आध्यात्मिक सौंदर्य आणि समृद्धता अनुभवली नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील ! – मंत्री जी. किशन रेड्डी

जी-२० अंतर्गत पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे उद्घाटन सत्र

जी-२० अंतर्गत पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात संबोधित करतांना मंत्री  जी. किशन रेड्डी, गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर

पणजी, २० जून (पसूका) – पर्यटन मंत्रालयाने जी-२० अंतर्गत आयोजित केलेल्या  पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे उद्घाटन सत्र २० जूनला सकाळी गोव्यात झाले. या सत्राला केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री  जी. किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट; पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक अन् गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबोधित केले. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे या वेळी उपस्थित होते.

उद्घाटन सत्राला संबोधित करतांना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले,

‘‘गेल्या काही मासांत भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० पर्यटन कार्यगटाच्या बैठका झाल्या. यामध्ये गुजरातमधील कच्छचे रण येथे पहिली बैठक, बंगालमधील सिलीगुडी येथे दुसरी बैठक आणि जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे तिसरी बैठक झाली. या बैठकांमध्ये जगभरातील तज्ञ, नवोन्मेषक आणि नेत्यांसमवेत विविध पर्यटन प्रकारांविषयी अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि सकारात्मक चर्चा झाली.

आमच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे सौंदर्य, महानता आणि समृद्धता, तसेच देशातील विविध ठिकाणांचे वैविध्य अनुभवले नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील. आमच्याकडे ५० हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून, भारतातील प्रवास हा स्वतःचा शोध घेण्याची एक संधी होती आणि जगाच्या कानाकोपर्‍यातील पर्यटकांसाठी आणि स्वत:चा शोध घेण्यासाठी भारत हे नेहमीच लोकप्रिय ठिकाण राहिले आहे. या निमित्ताने २०० देशांतील लोकांना आणि विविध धर्मांच्या लोकांना भारताची संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.’’

गोवा हे सर्व ऋतूंमधील पर्यटनस्थळ ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

उद्घाटन सत्राला संबोधित करतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध प्रदेशांमधील पर्यटकांना वर्षभर आकर्षित करणार्‍या गोव्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रवासाच्या शाश्वत अनुभूतीला प्राधान्य देणार्‍या सर्वसमावेशक प्रवास क्षेत्राला चालना देण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

ते पुढे म्हणाले,

‘‘वसुधैव कुटुम्बकम’ या संकल्पनेखाली आज गोव्यामध्ये एकत्र येऊन आपण अधिक समावेशक, शाश्वत आणि समृद्ध जगाच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. गोवा हे ‘पर्ल ऑफ द ओरिएंट’ (पूर्वेकडील मोती) म्हणून प्रसिद्ध असून प्रतिवर्षी देशातल्या आणि परदेशातल्या लाखो पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा हे येथील सुंदर समुद्रकिनारे, रोमहर्षक साहसी खेळ, जागतिक वारसा असलेला पश्चिम घाट आणि आकर्षित करणारे धबधबे, शांत बॅकवॉटर, योग अन् निरामयता, स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि अद्वितीय संस्कृती अन् वारसा, यांसाठीदेखील ओळखले जाते. गोवा हे सर्व हंगामांचे पर्यटनस्थळ असून समुद्रकिनार्‍यावरील हे नंदनवन प्रत्येकाला भरभरून काहीतरी देते. गोव्याला भेट देणारे पर्यटक वेगवेगळ्या जलक्रीडा आणि चैतन्यमय जीवनाचा आनंद घेतात, संगीत अन् सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि स्थानिक खाद्य प्रकारांचा आस्वाद घेतात.’’

Highlights of Day-1 of the 4th G20 #TWG Meeting in Goa