सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांनी केले त्यांचे भावपूर्ण औक्षण !

रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांनी १६ मे या दिवशी त्यांचे भावपूर्ण औक्षण केले. प.पू. आपटेआजी या ८५ वर्षांच्या आहेत. वयोमानानुसार त्यांना प्रवास आदी गोष्टी झेपत नाहीत; मात्र तरीही ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन घेऊन त्यांचे औक्षण करता यावे’, या ओढीने त्या म्हापसा येथून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चाकाच्या आसंदीत (wheelchair) आल्या. ‘देव भावाचा भुकेला असतो’, याची प्रचीती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि प.पू. आपटेआजी यांच्या भेटीच्या वेळी आली. प.पू. आजींनी परात्पर गुरुदेवांचे औक्षण केल्यावर त्यांच्या चरणी पुष्प अर्पण केले आणि वाकून त्यांच्या चरणांना हात लावून नमस्कार केला. प.पू. आपटेआजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापेक्षा ४ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यांनी मोठ्या बहिणीच्या नात्याने सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांना ओवाळले. या वेळी ‘साक्षात् भगवंतच भेटला’ असा भाव प.पू. आपटेआजी यांच्या मुखावर दिसत होता.  या वेळी प.पू. आपटेआजी यांच्या सून सौ. प्रणिता आपटे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हार, शाल, श्रीफळ आणि धोतर अर्पण केले, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ओटी भरली.