचे रक्षण करण्‍यास असमर्थ ठरत आहे. त्‍यातच महापूर, भूकंपाचे धक्‍के बसत आहेत, अतीवृष्‍टीचा सामना करावा लागत आहे, जगावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अशा या कातर वेळी पुन्‍हा एकदा सर्व समाजाला आश्‍वस्‍त करण्‍यासाठी गुरु-शिष्‍य परंपराच अवतरीत झाली आहे आणि तिने कार्य चालू केले आहे. ती थोर गुरु-शिष्‍य जोडी म्‍हणजे प.पू. भक्‍तराज महाराज आणि त्‍यांचे शिष्‍योत्तम डॉ. जयंत आठवले ! भारतीय या शब्‍दातील ‘भा’ म्‍हणजे तेज आणि तेजाच्‍या उपासनेत रत म्‍हणजे मग्‍न असलेले ते भारतीय ! ही तेजाची उपासना म्‍हणजेच साधना आहे. या साधनेचा विसर भारतियांना धर्मशिक्षणाअभावी पाडला असतांना ‘जीवनातीलच नव्‍हे, तर राष्‍ट्र आणि धर्म यांचे प्रश्‍न साधनेने सुटतील’, अशी महत्त्वपूर्ण शिकवण सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिली आहे. मानवाला त्‍याचे भविष्‍य भयावह आणि भीषण वाटत असतांना ‘मानवजातीला आनंद देणारे, सर्वांचे कल्‍याण साधणारे हिंदु राष्‍ट्र लवकरच स्‍थापन होणार आहे’, असे सांगून त्‍यांनी आश्‍वस्‍त केले आहे. एवढ्यावरच न थांबता त्‍यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठांना प्रेरणा देऊन साधना करण्‍यासाठी कृतीप्रवणही केले आहे. गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने या गुरु-शिष्‍य परंपरेला शरण जाऊया आणि भीषण आपत्‍काळाला सामोरे जाणार्‍या मानवजातीला योग्‍य दिशानिर्देशन करण्‍याविषयी पुनःपुन्‍हा कृतज्ञता व्‍यक्‍त करूया !