बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

श्री. जयराम एस्.

बेंगळुरू (कर्नाटक) – साधनेची तळमळ, संतांविषयी अपार भाव, आज्ञापालन करणे असे अनेक दैवी गुण लाभलेले मूळचे बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली असून ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त झाले आहेत, असे ८ जून २०२३ या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (पू. रमानंदअण्‍णा) यांनी एका सत्‍संगात घोषित केले. ही वार्ता ऐकून उपस्‍थित धर्मप्रेमी आणि साधक यांची भावजागृती झाली. त्‍यांनी भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली. या वेळी पू. रमानंद गौडा यांनी श्री. जयराम यांना त्‍यांची इष्‍टदेवता श्रीराम यांचे भावचित्र देऊन सत्‍कार केला. त्‍यानंतर श्री. जयराम यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

डावीकडे उद्योगपती श्री. जयराम एस्.यांना श्रीरामाची प्रतिमा भेट देतांना पू. रमानंद गौडा

श्री. जयराम यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत

संतांनी सांगितल्‍याप्रमाणे ध्‍येय ठेवून प्रयत्न केले !

मी अनेक वर्षांपासून ‘माझे गुरु कोण आहेत ?’, असा विचार करत होतो. एक दिवस मला सनातन संस्‍थेच्‍या साधनावृद्धी शिबिरामध्‍ये सहभागी होण्‍याची संधी मिळाली. त्‍यानंतर ‘आपणही ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून प्रगती करावी’, असे सातत्‍याने वाटत होते. माझ्‍या मनात रात्रंदिवस हाच विचार असायचा. बेंगळुरू येथील जिल्‍हास्‍तरीय अधिवेशनाच्‍या वेळी माझी संतांशी भेट झाली. तेव्‍हा मी त्‍यांना ‘६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठण्‍यासाठी काय प्रयत्न करावे ?’, असे विचारले. संतांनी मला ध्‍येय ठेवून प्रयत्न करण्‍यास सांगितले आणि अन्‍य मार्गदर्शन केले. त्‍यानंतर मी त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे प्रयत्न केले.

काही दिवस मला पू. रमानंदअण्‍णा यांच्‍यासमवेत रहाण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा माझ्‍या मनातील ‘माझी ६१ टक्‍के प्रगती झाली पाहिजे’ ही इच्‍छा नष्‍ट झाली आणि मला ‘केवळ पू. अण्‍णांसमवेत रहावे अन् साधना वाढवावी’, असे वाटू लागले. गेल्‍या काही दिवसांपासून मला संतांच्‍या सहवासात असल्‍याचे जाणवायचे आणि संतांसह प्रभु श्रीराम दिसायचे. त्‍यामुळे सतत भावजागृती होत असे. आज संतांंच्‍या दिव्‍य उपस्‍थितीत माझी आध्‍यात्मिक प्रगती झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. याविषयी अत्‍यंत कृतज्ञता वाटून आनंद होत आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक