रामनाथी, २१ जून (वार्ता.) – वर्ष १८२९ मध्ये भारतामध्ये ६ लाख ७५ सहस्र विद्यापिठे होती. वर्ष १८४९ मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील ९१ टक्के भारतीय शिक्षित होते. असे असूनही ‘प्राचीन भारतामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता’, असा खोटा प्रचार करण्यात येतो. ‘जोपर्यंत भारतीय शिक्षणव्यवस्था नष्ट होत नाही, तोपर्यंत भारतावर राज्य करू शकत नाही’, हे इंग्रजांनी ओळखले. त्यामुळे भारतीय विद्यापिठे नष्ट करून ब्रिटिशांनी स्वत:च्या पद्धतीची शिक्षणव्यवस्था भारतात लागू केली. आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शिक्षणाने खुला होतो. भारतीय शिक्षणपद्धत उद्ध्वस्त करून इंग्रजांनी हा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग बंद केला. भारत स्वतंत्र झाला असला, तरी शिक्षणामध्ये आपण अद्यापही पारतंत्र्यातच आहोत. भारतामध्ये इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो. ज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा समावेश नाही, असा इतिहास शिकवला जात आहे. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात भारतातील शोधकार्याऐवजी परदेशातील शोधकार्यांची माहिती दिली जाते.
भारतीय इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहासाचा समावेश हवा. भारतीय स्वावलंबी न होता कायम गुलाम रहावेत, अशी शिक्षणपद्धत इंग्रजांनी निर्माण केली. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीने इंग्रजांनी भारतियांचा कणा मोडून टाकला. भारतीय शिक्षण मोक्षप्राप्तीसाठी दिशा देणारे आहे. अशा महान शिक्षणपद्धतीचा समावेश भारतीय शिक्षणामध्ये करायला हवा, असे आवाहन हरियाणा येथील ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’चे निर्देशक जगदीश चौधरी यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.