भारताची फाळणी ही चूक असल्याचे पाकिस्तानीही मान्य करत आहेत ! –  प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत

प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत

भोपाळ (मध्यप्रदेश) – भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी कृत्रिम आहे. पाकिस्तानातील लोकांना आता वाटते की, फाळणी ही चूक होती, असेे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले आहे. येथील सिंधी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उपस्थित होते. त्यांनी ‘मध्यप्रदेशच्या शालेय पुस्तकांत सिंधी महापुरुषांचा इतिहास शिकवला जाईल. सम्राट दाहिर सेन, हेमू कालाणी यांचा जीवनक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल’, अशी घोषणा केली.

सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे

१. आम्हाला नवा भारत उभारायचा आहे. भारत खंडित झाला आहे. आमच्यासमवेत त्या (पाकिस्तानशी) भूमीशी नाते कायम राहील. आम्ही सिंधु संस्कृती विसरू शकत नाही. सिंधु नदीचे सूक्त वेदांमध्ये आहे. हे नाते आम्ही तोडू शकत नाही. आम्ही सिंध प्रदेशाला विसरणार नाही; कारण ही फाळणी कृत्रिम आहे. आज आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो, तिथले लोक म्हणत आहेत की, चूक झाली. ते मान्य करतात. ते त्यांच्या हट्टीपणामुळे भारतापासून वेगळे झाले. संस्कृतीपासून वेगळे झाले. ते सुखी आहेत का ?

२. भारतासमवेत रहाण्यासाठी येथे जे तेथून (पाकिस्तानमधून) आले, त्यांनी पुरुषार्थाने स्वतःला उभे केले. अखंड भारत सत्य आहे. खंडित भारत दुःस्वप्न आहे. तिथे पुन्हा भारताला वसवावे लागेल. पुन्हा वेळ आल्यास तुम्ही तिथे भारत वसवू शकता. यासाठी पहिली आवश्यकता आहे की, सर्वस्व त्यागासाठी त्या काळच्या समाजाची जी सिद्धता होती, ती लक्षात घेणे. सिंधला न विसरणे म्हणजेच नव्या पिढीला तिथे जोडावे लागेल, यासाठी समाजाने एकत्र यायला हवे.