प्रतियुनिट २ रुपये ५५ पैसे या दराने वीज महागणार
पुणे – राज्यातील विजेचे दर देशामध्ये सर्वाधिक असतांनाही, ‘महावितरण’ने पुढील २ वर्षांसाठी ३७ टक्के, म्हणजेच सरासरी २ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट दरवाढीची याचिका प्रस्तावित केली आहे. या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून लवकरच निर्णय अपेक्षित असून १ एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
‘महावितरण’ने २६ जानेवारी या दिवशी ३७ टक्के वीजदरवाढीची फेरआढावा याचिका राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केली आहे.
२०१९-२० ते २०२४-२५ या ६ वर्षांतील ६७ सहस्र ६४४ कोटी रुपयांच्या महसुली तुटीच्या भरपाईची मागणी महावितरणकडून करण्यात आली आहे. त्याकरता सध्याच्या वीजदरात २०२३-२४ आणि २०२४-२५ या २ वर्षांसाठी अनुमाने १४ आणि ११ टक्के अशी दरवाढ आयोगाकडे केली आहे; मात्र प्रत्यक्षात ही दरवाढ ३७ टक्के असून या दरवाढीच्या प्रमाणात ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ रकमेचाही भार वीज ग्राहकांवर पडणार असल्याचे वीज ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे.
‘महावितरण’च्या या दरवाढीवर वीज ग्राहकांकडून हरकती, सूचना मागितल्या होत्या. त्यात पुण्यासह नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ५ शहरांमध्ये याचिकेवर ‘ऑनलाईन’ सुनावणी घेतली. त्यामध्ये वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.