व्‍यायामासाठी वेळ द्या !

आयुर्वेदानुसार दिनचर्या ही आदर्श दिनचर्या आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, योग्‍य प्रमाणात आहार घेणे, त्‍याच्‍या योग्‍य वेळा पाळणे, योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम करणे आदी गोष्‍टींचा समावेश होतो. सध्‍या शहरी जीवन अत्‍यंत धावपळीचे झाले आहे. त्‍यामुळे ‘दैनंदिन धावपळीच्‍या दिनचर्येत आयुर्वेदानुसार आचरण करणार तरी कसे ?’, असा प्रश्‍न बर्‍याच जणांना पडतो. औषधे घेण्‍याची सिद्धता असते; मात्र जिभेला आवर घालण्‍याची मानसिकता नसते. अयोग्‍य ते सोडून योग्‍य तेे करतांना मनाचा किती मोठा अडथळा आड येतो, हे येथे प्रकर्षाने लक्षात येते.

अनेक गोष्‍टींसाठी वेळ दिला जातो; पण शरीर निरोगी रहाण्‍यासाठी प्रतिदिन थोडा वेळ मात्र काढला जात नाही. शरीर निरोगी रहाण्‍यासाठी व्‍यायाम आवश्‍यक आहे; मात्र तो करण्‍यासाठी ‘वेळ नाही’, असे कारण सांगितले जाते. जसे खाण्‍यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे, तेवढाच योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम करणेही आवश्‍यक आहे. लवकर उठून केलेल्‍या योगाभ्‍यासामुळे शरिरातील त्‍याज्‍य पदार्थ बाहेर टाकले जातात. त्‍यामुळे शरीरशुद्धी होत रहाते, तसेच रोगांचे मूळ असलेल्‍या वात-पित्त-कफ यांचे संतुलन होते. त्‍यामुळे रोग होण्‍याचे प्रमाण उणावते. रोग झाल्‍यावर उपचार करण्‍यापेक्षा रोग होऊच नयेत, म्‍हणून आयुर्वेदीय दिनचर्या उपयुक्‍त ठरते.

व्‍यायामाचे गांभीर्य नसल्‍याने स्‍वतःचे शरीर आपण विविध विकारांचे घर बनवतोे. व्‍यायाम न केल्‍याचे दुष्‍परिणामही लक्षात घेतले पाहिजेत. निरुत्‍साही वाटते, ‘आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय’, असे होते. नवीन नवीन दुखणी मागे लागतात. त्‍यातून आपलाच वैद्यकीय व्‍यय वाढत रहातो. मग ‘आला दिवस ढकलायचा’, असे होते. ‘वयोमानानुसार दुखणी पाठ धरणारच’, असाही एक विचार मनात पक्‍का झालेला आहे. एवढेच काय; पण आजकालच्‍या रहाणीमानामुळे युवा अवस्‍थेत आरोग्‍याच्‍या कुरबुरी असणारेही आता वाढत आहेत. व्‍यायाम टाळणार्‍या सर्वांकडूनच १०० टक्‍के मनाप्रमाणे वागले जाते. एखाद्या सूत्रानुसार ‘जमत नाही’, तर ‘ते कसे जमेल ?’, त्‍यासाठी सोप्‍या पद्धतीने, टप्‍प्‍याटप्‍प्‍याने प्रयत्न केले पाहिजेत. काहीच न करता हातावर हात ठेवून बसल्‍यावर कसे होणार ? निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.