ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खलिस्तानाठी करण्यात आलेल्या मतदानाचा फज्जा !

१०० लोकांनीच केले मतदान !

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – येथे १९ मार्च या दिवशी खलिस्तानसाठी ‘जनमत संग्रह २०२०’ (शिखांसाठी स्वतंत्र देश बनवण्यासाठी मतदान घेणे) नावाने मतदान घेण्यात आले; मात्र यात केवळ १०० शिखांनीच मतदान केल्याचे समोर आले आहे. यातून ऑस्ट्रेलियात रहाणार्‍या शिखांनी फुटीरतावाद्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या जनमत संग्रहाची काही छायाचित्रे प्रसारित झाली असून त्यात किरकोळ लोकच मतदानाच्या ठिकाणी दिसून येत आहेत. सामाजिक माध्यमांतून भारतीय लोक शिखांना धन्यवाद देत आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रकार अपयशी ठरला, असे सांगण्यात येत आहे. ज्यांनी जनमत संग्रहामध्ये मतदान केले, त्यांचे भारतीय पारपत्र रहित करण्याची आणि त्यांना पुन्हा भारतात येऊ न देण्याचीही मागणी केली जात आहे.

बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेकडून या जनमत संग्रहाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी २९ जानेवारीला मेलबर्न येथेही मतदान घेण्यात आले होते. तेव्हा याला विरोध करणार्‍या भारतियांवर आक्रमण करण्यात आले होते.