न्यूयॉर्कमधील शाळांना मिळणार दिवाळीची सुट्टी !

न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्कमधील शाळांना दिवाळीची सुट्टी देणारे विधेयक राज्याच्या विधानसभेत संमत करण्यात आलेे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सर्व शाळांमध्ये याविषयीचा आदेश लागू होणार आहे.

१. महापौर अ‍ॅडम्स म्हणाले की, या निर्णयामुळे न्यूयॉर्कमध्ये रहाणार्‍या २ लाखांहून अधिक कुटुंबांना हा सण अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीला सुट्टी घोषित करण्याच्या या लढ्यात मी स्थानिक समुदाय आणि विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांच्या पाठीशी उभा राहिल्याचा मला आनंद आहे.

२. न्यूयॉर्कमध्ये दिवाळीच्या दिवशी शाळांमधील सुट्टीशी संबंधित हे विधेयक विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांनी मांडले होते. विधेयक संमत झाल्यावर ते म्हणाले की, मला आनंद आहे की, मी न्यूयॉर्कच्या लोकांच्या वतीने या लढयास प्रारंभ केला आणि तो जिंकला.

३. अमेरिकेच्या संसदेत दिवाळीच्या सरकारी सुट्टीसाठी एक विधेयकही मांडण्यात आले.  या विधेयकांतर्गत अमेरिकेत दिवाळीला १२ वी अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. २५ मे या दिवशी कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळीला सरकारी सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.