औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्‍यजीत तांबे, आमदार

हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नाशिक – औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? मग आताच त्‍याचे चित्र का झळकू लागले आहे ? त्‍याचा विचारही तरुणांनी करणे आवश्‍यक आहे. संगमनेरसह कोल्‍हापूरला झालेला प्रकार निंदनीयच आहे; मात्र तरुणांचा वापर स्‍वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. औरंगजेबाचे चित्र अचानक झळकण्‍याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. तरुणांनी आता जागे व्‍हावे, चांगले काय, वाईट काय ? ते बघावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्‍यजीत तांबे यांनी ९ जून या दिवशी नाशिक येथे केले.

( संग्रहीत छायाचित्र )

तांबे पुढे म्‍हणाले की, शिक्षण विभागाचा कारभार २० ते २५ वर्षांपासून चर्चेत आहे. शिक्षक इतर कामात गुंतत चालले आहेत. त्‍यामुळे शैक्षणिक दर्जा सोडून ते इतर कामात व्‍यस्‍त आहेत. शिक्षण आयुक्‍तांनी शिक्षकांची चौकशी करावी, याविषयी पत्र दिले आहे. ही अवस्‍था चिंताजनक आहे. शिक्षण आणि आरोग्‍य हे देशाचा कणा आहे. यात भ्रष्‍टाचार नको, तर शासनाने पैसे टाकले पाहिजेत. महसूल, पोलीस या विभागांत एखादा दोषी असतो, त्‍यामुळे तो वाचण्‍यासाठी पैसे देतो. शिक्षण आणि आरोग्‍य या २ क्षेत्रांमध्‍ये भ्रष्‍टाचाराची वाढलेली व्‍याप्‍ती, ‘भ्रष्‍टाचाराचे थेट दरपत्रक घोषित होणे’ हे त्रासदायक आहे.