पशूवैद्यकीय अधिकार्यांनी देयक संमत करूनही ४ मास पैसे रोखले
मुरगाव, ११ जून (वार्ता.) – सांकवाळ ग्रामपंचायतीकडून शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळेला आर्थिक साहाय्य देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात गोशाळेचे चालक डॉ. वायंगणकर यांनी आझाद मैदान, पणजी येथे पत्रकारांना माहिती दिली. याविषयी करणी सेनेच्या वतीने पशूपालन आणि पशूवैद्यकीय संचालनालयाला एका पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. गोशाळेला मोकाट गुरे व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळते. स्थानिक पशूवैद्यकीय अधिकार्यांनी गोशाळेचे आर्थिक साहाय्य संमत केले आहे; परंतु नोव्हेंबर २०२२ पासून सांकवाळ पंचायतीचे पंच डेरिक वालीस आणि सरपंच गिरीश पिल्लई यांनी कोणतेही कारण न देता हे आर्थिक साहाय्य रोखले आहे, अशी तक्रार करणी सेनेच्या वतीने संचालकांकडे करण्यात आली आहे.
याविषयी गोशाळेचे चालक डॉ. कालिदास वायंगणकर म्हणाले, ‘‘यापूर्वीही अशी घटना घडली आहे. मोकाट गुरे व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत गोशाळेला आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी मी जेव्हा पहिल्यांदा पंचायतीत अर्ज दिला, तेव्हा तेथील पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी ८ मास आमची देयके अडवून ठेवली. त्यानंतर त्याविषयी सर्व कागदपत्रे सिद्ध करून पंचायत संचालनालयाकडे तक्रार दिली होती; परंतु आजपर्यंत त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्या सचिवाचे नंतर स्थानांतर झाले. त्या जागी नवीन महिला सचिव आल्यानंतर त्यांनी ही देयके संमत केली. आताही पशूपालन संचालनालयाने देयके संमत करूनही पंचायतीने पैसे दिलेले नाहीत. पशूपालन संचालनालयाने त्यांचा योजनेअंतर्गतचा निधी पंचायतीकडे सुपुर्द केला आहे आणि पंचायतीचे काम केवळ संमत झालेल्या देयकानुसार धनादेश (चेक) काढणे एवढेच आहे. पंचायत स्वतः मोकाट गुरांविषयी कोणतीही उपाययोजना करत नाही आणि आम्ही मोकाट
गुरांना पाळतो, तर आमचे आर्थिक साहाय्य विनाकारण रोखून धरले जाते.’’
संपादकीय भूमिकागोशाळांना अशा प्रकारची वागणूक भाजपच्या राज्यात अपेक्षित नाही ! |