पुणे येथे भररस्त्यामध्ये युवतीवर कोयत्याने आक्रमण केल्याचे प्रकरण !
मुंबई – पुणे येथे एका युवतीवर आक्रमणाची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात आक्रमण होत असतांना अन्य लोक बघत राहिले. लेशपाल जवळगे नावाच्या युवकामुळे ती तरुणी वाचली. लेशपाल याने जे धाडस दाखवले, त्याविषयी त्याचे मनापासून कौतुक; पण आजूबाजूचे इतके लोक बघ्याच्या भूमिकेत का गेले किंवा जातात ? याचे आश्चर्य वाटते, असे ट्वीट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 28, 2023
यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, अर्थात् ‘पुढे चौकशीचा ससेमिरा कशासाठी ?’ असा विचार लोकांच्या मनात येत असेल. यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवे. दर्शना पवार हिच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असतांना, तसाच काहीसा प्रकार परत घडणे हे गंभीर आहे, असे या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या ट्वीटमध्ये सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत. त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल, हेही बघायला सरकारची हरकत नसावी, अशी कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी ठाकरे यांनी सरकारला कोपरखळीही मारली आहे. असे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत नाहीत ना ? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.