संपूर्ण विश्वाचे आकर्षण ठरलेली पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचे केवळ सांस्कृतिक नव्हे, तर आध्यात्मिक वैभव आहे. कलियुगात ईश्वरप्राप्तीसाठी सांगितलेल्या भक्तीयोगाच्या मार्गाचे ते साक्षात् प्रायोगिक दर्शन आहे ! आज बहुतांश लोकांमध्ये केवळ देवळाबाहेर रांगा लावण्यात धन्यता मानण्यापुरती उपासना उरलेली असतांना ईश्वराप्रतीची निस्सीम ओढ, त्याच्या केवळ मुखदर्शनाची तळमळ आणि अखंड त्याच्या स्मरणात राहून भक्तीचा जागर करण्याचे व्रत अंगीकारलेल्या वारकर्यांचा भोळा भाव निश्चितच अनुकरणीय आहे. शहरात असणार्या आजच्या अत्यंत तणावाच्या आणि धकाधकीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विठुमाऊलीच्या प्रती भोळ्या भावाचे उत्कट प्रदर्शन करणारी ही वारी कुणाच्याही जीवनात अमृतसंजीवनी घेऊन येणारी ठरू शकते. ‘आपल्याला आधार देणारा भगवंत आपल्या जवळ वावरत आहे’, याची निश्चिती या वारीतून होते.
ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वसामान्यांना देवाकडे जाण्याचा मार्ग सुलभ होण्यासाठी वारीच्या परंपरेला पुनरुज्जीवित केले आणि आजतागायत अनेक परकियांची आक्रमणे होऊनही ७०० वर्षांनंतरही देवाप्रतीच्या भावाचा एक उच्चतम आदर्श वारकरी संप्रदायाने जपला. ना धर्मांध त्यावर घाव घालू शकले, ना इंग्रज त्याचा भेद करू शकले. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर परकीय आक्रमकांचा काही ना काही परिणाम झालेला असतांना वारी मात्र विठ्ठलाच्या कृपेने अबाधित आहे, हे भक्त आणि भगवंत यांच्या अनुपम अन् अमोघ नात्याचे सारच म्हणावे लागेल !
प्रतीवर्षीच्या वारीमुळे खर्या वारकर्यांच्या भक्तीची उंची एवढी उंचावते की, संतांनी त्यांच्या ओव्या-अभंगांतून सांगितलेला ज्ञानयोग त्यांना आतून आत्मसात होत जातो. दैनंदिन जीवनात आणि वारीच्या माध्यमातून त्यांचा कर्मयोगही चालू असतो. भगवंताला अगदी आपल्यातला, आपलाच मानणारी ही भक्ती परमेश्वराला आपल्या अगदी जवळ घेऊन येते. दुरावा नष्ट करते. अद्वैतापर्यंत नेते. कधी तो ‘सखा’ असतो, कधी ‘सवंगडी’ असतो, कधी तो ‘राया’ असतो, कधी तो ‘बाप’ असतो, तर कधी ‘माऊली’ही असतो. वारकर्याला विठ्ठल जसा भावला, तसा तो त्याला पहातो आणि त्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे जवळजवळ मासभर हे भाव-भक्तीव्रत तहान-भूक विसरून अखंड चालू असल्याने अधिकाधिक काळ ही भक्तीभाव वाढवण्याची साधना चालू रहाते. अशी प्रत्येक वारी खर्या वारकर्याची आध्यात्मिक प्रगती करून घेत असते. वारकर्यांच्या उत्कट भावामुळेच वारीच्या महानतेची प्रचीती ते अनुभवतात आणि विठोबाच्या नामगजरात रममाण होतात. भोळ्या भावाची ही अलौकिक परंपरा जपणे, राष्ट्राला विश्वगुरु करण्यातील एक भाग असणारे हे आध्यात्मिक वैभव जपणे, हे खरेतर देशातील प्रत्येक सजग नागरिकाचे आणि सरकारचेही कर्तव्य ठरते; परंतु दुर्दैवाने यात सर्वच जण न्यून पडतात, असे लक्षात येते.
भावभक्तीची अनास्था !
वारकरी संप्रदायातील संत आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांवर पहिला अन्याय चालू होतो, तो शिक्षणव्यवस्थेतून. नेहरूप्रणीत निधर्मी शिक्षणव्यवस्था आणि विद्रोहींचे वर्चस्व असलेल्या साहित्य क्षेत्रामुळे शिक्षणसंस्थांतून वारकरी संप्रदायातील सर्व संतांकडे ‘कवी’ म्हणून पाहिले जाते. ‘संत हे प्रथम संत असतात आणि त्यांची साहित्यिक अभिव्यक्ती ही ते संत असल्यामुळे असते’, हे लक्षात घेण्याची क्षमता दुर्दैवाने सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत नाही. त्यामुळे विद्यार्थी ‘संतत्व’, ‘ईश्वराप्रतीची भाव-भक्ती’, ‘ईश्वरप्राप्तीची ओढ’ या संकल्पनांपासून कोसो दूर रहातात. अलीकडच्या काळात लेखक, व्याख्याते आणि प्राध्यापक कै. यशवंत पाठक यांच्यासारख्यांचा अपवाद वगळता वारकर्यांची भक्ती शहरी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न अपवादानेच झालेला आहे. काही शहरी उच्चशिक्षितांमध्ये ‘वारी’ला जाण्याची नवरूढी निर्माण झाली आहे, त्यांनीही केवळ सांस्कृतिक किंवा संशोधक वृत्तीने यात सहभागी न होता, ‘ईश्वराविषयीचा भाव वाढत आहे का ?’ हे पाहिले, तर त्यांना या वारीचा खर्या अर्थाने लाभ होईल; पण दुर्दैवाने त्यांना हे सांगणारेच कुणी नाही. सध्याच्या काळात ‘माऊलींचा एक अश्व त्यावर कुणीही आरूढ न होता रिंगण पूर्ण करतो’, ही एकच गोष्ट ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती देण्यासाठी खरेतर पुरेशी आहे. वारकरी संप्रदायातील सर्वच संतांचे जीवन त्यांच्या भक्तीच्या अत्युच्च पातळीमुळे चमत्कारांनी भरलेलेच आहे. ते समजून घेण्याची केवळ जिज्ञासा जरी प्रत्येकाने ठेवली, तरी त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाचे आणि त्याच्याविषयीच्या भावाचे कोडे हळूहळू उलगडत जाईल. पंढरपूरच्या मंदिराचे सरकारीकरण झाल्याने तेथील गोवंशविक्रीत झालेला घोटाळा, मंदिरातील कीर्तन आणि नित्योपचार बंद होणे अशा काही गोष्टी घडल्या आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत. ‘मंदिरे भक्तांच्या कह्यात असल्याने तेथील व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने सांभाळले जाऊ शकते’, असे सर्वांना वाटते. नुकतीच श्री विठ्ठलाला केलेल्या द्राक्षांच्या आरासीतील द्राक्षे पहाटे ६ वाजता गायब झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रातील एका मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशी घटना घडणे, हे कशामुळे होत आहे ? ‘अल्ला खिलावे अल्ला पिलावे’ असा ‘अल्लाचा अभंग’ एक मुसलमान हा वारकर्यांकडून वदवून घेत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. ‘दया तिचे नांव । भूतांचे पाळण । आणिक निर्दळण । कंटकांचे ॥’, असा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा उपदेश लक्षात घेऊन अधर्मियांविरुद्ध उभे ठाकून धर्मरक्षण करणे, हेही कर्तव्य आहे, हे वारकर्यांनी लक्षात घेतले पाहिजे. एकूणच काय तर विश्वाला पसायदान देण्यासाठी वारकर्यांनी त्यांच्या भगवद्भक्तीला धार आणून धर्म विरुद्ध अधर्माच्या लढ्यात धर्माच्या बाजूने ठामपणे उभे राहून विठुरायाची वारी केली पाहिजे !
धर्म विरुद्ध अधर्माच्या लढ्यात वारकऱ्यांनी त्यांच्या संघशक्तीने अधर्मावर प्रहार केला पाहिजे ! |