१० वर्षांनंतर आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता !

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणाचा निकाल

गुजरात – येथील बेस्ट बेकरी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हे दोघे गेल्या १० वर्षांपासून कारागृहात होते. १३ डिसेंबर २०१३ या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. हे प्रकरण २१ वर्षांपूर्वीचे असून गुजरातमधील २०२२ च्या दंगलीशी संबंधित आहे.

२ आरोपींचे निर्दाेषत्व सिद्ध होण्यासाठी २१ वर्षे गेली ! – आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

खटल्यातील आरोपींना १३ वर्षांनंतर न्याय मिळाला. साक्षीदारांवर दबाव असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने हा खटला पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर न्यायालयाने तेच साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचे म्हटले. या कालावधीत न्यायाच्या प्रतीक्षेत ४ आरोपींपैकी २ जणांचा कारागृहातच मृत्यू झाला. उर्वरित २ आरोपींचे निर्दाेषत्व सिद्ध होण्यासाठी २१ वर्षे गेली. यामधील १० वर्षे तर निवळ या खटल्याच्या सुनावणीची वाट पहाण्यात गेली. १३ वर्षांनंतर न्याय मिळाला.

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांची प्रतिक्रिया

आरोपींचे दुसरे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर म्हणाले, ज्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीने आरोपींना शिक्षा झाली होती. त्यांना १३ जून या दिवशी सुनावणीच्या वेळी न्यायालयात बोलावण्यात आले होते. या तिघांनीही आरोपींना ओळखले नाही. त्यामुळे पुराव्यांअभावी न्यायालयाने आरोपींना निर्दाेषमुक्त केले.  कोणताही पुरावा नसतांना आरोपींना इतके वर्षे कारागृहात ठेवले गेले.

काय आहे प्रकरण?

वर्ष २००२ मध्ये गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत जमावाच्या आक्रमणात वडोदरा येथील बेस्ट बेकरी जाळून टाकण्यात आली होती. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. बेकरी जाळण्यापूर्वी तेथे लूटमारही करण्यात आली होती. याप्रकरणी बेकरीच्या मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरून २१ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. वर्ष २००३ मध्ये जलदगती न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ताता केली होती. या खटल्यात झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना न्यायालयाने ‘फितूर’ म्हणून घोषित केले होते. नंतर सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या साहाय्याने झहिराने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण गुजरातबाहेर चालवण्याचे निर्देश दिले. यानंतर हे प्रकरण मुंबईत वर्ग करण्यात आले होते.

हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांच्यासह अन्य दोघांना अन्वेषण यंत्रणेने अजमेर बाँबस्फोटप्रकरणीही अटक केली होती. मुंबईत चालवलेल्या खटल्यात या दोन्ही आरोपींना फरार घोषित करण्यात आले होते. मुंबई न्यायालयाने याप्रकरणी २१ पैकी ९ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर ८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल येईपर्यंत अनेक आरोपींचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ९ जणांपैकी ५ जणांची सुटका केली, तर २०१३ मध्ये अटक केलेल्या ४ पैकी २ आरोपींचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे कारागृहातच होते. त्यांचीही आता सुटका झाली.