‘वैशाख कृष्ण पक्ष षष्ठीच्या शुभतिथीला फर्मागुडी, गोवा येथील मैदानावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सवा’च्या रूपात अत्यंत हर्षाेल्हासात साजरा झाला. हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य होता की, या सोहळ्याला उपस्थित असणार्या साधकांना हा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पाहिल्याचे पूर्ण समाधान लाभले. देवाच्या कृपेने बुद्धीअगम्य असणार्या या अलौकिक, दिव्य आणि भव्य ब्रह्मोत्सवाचे झालेले सूक्ष्म परीक्षण शब्दबद्ध करणे कठीण आहे. त्यामुळे ब्रह्मोत्सवाची अनुभूतीच घेणे इष्ट ठरेल, तरीही श्री गुरुआज्ञेचे पालन करण्यासाठी माझ्या अल्पशा मतीला जे उमजले, ते येथे लेखाच्या रूपाने शब्दबद्ध करून ही लेखरूपी भावसुमनांजली श्री गुरूंच्या परम पावन चरणी अर्पण करत आहे.
१. विविध रंगांचे प्रकाशझोत पृथ्वीवर आल्याने पृथ्वीवरील स्थळ आणि वायूमंडल यांची शुद्धी होणे
११.५.२०२३ या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत आकाशातून पृथ्वीवर पिवळसर, निळसर, गुलाबी, तांबूस आणि पांढर्या अशा विविध रंगांच्या छटांतील दैवी प्रकाशांचे झोत येत होते. यावरून ‘स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या उच्च लोकांमध्ये’, निवास करणार्या विविध दैवी शक्तींच्या प्रवाहांचे प्रकाशझोतांच्या माध्यमातून पृथ्वीवर शुभागमन झाल्याचे आणि ते सर्व जण श्रीविष्णूच्या आगमनासाठी आधीच सिद्ध झाल्याचे जाणवले, तसेच या प्रकाशझोतांमुळे उच्च लोकांतील चैतन्याचा प्रवाह पृथ्वीवर येऊन पृथ्वीचे स्थळ आणि वायूमंडल यांचे शुद्धीकरण झाल्याचे जाणवले.
२. ब्रह्मोत्सव
२ अ. ब्रह्मोत्सव किंवा आनंदोत्सव यांचा अर्थ : जेव्हा आध्यात्मिक उन्नतांमधील परमेश्वरीय तत्त्व प्रगट होऊन जागृत होते, तेव्हा त्यांच्याकडून संपूर्ण विश्वात चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन अनंत कोटी जिवांना त्याची अनुभूती येते. त्यामुळे संपूर्ण सृष्टीच या आनंदडोहात न्हाऊन निघते आणि ब्रह्मानंद अनुभवणारे जीव परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे या उत्सवाला ‘ब्रह्मोत्सव’ किंवा ‘आनंदोत्सव’ असे संबोधले जाते.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्यातील परमेश्वरी तत्त्व, म्हणजे ब्रह्मतत्त्व प्रकट झाल्यामुळे ते परब्रह्मस्वरूप झाले. त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव हा सप्तर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ‘ब्रह्मोत्सवा’ च्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
३. विविध प्रकारचे उपउत्सव आणि त्यांचे स्वरूप !
३ अ. रथोत्सव
श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सोनेरी रंगाच्या रथावर आरूढ होऊन कार्यक्रमस्थळी पोचले. या रथाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ १. रथाची निर्मिती साक्षात् देवशिल्पी विश्वकर्माने केल्यामुळे त्यात वैकुंठातील श्रीविष्णूच्या दिव्य रथाचे ३० टक्के तत्त्व कार्यरत होणे : या रथाची निर्मिती साक्षात् देवशिल्पी विश्वकर्माने कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील संत पू. काशिनाथ कवटेकर यांच्या माध्यमातून सनातनच्या साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून करवून घेतली आहे. त्यामुळे या रथामध्ये वैकुंठातील श्रीविष्णूच्या दिव्य रथाचे ३० टक्के तत्त्व आकृष्ट होऊन ते पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले आहे. त्यामुळे स्थूल डोळ्यांना दिसणारा हा भूलोकीचा रथ, म्हणजे साक्षात् श्रीविष्णूचा वैकुंठातील दिव्य सुवर्ण रथच आहे.
३ अ २. श्रीविष्णुरथावर लावलेल्या सुवर्ण रंगाच्या ध्वजावर एकीकडे ‘सूर्यनारायण’ आणि दुसरीकडे ‘ॐ’ यांचे चिन्ह अंकित करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : श्रीविष्णुरथावर लावलेल्या सुवर्ण रंगाच्या ध्वजावर एकीकडे ‘सूर्यनारायण’ आणि दुसरीकडे ‘ॐ’ ही चिन्हे अंकित केली होती. सूर्यनारायणाच्या चिन्हातून सगुण-निर्गुण आणि ‘ॐ’ या चिन्हातून निर्गुण-सगुण स्तरावरील दैवी शक्ती अन् चैतन्य वातावरणात कार्यान्वित झाले होते. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ज्ञान, मोक्ष, अवतारी, समष्टी, विश्व आणि जगत गुरु असल्यामुळे ते सगुण स्तरावर सूर्यनारायणाप्रमाणे अन् निर्गुण स्तरावर ‘ॐ’काराप्रमाणे समस्त सृष्टीच्या कल्याणाचे दैवी कार्य अखंड करतात. त्यामुळे ते अखिल ब्रह्मांडाचे ‘ब्रह्मांड गुरु’ आहेत.
३ अ ३. ‘ब्रह्मांडातील पुण्यात्मे, धर्मात्मे आणि ऋषिमुनी साधकांच्या रूपात श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आरूढ झालेला दिव्य रथ ओढत आहेत’, असे जाणवणे : जेव्हा हा दिव्य रथ मैदानात आखणी केलेल्या निर्धारित मार्गावरून जात होता, तेव्हा ‘ओडिशा राज्यातील श्री जगन्नाथपुरी येथील श्री जगन्नाथ देवाचा रथ ज्याप्रमाणे श्रीमन्नारायणाचेच भक्त ओढत असतात’, तसे ‘ब्रह्मांडातील पुण्यात्मे, धर्मात्मे आणि ऋषिमुनी साधकांच्या रूपात श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आरूढ झालेला दिव्य रथ ओढत आहेत’, असे मला जाणवले, तसेच ज्याप्रमाणे तिरुपति बालाजी यांचा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हा ब्रह्मोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. त्यामुळे श्रीविष्णूच्या श्री जगन्नाथ आणि श्री तिरुपति बालाजी या दोन्ही रूपांचे भव्य अन् दिव्य स्वरूप एकवटलेल्या श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सवरूपी हा दिव्य सोहळा पहाण्यासाठी ‘सूर्य, चंद्र, अग्नी, वायु, पर्जन्य, इंद्र, यम आणि कुबेर’, हे अष्टलोकपाल (आठ लोकांचे स्वामी) तसेच ‘इंद्र, यम, वरुण, कुबेर, अग्नि, निऋति, वायु आणि ईशान’ हे अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी), आप, ध्रुव, सोम, धर्म, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास’ हे अष्टवसु (गणदेवता) तसेच यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषिमुनी, देवता इत्यादी दैवी शक्ती आकाशमंडलात जमल्याचे जाणवले.
३ अ ४. मैदानात रथ फिरत असतांना या दिव्य रथावर आरूढ झालेल्या तिन्ही मोक्षगुरूंनी संपूर्ण ब्रह्मांडात विहार करून प्रत्येक लोकातील जिवांचे प्रीतीमय दृष्टीने अवलोकन केल्याचे जाणवणे : हा रथ जेव्हा कार्यस्थळी फिरत होता, तेव्हा ‘श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत संपूर्ण ब्रह्मांडात विहार करून प्रत्येक लोकातील जिवांचे प्रीतीमय दृष्टीने अवलोकन करत आहेत’, असे जाणवले. या तिन्ही मोक्षगुरूंच्या रूपाने वैकुंठच पृथ्वीवर अवतरले असून कार्यस्थळ, म्हणजे ‘भूवैकुंठ’ झाल्याचे जाणवले.
३ अ ५. ‘भगवंतासमवेत त्याचा संपूर्ण व्यूहच पृथ्वीवर अवतरला आहे’, अशी अनुभूती रथोत्सवाच्या वेळी येणे : रथोत्सवात ब्रह्मांडातील समस्त देवतांनी श्रीमन्नारायणाची वैकुंठापासून पृथ्वीपर्यंत, म्हणजे भूलोकापर्यंत भव्य मिरवणूक किंवा शोभायात्रा काढल्याचे जाणवले. अशा प्रकारे जेव्हा अवतार भूलोकी अवतरतो, तेव्हा त्याला साहाय्य असणार्या दैवी शक्तीही विविध रूपांत भूलोकी अवतरतात. यालाच ‘भगवंताच्या व्यूहाचे धरणीवर अवतरण होणे’, असे म्हणतात.
३ अ ६. वीर हनुमान, श्रीविष्णुवाहन गरुड आणि श्रीविष्णूचे श्रेष्ठतम भक्त देवर्षि नारद यांनी ब्रह्मोत्सवाचे संचालन केल्याचे जाणवणे : जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आरूढ असलेला दिव्य रथ व्यासपिठासमोर स्थित झाला, तेव्हा रथाच्या वरच्या भागात हातामध्ये गदा घेऊन रथाच्या रक्षणासाठी वीर हनुमान, रथाच्या खालच्या भागात हात जोडलेल्या भावमुद्रेतील श्रीविष्णुवाहन गरुड आणि रथाच्या डावीकडे मंजुळ स्वरात गायनाच्या स्वरूपात श्रीविष्णुस्तुती करणारे महामुनी तुंबरु अन् उजवीकडे अखंड श्रीविष्णुनामाचे गुणगान करणारे आणि नारदीय वीणावादन करणारे परम श्रीविष्णुभक्त देवर्षि नारद साक्षात् उपस्थित राहून ब्रह्मोत्सवाचे संचालन करत असल्याचे जाणवले.
३ अ ७. ब्रह्मोत्सवाच्या वेळी देवता आणि असुर यांच्यामध्ये झालेले सूक्ष्म युद्ध : ब्रह्मोत्सव चालू असतांना ७ व्या पाताळातील मायावी आसुरी शक्तींनी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आक्रमण केले. तेव्हा रथाच्या भोवती ब्रह्मचैतन्याचे सोनेरी रंगाचे तारक आणि दिव्य शक्तीचे लाल रंगाचे मारक अशा दोन्ही तत्त्वांचे संरक्षककवच कार्यरत झाले होते. त्यामुळे रथाच्या भोवती कार्यरत असणार्या सोनेरी रंगाच्या ब्रह्मचैतन्याच्या संरक्षककवचाने मायावी शक्तींची मायावी सिद्धी आकर्षण शक्तीच्या साहाय्याने खेचून घेऊन वाईट शक्तींचे मायावी स्वरूपाचे आक्रमण निष्फळ केले. दैवी आणि वाईट शक्तींमध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे रथातून सूक्ष्मातून पुष्कळ वेगाने ठिणग्या बाहेर पडत असल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले, तसेच रथाच्या भोवती कार्यरत असणार्या लाल रंगाच्या दिव्य शक्तीच्या संरक्षककवचातून देवतांची गदा, बाण, तलवार, खड्ग, त्रिशूळ, पाश, अंकुश, परशु, दंड इत्यादी दिव्य शस्त्रास्त्रे वाईट शक्तींच्या दिशेने फेकली जाऊन त्यांचा मारा वाईट शक्तींच्या सेनेवर झाल्यामुळे त्यांनी घाबरून युद्धभूमीतून (कार्यक्रमस्थळातून) पलायन केले. दिव्य रथाच्या वर श्रीमन्नारायणाचे भव्य सुदर्शनचक्र हे निर्गुण स्तरावरील आणि श्रीसूर्यनारायणाच्या हातातील सुदर्शनचक्र हे सगुण स्तरावरील दिव्य रथावर सूक्ष्मातून होणारी वाईट शक्तींची आक्रमणे परतवून लावत होते. जेव्हा दिव्य रथावर ‘ड्रोन’ या आकाशात उडणार्या उपकरणाद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तेव्हा हा आकाशात उडणारा ड्रोन अनियंत्रित होऊन तो रथावर न कोसळता रथाच्या डावीकडे समोरच्या बाजूला जाऊन कोसळला. अशा प्रकारे वाईट शक्तींनी केलेली सूक्ष्मातील आक्रमणे ‘ड्रोन’ या उपकरणाने स्वत:वर झेलून त्याने तिन्ही मोक्षगुरूंचे स्थुलातून होणार्या अपघातापासून रक्षण केल्याचे जाणवले.
३ अ ८. दिव्य रथाने विविध ठिकाणी सूक्ष्मातून भ्रमण करणे : हा दिव्य रथ कधी भूमीवर, तर कधी ढगांच्या वर आकाशात भ्रमण करून आसुरी सेनेशी लढत होता, तर कधी विविध लोकांतून भ्रमण करून आकाशमंडलात जमलेल्या विविध भक्तांवर कृपा करत होता.
३ आ. दीपोत्सव
जो उत्सव सात्त्विक दिव्यांची ज्योत प्रज्वलित करून साजरा केला जातो, त्यास ‘दीपोत्सव’ म्हणतात. सायंकाळी आश्रमात सर्वत्र स्थुलातून कलश आणि अन्य आकाराच्या रांगोळीच्या भोवती पणत्या लावल्या होत्या. त्यामुळे आश्रमात ‘दीपोत्सव’ साजरा झाल्याचे जाणवले. २१ स्वर्गलोकांपैकी ‘ज्योत्स्नापूर’ या उपस्वर्गलोकातील ‘ज्योत्स्नारूप’, म्हणजे ‘ज्योतीस्वरूप असणार्या देवतांचा एक समूह’, या दिव्यांच्या ज्योतींमध्ये सूक्ष्म रूपाने कार्यरत झाला होता. त्यामुळे संपूर्ण आश्रम आनंदस्वरूप दिव्य तेजाने उजळून निघाला होता.
३ इ. दिव्योत्सव
ज्या उत्सवाला ब्रह्मांडातील समस्त दैवी शक्ती उपस्थित असतात, त्या उत्सवाला ‘दिव्योत्सव’ म्हणतात. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात नैमिषारण्य, हिमालय यांसमवेत संपूर्ण ब्रह्मांडातील ८८ सहस्र ऋषीमुनी, स्वर्गलोकातील समस्त देवदेवता आणि संपूर्ण विश्वातील दिव्यात्मे, पुण्यात्मे अन् धर्मात्मे, तसेच विविध सिद्धपुरुष, योगी, तपस्वी आणि उन्नत सहभागी झाले होते. त्यामुळे उत्सवात ब्रह्मांडातील समस्त दैवी शक्ती कार्यरत होऊन या उत्सवाला दैवी स्वरूप प्राप्त होऊन हा उत्सव ‘दिव्योत्सव’ झाला होता.
४. ब्रह्मोत्सवामध्ये घडलेल्या प्रमुख घडामोडींचे सूक्ष्म परीक्षण
४ अ. पुष्पवृष्टी करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर ‘ड्रोन’ या हवेत उडणार्या उपकरणाद्वारे दोन वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. तेव्हा आकाशामध्ये स्थित असणारे देवगुरु बृहस्पती, अरुंधतीसहित सप्तर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षि, राजर्षि, महर्षि, शिव-पार्वती, ब्रह्मा-श्रीविष्णु, श्रीगणेश आणि रिद्धि-सिद्धि, कार्तिकेय आणि कार्तिकेयाच्या दोन पत्नी देवसेना अन् वल्ली यांनी स्वर्गातील नंदनवनात उगवणार्या अत्यंत दुर्मिळ आणि सुवासिक असणार्या सोनेरी अन् चंदेरी रंगाच्या कमळ, गुलाब इत्यादी पुष्पांची वृष्टी अत्यंत भक्तीभावाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर केली. पुष्पवृष्टीच्या वेळी वायुदेवाने थंड वार्याची झुळूक आणून वातावरण शीतल केले आणि या दैवी फुलांचा सुवास सर्वदूर पोचवला. श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीवर झालेल्या दैवी पुष्वृष्टीमुळे संपूर्ण धरा (पृथ्वी) पुलकित होऊन भावविभोर झाली. पंचमहाभूते (पृथ्वीतत्त्व, आपतत्त्व, तेजतत्त्व, वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व) त्यांच्या दिव्यस्वरूपात या उत्सवात सूक्ष्म रूपाने उपस्थित राहून या दिव्य सोहळ्यातील आनंदाचा आस्वाद घेत होती. त्यामुळे ब्रह्मोत्सवामुळे संपूर्ण ब्रह्मांडच आनंदाने डोलत होते.
४ आ. वेदमंत्रपठणाच्या वेळी चारही वेदपुरुषांनी सनातनच्या वेदपाठशाळेतील पुरोहितांच्या माध्यमातून वेदमंत्रपठण करून श्रीमन्नारायणाच्या चरणी त्यांची सेवा समर्पित करणे : सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी जेव्हा वेदमंत्रपठण केले, तेव्हा हे दिव्य मंत्र ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदपुरुषांनी पुरोहितांच्या माध्यमातून म्हटले. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला दीप्तीमान करणार्या सवितृदेवतेचे तत्त्व आणि तेज (वेदकालीन आणि सूर्याला तेज प्रदान करणारी देवता) कार्यरत होऊन ते ‘धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य’ यांचे प्रतीक असणार्या श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाले. त्यांची स्तुती करण्यासाठी चारही वेदपुरुषांनी वेदमंत्रांचे उच्चारण समर्पितभावाने करून श्रीमन्नारायणाच्या चरणी त्यांची सेवा समर्पित केली. सृष्टीच्या आरंभी जेव्हा वेद पहिल्यांदा प्रगट झाले होते, तेव्हा वेदांचे ‘श्रुति’ म्हणजे ‘श्रवण करून शकतो असे ‘नादमय’ आणि ‘स्मृति’ म्हणजे ‘प्रकाशरूपाने पाहून ज्यांचे स्मरण करू शकतो असे ‘शब्दमय’ असणारे’, अशी दोन अंगे प्रगट झाली होती. वेदमंत्रपठणाच्या वेळी सद्गुरुद्वयींमध्ये श्रीविष्णूची ‘धारणाशक्ती’ म्हणजे ‘दैवी तत्त्व कोणत्याही स्वरूपात धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता’ जागृत झाली. त्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये वेदांचे श्रुतिमय आणि भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये वेदांचे स्मृतिमय तत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्या स्थूल देहाभोवती नादमय सोनेरी रंगाचे दीप्तीमंडल कार्यरत झाले आणि त्या अधिकच तेजस्वी अन् दिव्यतम दिसू लागल्या.
४ इ. भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पावन चरणी पुष्पार्चना करून त्यांना वंदन करणे : श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूर्यनाडीचे प्रतीक असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या परम पावन उजव्या चरणावर पाच प्रकारची फुले अत्यंत समर्पित आणि शरणागत भावाने वाहिली. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातून पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित झाली. त्यामुळे ब्रह्मांडात वाढलेल्या तमोगुणी शक्तीच्या लहरींचे विघटन होऊन वातावरणातील दाब न्यून झाला.
श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चंद्रनाडीचे प्रतीक असणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या परम पावन डाव्या चरणावर पाच प्रकारची फुले अत्यंत कृतज्ञता आणि शरणागत भावाने वाहिली. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चंद्रनाडी कार्यरत होऊन त्यातून पुष्कळ प्रमाणात तारक शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित झाली. त्यामुळे ब्रह्मांडात वाढलेल्या रजोगुणी शक्तीच्या लहरींचे विघटन होऊन वातावरणातील उष्णता न्यून झाली आणि वातावरण शीतल झाले.
जेव्हा सद्गुरुद्वयींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदनभक्तीने नमन केले, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ब्रह्मनाडी कार्यरत होऊन त्यांच्या सहस्रारातील ब्रह्मज्ञानाचे प्रतीक असणारे ब्रह्मकमळाप्रमाणे दिसणारे सहस्रदलकमळ उमलून त्यातून निर्गुण-सगुण स्तरावरील ईश्वरी चैतन्याचा झोत दशदिशांनी संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित झाला. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी कार्यरत होऊन अनेक जिवांचा उद्धार झाला.
४ ई. सनातन संस्थेतील विविध विभागांमध्ये तसेच विविध योगमार्गांनुसार आणि गुणकौशल्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण सेवा करणार्या साधकांची ओळख करून देणे : कार्यक्रमामध्ये ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि एस्.एस्.आर्.एफ्’, यांच्या माध्यमांतून विविध विभागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा करणारे आणि धर्मप्रसार करणारे अनेक सद्गुरु, संत आणि साधक यांची ओळख करून देण्यात आली. तेव्हा श्रीविष्णूच्या अवतारी कार्यात योगदान देण्यासाठी ब्रह्मांडातील विविध देवतांची तत्त्वे विविध विभागांमध्ये आणि विविध योगमार्गांनुसार वैशिष्ट्यपूर्ण सेवा करणार्या साधकांच्या माध्यमातून कार्यरत झाल्याचे जाणवले, उदा. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून सेवा करणारे साधक श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. नीलेश सांगोलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या माध्यमातून धर्मराज रूपी न्यायदेवता, स्थापत्यशास्त्राच्या माध्यमातून सेवा करणार्या साधिका सौ. शौर्या मेहता यांच्या माध्यमातून देवशिल्पी विश्वकर्मा, कलाविभागाच्या माध्यमातून सेवा करणार्या साधकांच्या माध्यमातून यक्ष आणि श्रीविष्णु यांची कलाशक्ती, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून श्रीगणेश आणि श्रीसरस्वती देवी, संगीत विभागाच्या अंतर्गत सेवा करणार्या साधकांच्या माध्यमातून किन्नर, गंधर्व, अप्सरा तसेच शिव अन् सरस्वती देवी यांची तत्त्वे कार्यरत झाली. या साधकांवर तिन्ही मोक्षगुरूंची कृपादृष्टी पडल्यामुळे त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा झाली. तसेच ‘या साधकांची त्यांच्या योगमार्गांनुसार (कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी) व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर साधना होऊन त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षप्राप्त व्हावा’, असा कृपाशीर्वाद तिन्ही मोक्षगुरूंनी या साधकांना दिला.
४ उ. सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करून दिव्य सोहळ्याची सांगता करणे : संपूर्ण ब्रह्मोत्सवामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना श्रीविष्णूचे दशावतार, तसेच श्रीविठ्ठल, श्रीजगन्नाथ, श्रीतिरुपति बालाजी, श्रीनाथजी, मुरलीधर कृष्ण, गोवर्धनधारी कृष्ण, सुदर्शनचक्रधारी कृष्ण, चतुर्भुज रूपातील महाश्रीविष्णु, गरुडावर स्वार झालेला श्रीविष्णु, शेषशायी श्रीविष्णु अशा विविध रूपांमध्ये दर्शन दिले. ब्रह्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याची सांगता श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या प्रती कृतज्ञतेने करण्यात आली. त्या वेळी सर्व साधकांच्या मनातील भक्तीभावाने रंगीबेरंगी फुलांचे रूप धारण करून ही फुले श्रीगुरुचरणी पुष्पांजलीच्या रूपाने अर्पण झाली.
४ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिव्य सोहळ्याच्या स्थानातून सनातनच्या रामनाथी आश्रमाकडे प्रस्थान करणे : जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिव्य सोहळ्याच्या स्थानातून प्रस्थान केले, तेव्हा श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या समवेत असणार्या श्रीविष्णूच्या गरुडावर स्वार झालेल्या दिव्य रूपाने भूलोकातून वैकुंठाकडे सूक्ष्मातून गमन केले. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये जागृत झाले महाविष्णूचे तत्त्व हळूहळू अप्रगट अवस्थेत गेले आणि त्यांचे शेषशायी हे निर्गुण अवस्थेतील तत्त्व कार्यरत झाले. त्याचप्रमाणे भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये जागृत झालेले देवीतत्त्व हळूहळू अजागृत, म्हणजे अप्रगट अवस्थेत गेले, तसेच ब्रह्मोत्सवाला आलेल्या विविध दैवी शक्तींनी श्रीविष्णूस्वरूप गुरुदेवांना भावपूर्ण वंदन करून त्या स्वलोकी परतल्या.
४ ए. सप्तर्षींच्या आज्ञेवरून ब्रह्मोत्सवाला उपस्थित असलेल्या साधकांनी रथाचे भावपूर्णरित्या दर्शन घेणे : ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी ठेवलेल्या सुवर्ण रंगाच्या रथामध्ये वैकुंठातील श्रीविष्णूच्या
रथातील ३० टक्के तत्त्व आकृष्ट झाले होते. या रथामध्ये साक्षात् श्रीविष्णुस्वरूप असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झाल्यामुळे हा रथ दिव्य रथ बनून तो श्रीविष्णूचा रथ झाला. त्यामुळे जेव्हा साधकांनी या रथाचे दर्शन घेतले, तेव्हा सोनेरी पंख असलेल्या विशाल गरुडावर स्वार झालेले श्रीमहालक्ष्मीदेवी आणि श्रीभूदेवी समवेत असलेल्या महाविष्णूचे सूक्ष्म रूप प्रत्येक साधकाच्या हृदयमंदिरात प्रविष्ट झाले अन् तेथे कायमस्वरूपी स्थित झाले. त्यामुळे साधकांकडे श्रीविष्णूच्या अवतारी, सौदामिनी आणि योग या तिन्ही प्रकारच्या शक्तींचा प्रवाह प्रवाहित झाला अन् त्यांच्याभोवती निळसर रंगाची किनार असलेली सोनेरी रंगाची आभा असलेले संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होणार आहे.
५. ब्रह्मोत्सवाचे स्वरूप अत्यंत दैवी आणि परिपूर्ण असणे
संपूर्ण ब्रह्मोत्सवाचे आयोजन, नियोजन, ध्वनिचित्रीकरण इत्यादी अनेक सेवा अत्यंत अचूक, परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्याचे जाणवले. ब्रह्मोत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण मैदानाची रचना, बैठक व्यवस्था आणि प्रसारातून म्हणजे विविध जिल्ह्यांतून आलेल्या सहस्रो साधकांचे नियोजन उत्कृष्ट होते. ब्रह्मोत्सवाचे स्वरूप, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या कार्यप्रणालीचेच मूर्तीमंत स्वरूप असल्याची अनुभूती साधकांना आली. साधकांच्या भक्तीपूर्ण सेवेमुळे ब्रह्मोत्सवाचे स्वरूप अत्यंत दैवी आणि परिपूर्ण झाले होते.
कृतज्ञता आणि प्रार्थना
श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झालेला हा दिव्य आणि भव्य ‘ब्रह्मोत्सव’ ‘याची देही, याची डोळा पहाण्याचे’ महत् भाग्य मला लाभले’, याबद्दलची कृतज्ञता शब्दांमध्ये कधीच व्यक्त होऊ शकत नाही. आम्हा साधकांच्या अंत:करणातील शब्दातीत भक्तीभाव श्रीगुरुचरणांवर भावसुमनांजलीच्या रूपाने अर्पण करत आहोत. ‘अशा महान आणि अवतारी ब्रह्मांडगुरूंचे कृपाशीर्वाद आम्हा साधकांना सतत मिळत राहू दे आणि आमच्या मनुष्यजन्माचे सार्थक होऊ दे’, हीच श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३)
तिन्ही मोक्षगुरूंनी साधकांवर टाकलेल्या कृपाळू दृष्टीक्षेपाच्या सामर्थ्याने साधकांचे समस्त ताप, संताप, पाप, विघ्ने, पीडा, कष्ट आणि दैन्य दूर झाले !जेव्हा रथ मैदानात फिरत होता, तेव्हा त्यामध्ये आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीदेवी अन् श्रीभूदेवी स्वरूप सद्गुरूद्वयी यांची कृपाळू दृष्टी साधकांवर पडत होती. तेव्हा साधकांचा तिन्ही मोक्षगुरूंप्रतीचा अनन्य कृतज्ञताभाव जागृत होऊन त्यांच्या अंगावर रोमांच येत होते आणि काही जणांचा स्वर गदगद होत होता. अशा प्रकारे तिन्ही मोक्षगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन लाभल्याने अनेक साधकांचा अष्टसात्त्विकभाव (स्वेद (घाम), स्तंभ (कुंठित होणे, थांबणे, थक्क होणे), रोमांच, स्वरभंग (स्वर गदगदणे), कंप, वैवर्ण्य (वर्ण, रंग पालटणे), अश्रू आणि मूर्च्छा.) जागृत झाले होते. तिन्ही मोक्षगुरूंनी साधकांवर टाकलेल्या कृपाळू दृष्टीक्षेपाच्या सामर्थ्याने साधकांचे समस्त ताप, संताप, पाप, विघ्ने, पीडा, कष्ट आणि दैन्य दूर झाले. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३) |
साधक अन् साधिका यांच्या रूपात ‘गंधर्व, यक्ष, किन्नर आणि अप्सरा हे ब्रह्मोत्सवात सहभागी झाले आहेत’, असे जाणवणेदिव्य रथाच्या पुढे आणि मागे चालणार्या टाळ अन् ध्वज पथकांतील साधक आणि साधिका यांच्या ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ आणि ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारि’ या गाण्याच्या धूनवर झालेल्या भावपूर्ण अन् लयबद्ध हालचालींमुळे त्यांच्या हृदयातून तालबद्ध वायूमय अन् नादमय सात्त्विक लहरी सभोवती पसरल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भावलहरींनी भारित होऊन त्यांना पहाणार्या साधकांची मने भावलहरींनी पुलकित झाली. तेव्हा साधक आणि साधिका यांच्या ठिकाणी ‘गंधर्व, यक्ष, किन्नर अन् अप्सरा हे श्रीमन्नारायण, श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या ब्रह्मोत्सवात सहभागी होऊन त्यांच्या समोर कृतज्ञताभावाने सेवा सादर करत आहेत’, असे जाणवले. |
|