नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने करण्याच्या पद्धती आणि ‘वचनां’संबंधी अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. ४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘काही स्त्रीलिंगी आणि काही नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने कशी करावीत ?’, याची माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील सूत्रे पाहू.

(लेखांक १७ – भाग ४)

३. नामांच्या वचनांमध्ये पालट करतांना लक्षात ठेवायचे नियम

(टीप : या विषयातील ‘३ अ’ ते ‘३ औ’ ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांत देण्यात आली आहेत.)

३ अं. ऊ-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारांत होणे : ‘पाखरू’ हे ऊ-कारांत नाम आहे; कारण त्याच्या ‘रू’ या शेवटच्या अक्षरामध्ये ‘ऊ’ हा स्वर अंतर्भूत आहे. आपण ‘ते पाखरू’, असे म्हणतो. यानुसार हे नाम नपुंसकलिंगी आहे. या ऊ-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘पाखरे’ असे ए-कारांत होते. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३ क. ए-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ई-कारांत होणे : ‘डबके (पाणी साचलेला मोठा खड्डा)’ हे ए-कारांत नाम आहे. आपण ‘ते डबके’ असे म्हणतो. यानुसार ‘डबके’ हे नपुंसकलिंगी नाम आहे. या ए-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘डबकी’ असे ई-कारांत होते. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३ क १. वरील ‘३ क’ या नियमाला अपवाद असणारे शब्द : सोने, रूपे, तांबे, शिसे इत्यादी धातूवाचक शब्द.

४. वचनांशी संबंधित अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

४ अ. ‘एखादी गोष्ट पुष्कळ प्रमाणात आहे’, हे सांगतांना संबंधित गोष्टीचे नाव अनेकवचनी वापरण्याऐवजी एकवचनीच वापरणे : ‘श्री. देवधर यांनी विविध क्षेत्रांत पुष्कळ कार्य केले आहे’, या वाक्यात ‘…पुष्कळ कार्ये केली आहेत’, असे ‘कार्य’ या शब्दाचे अनेकवचन करणे शक्य आहे; परंतु भाषेत तसे केले जात नाही. श्री. देवधर यांच्या कार्याचा फार मोठा आवाका दर्शवण्यासाठी ‘कार्य’ हा शब्द एकवचनी वापरण्यात येतो आणि ‘…पुष्कळ कार्य केले आहे’, अशी वाक्यरचना सिद्ध होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. जहागीरदारांकडे भरपूर पैसा आहे.

२. या वर्षी जिल्ह्यात पुष्कळ जोंधळा पिकला.

४ आ. एखाद्या समुहाविषयी सांगण्यासाठी त्या समुहातील घटकांचा उल्लेख नसणारा स्वतंत्र एकवचनी शब्द वापरणे : ‘थवा’ या शब्दाचा अर्थ ‘एकाच जातीचे अनेक पक्षी एकत्र असणे’, असा आहे. येथे पक्षी अनेक असले, तरी त्या सर्वांच्या एकत्रित समुहाला उद्देशून ‘थवा’ हा एकवचनी शब्द वापरला आहे. अशा कशाचातरी समूह असल्याचे दर्शवणार्‍या एकवचनी शब्दांची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

जोडी, चौकोन, दशक, वर्ग, सैन्य इत्यादी.

४ आ १. समूह दर्शवणार्‍या एकवचनी शब्दाचे अनेकवचन करणे : ‘आकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे उडत होते’, या वाक्यामध्ये ‘थवा’ या एकवचनी शब्दाचे ‘थवे’ हे अनेकवचनाचे रूप वापरण्यात आले आहे. अशा प्रकारे मुळात समूहदर्शक असणार्‍या एकवचनी शब्दांचीही अनेकवचने होतात.

सूत्र क्र. ‘४ आ’मध्ये दिलेल्या उदाहरणांत ‘दशक’ हा शब्द देण्यात आला आहे. ‘दशक’ म्हणजे ‘दहांचा समुदाय’. हा शब्द वापरून ‘आम्हाला शाळा सोडून दशक उलटले आहे’, असे वाक्य लिहिल्यास ‘…दहा वर्षे उलटली आहेत’, हे लक्षात येते. मात्र दहाऐवजी ‘चाळीस वर्षे उलटली आहेत’, असे म्हणायचे असेल आणि ‘दशक’ हाच शब्द वापरायचा असेल, तर ‘आम्हाला शाळा सोडून चार दशके उलटली आहेत’, असे लिहिले जाते. या ठिकाणीही मुळात अनेकत्वसूचक असलेल्या ‘दशक’ या एकवचनी शब्दाचे ‘दशके’ असे अनेकवचन झाले आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

जोडी – जोड्या, पंधरवडा – पंधरवडे, टोळी – टोळ्या, झुंड (जमाव) – झुंडी, रास – राशी इत्यादी.

४ इ. व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्यासाठी बहुवचनाचा वापर करणे : आपल्या मनात ज्या व्यक्तींविषयी आदर असतो, त्यांचा उल्लेख आपण एकेरी, म्हणजेच एकवचनी न करता बहुवचनी (अनेकवचनी) करतो. याला ‘आदरार्थी बहुवचन’ असे म्हणतात. ‘बाबा आज उशिरा येणार आहेत’, या वाक्यात आपण ‘बाबा’ या एकाच व्यक्तीविषयी बोलत आहोत; परंतु बाबांविषयी आपल्या मनात आदर असल्यामुळे आपण ‘बाबा…येणार आहेत’, अशी बहुवचनी वाक्यरचना केली आहे. ‘बाबा…येणार आहे’, असा एकेरी किंवा एकवचनी उल्लेख केलेला नाही. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. वझेकाकांच्या घरी भागवत सप्ताह चालू आहे.

२. गगनभाऊ रानातील औषधी वनस्पती बरोबर शोधून काढतात.

३. घाटेकाकू रव्याचे लाडू छान करतात.

४. पंतांना गाण्याची फार आवड होती.

५. रावसाहेब प्रत्येक वस्तू उत्तम प्रतीचीच घेतात.

४ ई. नेहमी अनेकवचनीच वापरली जाणारी काही नामे : ‘घामोळे (उष्णतेमुळे अंगावर उठणारे पुरळ)’ हा शब्द ‘घामोळी’ या शब्दाचे अनेकवचन आहे. हा शब्द सदैव अनेकवचनी वापरला जातो. ‘उष्णतेमुळे शरिराच्या विविध भागांवर घामोळे आले’, असे म्हटले जाते. ‘एक घामोळी आली’, असे म्हटले जात नाही. अशा प्रकारे हा शब्द अनेकवचनीच वापरला जातो. यासारखे आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

डोहाळे, कांजिण्या, रोमांच, कष्ट इत्यादी.’ (समाप्त)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२३)