नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील १० किलो वजनाचे सोन्याचे दागिने गायब !

नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर

काठमांडू (नेपाळ) – येथील सर्वांत जुने पशुपतीनाथ मंदिर २५ जून या दिवशी काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मागील वर्षी महाशिवरात्री उत्सवाच्या वेळी पशुपतीनाथ मंदिरातील शिवलिंगाला १०३ किलो वजनाचे दागिने अर्पण करण्यात आले होते. त्यांतील १० किलो दागिने गायब असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेपाळमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ जून या दिवशी काही काळ हे मंदिर कह्यात घेऊन तेथे चौकशी केली. पशुपतीनाथ मंदिराला अर्पण केलेल्या दागिन्यांपैकी १० किलो दागिने गायब झाल्याविषयी संसदेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर सरकारने यंत्रणांना चौकशी करण्यास सांगितले आहे. ‘पशुपतीनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे संचालक घनश्याम खतिवड म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात सुरक्षा कर्मचार्‍यांसह नेपाळी सैन्याचे सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत.