जत (जिल्हा सांगली) – येथील करजगी येथे बाळासाहेब जगताप हे तलाठी आहेत. तक्रारदाराच्या घराचे बांधकाम चालू असून बांधकामासाठी आलेल्या वाळूचा अवैध साठा केला आहे, असे सांगून, तसेच अवैध वाळू साठवणूक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी तलाठी जगताप यांनी तक्रारदारकडे ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली. पडताळणीनंतर लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराकडून रहात्या घरी ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना जगताप यांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात लाचखोर तलाठी बाळासाहेब जगताप यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जगताप हे दुसर्यांदा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. (पहिल्या वेळी पकडल्यावर त्यांना कठोर शिक्षा झाली असती, तर ते दुसरा गुन्हा करण्यास धजावले नसते. – संपादक)
७ जुलै २०१४ या दिवशी तक्रारदाराच्या खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची रक्कम घेतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्या वेळी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
संपादकीय भूमिका :प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्चपदस्थ अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्टाचारमुक्त करू शकलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांच्या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत ! |