गोरखपूर (उत्तरप्रदेश)- येथील गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली. गीता प्रेसकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचे प्रकाशन करण्यात येते. या योगदानाविषयी केंद्रसरकारने गीताप्रेसचा ‘गांधी शांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला.
काँग्रेस पक्षाने गीता प्रेसला हा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. ‘गीता प्रेसला गांधी शांती पुरस्कार देणे म्हणजे सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे’, असे हिंदूद्वेषी वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात काँग्रेस पक्षाच्या निषेधाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या दोन्ही प्रस्तावांचे वाचन केले. याविषयी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘यातून काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्याचाही प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष गांधी यांच्यावर स्वत:ची मक्तेदारी असल्याचा प्रयत्न करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर गांधी यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला; मात्र काँग्रेसने गांधी यांच्या या सल्ल्याची अवहेलना केली. काँग्रेसकडून भारतात हिंदूविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर देशविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.’’