समाजवादी पक्षाने माफियांचे पोषण केले; मात्र आम्ही माफियांना नष्ट करू ! – योगी आदित्यनाथ

‘वारसा असल्यामुळे सत्ता मिळू शकते; मात्र बुद्धी मिळू शकत नाही’, असा टोमणाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना मारला

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आम्ही माफियांच्या विरोधात आहोत. आम्ही त्यांना नष्ट करू. आम्ही कोणत्याही माफियाला सोडणार नाही. समाजवादी पक्ष माफियांचा पोषणकर्ता आहे. राजू पाल हत्येतील आरोपी असणार्‍या आतिक अहमद याला समाजवादी पक्षानेच आमदार बनवून आश्रय दिला, असा थेट प्रहार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या विधानसभेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर केला. २४ फेब्रुवारी या दिवशी राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. ‘वारसा असल्यामुळे सत्ता मिळू शकते; मात्र बुद्धी मिळू शकत नाही’, असा टोमणाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना मारला.

१. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता आरोप केला की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की, तुम्ही तुमच्या वडिलांचा मान ठेवू शकला नाहीत.

२. यावर अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. त्यावरून काही वेळ सभागृहामध्ये गोंधळ झाला. विधानसभेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्यावर कामकाज पुन्हा सुरळीत चालू झाले.

हिंदूंच्या ग्रंथांप्रमाणे अन्य धर्मियांच्या ग्रंथांचा अवमान झाला असता, तर… !

‘श्रीरामचरितमानस’ या ग्रंथांने हिंदूंना अनेक शतकांपासून एकत्र ठेवले आहे. आज त्याचा अवमान होत आहे. जर अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा अवमान झाला असता, तर काय झाले असते, याची कल्पना करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला गर्व असला पाहिजे की, हा ग्रंथ उत्तरप्रदेशातील भूमीवर लिहिण्यात आला आहे.