मृत्यू टाळण्यासाठी कोरोना लसींचा वापर टाळण्याची आवश्यकता ! – ऑस्ट्रेलियातील हृदयरोगतज्ञ

माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचा लसीमुळे मृत्यू झाल्याचा दावा !

माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्या वयाच्या ५२ व्या वर्षी झालेल्या मृत्यूमागे कोरोना लस कारणीभूत असल्याचा दावा येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञांनी केला आहे. वॉर्न यांनी घेतलेली ‘कोरोना एम्.आर्.एन्.ए.’ ही लस हृदय आणि रक्तवाहिन्या या संबंधीच्या आजारांना प्रोत्साहन देते, असे आढळून आल्याचे मत ‘ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसायटी’चे अध्यक्ष हृदयरोगतज्ञ डॉ. असीम मल्होत्रा आणि डॉ. ख्रिस नील यांनी व्यक्त केले. वॉर्न यांनी लस घेतल्यानंतर केवळ ९ मासांतच थायलंडमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

डॉ. मल्होत्रा म्हणाले, ‘‘या लसींचे हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित परिणाम पुष्कळ मोठे आहेत. ऑस्ट्रेलियासह जगभरात झालेल्या मृत्यूंना ‘कोविड एम्.आर्.एन्.ए.’ या लसीच कारणीभूत आहेत. लोकांची आणखी हानी टाळण्यासाठी जगभरात या लसींचा वापर थांबवण्याची आवश्यकता आहे.’’

दोघा हृदयरोगतज्ञांनी म्हटले की, वॉर्न यांच्या शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षांमध्ये ‘कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिस’ (एक प्रकारचा हृदयविकार) दिसून आला. त्यांनी सांगितले की, त्यांचे संशोधन असे सूचित करते की, ‘कोविड एम्.आर्.एन्.ए.’ लस कोरोनरी, म्हणजे हृदयाच्या वाहिन्यांशी संबंधित रोगांचा जलद प्रसार करू शकते. हे प्रमाण त्यांच्यात अधिक बळावते, ज्यांना आधीच हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित रोग आहेत. ते पुढे म्हणाले, ‘शेन वॉर्न यांचा ५२ व्या वर्षीच मृत्यू होणे, हे अत्यंत असामान्य आहे. आम्हाला ठाऊक आहे की, अलीकडच्या काळात वॉर्न यांची जीवनशैली निरोगी नव्हती. ते धूम्रपान करत होते आणि त्यांचे वजनही अधिक होते. हृदयरोगाच्या अनेक रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मुरुमांसारखे काही तरी दिसले. माझ्या वडिलांचाही ‘फायझर’ लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला आणि लसीनंतर त्यांचे हृदयविकार झपाट्याने वाढले.’’

कोरोना लसीच्या परिणामांवरून जगभरातील अनेक हृदयरोगतज्ञ चिंतित ! – डॉ. ख्रिस नील

डॉ. ख्रिस नील म्हणाले, ‘‘जगभरातील अनेक हृदयरोग तज्ञही या कोरोना लसीमुळे चिंतित आहेत. आम्ही हृदय अन् रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित प्रतिकूल घटनांपासून चालू होणारे ‘फार्माकोव्हिजिलन्स’ (औषधांचा सकारात्मक उपयोग होण्यासाठीच्या उपाययोजनेची प्रक्रिया) या अहवालांची मालिका प्रसारित करणार आहोत.’’

संपादकीय भूमिका

असा अहवाल प्रसिद्ध करून जनतेमध्ये भ्रम आणि भय निर्माण करण्याचे हे षड्यंत्र नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !