छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु एकता दिंडी’द्वारे हिंदुत्‍वाचा नाद घुमला !

सपत्नीक पालखी पूजन करतांना पू. यशवंत शिवणगिरीकर महाराज

छत्रपती संभाजीनगर – हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातून ‘हिंदु एकता दिंडी’ काढण्‍यात आली. पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेतलेले आणि भगवे फेटे परिधान केलेले हिंदुत्‍वनिष्‍ठ, तसेच वारकरी पथक, लहान मुलांच्‍या ऐतिहासिक व्‍यक्‍तीरेखा यांमुळे छत्रपती संभाजीनगरातील वातावरण भारावून गेले होते. दिंडीत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी ठेवण्‍यात आली होती.

फेरीचा प्रारंभ स्‍वातंत्र्यवीर सावरकर चौकात श्री. शरद पाटील यांनी शंखनाद करून झाला. त्‍यानंतर सनातन संस्‍थेचे  पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन आणि धर्मध्‍वजाला पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. या वेळी श्री. विश्‍वास नागापूरकर यांनी पौरोहित्‍य केले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या पालखीचे पूजन वडोद येथील नाथ संप्रदायाचे पूजनीय यशवंत शिवणगिरीकर महाराज यांनी सपत्नीक पूजन केले. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामदैवत श्री संस्‍थान गणपति पालखीचे पूजन प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. भावेश सराफ यांनी सपत्नीक केले अन् नारळ वाढवला. पावन गणपति मंदिर येथे दिंडीची सांगता झाली. सांगतेच्‍या वेळी धर्मयोद्धा संघटनेचे अध्‍यक्ष नागेश्‍वरानंद महाराज, तसेच सनातन संस्‍थेच्‍या सौ. छाया देशपांडे यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

क्षणचित्रे

१. दिंडीत सहभागी होण्‍यासाठी छत्रपती संभाजीनगरहून ४० किलोमीटर अंतराहून लहान मुलांचे वारकरी पथक आले होते.

२.  ८५ वर्षीय आजोबा पूर्ण दिंडी पायी चालले.

३. रणरागिणी पथकासाठी श्री. पंकज कटारिया यांनी विंटेज कार उपलब्‍ध करून दिली.

४. नागरिक पालखीचे जवळून दर्शन घेऊन पुष्‍प अर्पण करत होते.

५. तरुण वर्ग पालखी समवेत सेल्‍फी घेत होते.

दिंडीत सहभागी विविध पथके !

रणरागिणी पथक, तुळसी वृंदावन पथक, कळस पथक, ध्‍वज पथक, ग्रंथ दिंडी, कराटे प्रात्‍यक्षिक पथक, प्रथमोपचार पथक, अधिवक्‍ता पथक, महिला पथक, वारकरी पथक, टाळ पथक, बाल पथक अशी विविध पथके आणि प्रात्‍यक्षिके दिंडीच्‍या मार्गात सादर करण्‍यात आले.

दिंडीतील धर्मध्‍वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्‍याकडून भावपूर्ण पूजन !

छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर श्री. नंदकुमार घोडेले यांनी दिंडीच्‍या प्रारंभी पालखीचे दर्शन घेतले. तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार येथे श्री. शिवाजी पात्रीकर यांनी दिंडीचे स्‍वागत केले. श्री. ब्रिज मोहन तेटवार आणि धर्मप्रेमी यांनी पैठण गेट येथे पुष्‍पवृष्‍टी केली. टिळकपथ येथे दिंडीचे स्‍वागत, धर्मध्‍वजाचे पूजन, तसेच पाणी वाटप श्री. प्रमोद नरवडे पाटील यांनी केले. शिवसेनेचे नगरसेवक आणि विभाग प्रमुख श्री. सचिन खैरे यांनी गुलमंडी चौक येथे दिंडीचे स्‍वागत आणि धर्मध्‍वजाचे पूजन केले. ब्राह्मण महासंघाचे श्री. उमेश कुलकर्णी, श्री. मिलिंद दामोदरे,

श्री. संजय मांडे, श्री. जगदीश हरसुलकर, पतीत पावन संघटनेचे श्री. प्रवीण कडपे, श्री. राजन मेगावाले, श्री. संतोष तेरकर यांनी दिंडीवर पुष्‍पवृष्‍टी केली. महात्‍मा फुले चौक येथे शिवसेना जिल्‍हाप्रमुख श्री. राजेंद्र जंजाळ आणि शिवसेनेचे मध्‍य विभाग प्रमुख श्री. गोपाल कुलकर्णी यांनी धर्मध्‍वजाचे पूजन केले. शिवसेना विभाग प्रमुख व श्री संगम युवक क्रीडा मंडळ अध्‍यक्ष संस्‍थापक श्री. प्रितेश जयस्‍वाल यांनी नारळीबाग कॉर्नर येथे दिंडीचे स्‍वागत, धर्मध्‍वज पूजन केले. महामंडलेश्‍वर शंतिगिरिजी महाराज यांचे शिष्‍य श्री. रामानंद महाराज यांची वंदनीय उपस्‍थिती होती.