५३ वर्षांची प्रतीक्षा !

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ जून २०२३ या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) येथील सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. ५३ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प मार्गी लागला आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प सरासरी ३ ते ४ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. वर्ष १९७० मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली, त्या वेळी याचा अपेक्षित व्यय (खर्च) ८ कोटी रुपये इतका होता; परंतु वर्ष २०२३ मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो आता तब्बल ५ सहस्र १६९ कोटी रुपयांवर पोचला आहे.

अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील पाणीटंचाईची समस्या, तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी या धरणाचे पाणी उपयुक्त ठरणार आहे. असे असतांना ५ दशके हा प्रकल्प झुलत का ठेवला ? हा यक्षप्रश्न आहे. वर्ष १९७० ते २०२३ या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रात सत्तेवर असणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी या धरणाकडे दुर्लक्ष का केले ? जनतेच्या अडचणी, प्रश्न सोडवण्यात झालेली ही दिरंगाई अक्षम्य आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आतापर्यंतच्या सरकारांनी केलेले पराकोटीचे दुर्लक्ष अन् निष्काळजीपणा यांचा दृश्य परिणाम म्हणजे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ५ सहस्र १६९ कोटी रुपये व्यय करावे लागले आहेत. ५ दशकांहून अधिक काळ स्थानिक जनता तोंड देत असलेली पाणीटंचाई, अपुर्‍या जलपुरवठ्याने सामान्यांची झालेली परवड, पाण्याअभावी थांबलेला विकास हे झाले उपरोक्त घटनेचे अदृश्य परिणाम !

शासनकर्त्यांपासून प्रशासकीय स्तरापर्यंत असणारा भ्रष्टाचार, प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनकर्ते आणि प्रशासन यांच्या इच्छाशक्तीचा अभाव अन् जनतेची उदासीनता अशा सार्‍याच गोष्टी याला उत्तरदायी आहेत. जनतेच्या अडचणी समजण्याची संवेदनशीलता स्वार्थी आणि भ्रष्ट काँग्रेसच्या शासनकर्त्यांमध्ये कधी नव्हतीच. अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एवढा विलंब होण्यास उत्तरदायी असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडूनच धरणासाठी झालेला अतिरिक्त खर्च वसूल करायला हवा, तसेच प्रकल्प पूर्ण न होण्यामध्ये लक्षात आलेली कारणे दूर करण्यासह त्यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाईही झाली पाहिजे. याचसमवेत अशा प्रकारचे अन्य कोणते प्रकल्प प्रदीर्घ कालावधीपासून अपूर्ण आहेत, हे बघून ते पूर्णत्वास जातील, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.