नैराश्याचे उदात्तीकरण !

छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी मेजवानी (पार्टी)चे आयोजन करण्यात आले होते. अशा मुलांना मानसिक आधार देण्यासाठी या मेजवानीचे आयोजन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी केल्याचे सांगितले. ही मुले या मेजवानीमध्ये एवढी बिनधास्त नाचली की, जणू काही ती पुष्कळ अधिक गुणांचा आनंद साजरा करत आहेत. मुलांना मानसिक आधार देण्यासाठी किंवा ती निराशेत गेली असतील, असे गृहित धरून त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारे मेजवानीचे आयोजन करणे म्हणजे नैराश्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. अशा मेजवान्यांमुळे ‘अनुत्तीर्ण झाले, तरी काही विशेष बिघडलेले नाही’, अशी चुकीची मानसिकताही होऊ शकते. निराशा जाण्यासाठी अशा मेजवान्या देणे म्हणजे मानसिक स्तरावर हाताळणे झाले. मुलांना नैराश्य येऊ नये म्हणून प्रसारमाध्यमांतून अनुत्तीर्ण होऊनही जीवनात यशस्वी झालेल्यांची उदाहरणेही दिली गेली. खरेतर ‘आपण उत्तीर्ण होऊ शकलो नाही’, याची खंत वाटून मुलांनी अधिक मेहनत करून अभ्यास करणे अपेक्षित आहे. या मेजवानीत खंत वाटणे तर दूरच; पण ही मुले धांगडधिंगा करत गाण्यांवर बिनधास्त थिरकत होती. त्यातून पुढील प्रयत्नांसाठी त्यांना काय प्रोत्साहन मिळणार ? मुलांनी टोकाचे पाऊल उचलू नये; म्हणून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी काढलेली ही उपाययोजना कितपत सयुक्तिक आहे ?

अशा मेजवानीपेक्षा ‘आलेल्या अपयशातून सुधारणा करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी मुलांचे प्रबोधन केले असते, तर ते अधिक योग्य झाले असते. अशा मेजवानीपेक्षा ‘मुले प्रयत्नांमध्ये नेमकी कुठे अल्प पडली ?’, याचे चिंतन करण्यास त्यांना प्रवृत्त केले असते आणि त्यासाठी त्यांना साहाय्य केले असते, तर त्याचा खरा लाभ झाला असता. त्यातून एक सकारात्मकता निर्माण होऊन, पुढील वेळेस चुका टाळून अधिक प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले असते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढला असता. मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते. समवेत निराशा, दुःख, ताण यांवर मात करणे सोपे गेले असते. तसेच साधनेने मन कणखर, समाधानी आणि आनंदी झाले असते.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे