आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा करणार !

बियाणे

अकोला – पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. शेतकर्‍यांची बियाणांच्या संदर्भात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्यशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.

अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार म्हणाले की,

१. ज्यांच्याकडे बनावट बियाणे आणि औषधे असतील किंवा खते असतील, त्यांनी तात्काळ ती नष्ट करावीत, अन्यथा राज्यपालांकडे मी पूर्ण अहवाल देणार आहे.

२. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ‘१ दिवस बळीराजासाठी’ हा आम्ही उपक्रम राबवला. त्यात राज्यातील १६ सहस्र शासकीय कर्मचारी-अधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली.

३. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित केली होती. या वेळी अकोला, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आमच्या अधिकार्‍यांनी ८७ ठिकाणी धाडी घातल्या. त्यात ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली, तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्याचे बातम्या आल्या.

४. मी पोलिसांना दूरभाष करून कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या, तसेच आमच्या कोणत्याही अधिकार्‍याने पैसे घेतले असल्याचे आढळून आल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे सांगितले.