घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१. शिकायला  मिळालेली सूत्रे

कृषी विचार 

कोरफड
अळू

१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून घरच्‍या घरी नैसर्गिक शेती करण्‍याची माहिती मिळाल्‍यावर त्‍याविषयीचा आत्‍मविश्‍वास वाढणे आणि घरापुढील भूमीत ‘नागवेल, अळू’ इत्‍यादी औषधी वनस्‍पती लावणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध होेणार्‍या लेखमालेतून घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवण्‍यासाठी शास्‍त्रोक्‍त माहिती मिळाल्‍याने ‘त्‍याविषयी नेमकेपणाने कसे प्रयत्न करायचे ?’, याची माहिती मला मिळाली. ‘ह्यूमस’ (नैसर्गिक पदार्थांचे विघटन होऊन बनणारी सुपीक माती) सिद्ध करणे; जीवामृत, बीजामृत आणि नैसर्गिक घटक वापरून कीटकनाशक सिद्ध करणे अन् त्‍यांचा वापर’, यांविषयी समजल्‍यानंतर माझा ‘आपणही या गोष्‍टी प्रतिदिनच्‍या नियोजनात सहज करू शकतो’, हा आत्‍मविश्‍वास वाढला. डिसेंबर २०२१ मध्‍ये मी घराच्‍या आगाशीत वाफा सिद्ध केला. ओला आणि सुका कचरा कुजून त्‍याचे छान ‘ह्यूमस’ सिद्ध झाले होते. मी घरापुढील भूमीमध्‍ये नागवेल, अळू, गूळवेल, अशा औषधी वनस्‍पती लावल्‍या.

१ आ. लागवडीची सेवा करण्‍यासाठी ६ वर्षांच्‍या भाचीने साहाय्‍य करणे : ‘गोशाळेतून शेण आणि गोमूत्र आणण्‍यासाठी सकाळी लवकर उठून जाणे, जीवामृत आणि बीजामृत बनवणे’, अशा सर्व गोष्‍टी करण्‍यास माझी भाची मला साहाय्‍य करते. मी गोशाळेत गायी आणि वासरे यांंच्‍यासाठी गूळ अन् हरभर्‍याची डाळ घेऊन जाते.

१ इ. जीवामृताचा वापर केल्‍याने गुलाबाच्‍या रोपाला चांगली फुले येणे : एका रोपवाटिकेत मला एक गुलाबाचे रोप मिळाले. मी ते घरी आणून लावले. जीवामृत घातल्‍याने त्‍याला नंतर छान फुले आली. ती पाहून जीवामृताचे महत्त्व आमच्‍या लक्षात आले.

१ ई. झाडावर गोमूत्र फवारल्‍यावर त्‍यावरील कीड नष्‍ट होणे : माझ्‍या घरी केशरी रंगाच्‍या जास्‍वंदीचे एक झाड आहे. त्‍या झाडाला ‘मिलीबग (मावा)’ ही कीड लागली होती. त्‍या वेळी मी जास्‍वंदीच्‍या झाडावर गोमूत्र फवारल्‍याने ती कीड न्‍यून झाली.

१ उ. घनजीवामृत सिद्ध करून त्‍याचा वापर केल्‍यावर कलिंगड, पावट्याच्‍या शेंगा आणि मिरच्‍या यांचे पीक चांगल्‍या प्रकारे येणे : जून मासामध्‍ये सलग १५ दिवस पाऊस पडल्‍याने मी आगाशीत रोपांची स्‍थिती पहाण्‍यासाठी गेले. त्‍या वेळी कलिंगड, मिरची आणि पावट्याची छोटी छोटी रोपे आली होती. ती पाहून मला पुष्‍कळ आनंद झाला आणि माझ्‍या मनाची सकारात्‍मकताही वाढली. त्‍यानंतर मी घनजीवामृत सिद्ध करून त्‍याचा वापर करू लागले. साधारण सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये कलिंगडाच्‍या वेलाला चेंडूच्‍या आकाराचे कलिंगड लागले होते. मला वाटले, ‘अवेळी असल्‍याने ते कदाचित् चांगले नसेल.’ प्रत्‍यक्षात ते कलिंगड चवीला पुष्‍कळ गोड होते. ५ जणांना २ वेळेला पुरतील, एवढ्या पावट्याच्‍या शेंगा आल्‍या होत्‍या आणि मिरचीच्‍या रोपालाही छान मिरच्‍या लागल्‍या होत्‍या. त्‍यांमध्‍ये ‘बेडगी’ मिरच्‍यांचीही रोपे छान आली होती. ‘या सगळ्‍या प्रक्रियेतून मला पुष्‍कळ आनंद मिळतो’, हे माझ्‍या लक्षात आले.

२. आलेल्‍या अनुभूती

अधिवक्त्या प्रीती पाटील

२ अ. कडक उन्‍हाळ्‍यात रोपांना वेळेत पाणी न मिळाल्‍याने ती सुकणे, त्‍यांची क्षमायाचना करून पाणी घालू लागल्‍यावर झेंडूच्‍या रोपाला पुष्‍कळ फुले येणे आणि ते पाहून मन प्रसन्‍न होणे : काही कारणाने मला आगाशीतील लागवडीकडे वेळ देता येत नव्‍हता. त्‍यामुळे मी लावलेला मका आणि बटाटा सुकून गेला. त्‍याच कालावधीत मिरची आणि पावटा यांच्‍या बिया रुजायला घातल्‍या होत्‍या; पण त्‍याही रुजल्‍या नाहीत. उन्‍हाळ्‍यात घातलेल्‍या कलिंगडाच्‍या बियाही रुजल्‍या नव्‍हत्‍या. त्‍या वेळी मला थोडे वाईट वाटले. कडक उन्‍हाळ्‍यात रोपांना वेळेत पाणी न मिळाल्‍याने ती सुकली. मी त्‍यांची क्षमायाचना करून त्‍यांना पाणी घालू लागले. नंतर झेंडूला पुष्‍कळ फुले आलेली पाहून माझे मन प्रसन्‍न झाले.

२ आ. कढीपत्त्याच्‍या झाडाशी बोलल्‍यावर देवाच्‍या कृपेने कढीपत्त्याचे ‘बी’ मिळणे आणि रोपे करायची प्रक्रिया लक्षात येणे : माझ्‍या घरी देशी कढीपत्त्याचे झाड आहे; पण ‘त्‍याच्‍या बियांपासून रोप कसे वाढवायचे ?’, हे मला ठाऊक नव्‍हते किंवा माझे तसे यापूर्वी निरीक्षण झाले नव्‍हते. मी रोपवाटिकेतून काही रोपे आणली होती. ‘रोपवाटिकेतून रोप आणून लावण्‍यापेक्षा बियांपासून लागवड करणे अधिक योग्‍य असते. यामध्‍ये रोपांची मुळे दुखावली जात नाहीत, रोप चांगले येते आणि रोपांची मुळे पाण्‍याचा स्रोत शोधतात’, हे सूत्र समजल्‍यानंतर ‘कढीपत्त्याच्‍या बिया कशा मिळणार ?’, असा विचार माझ्‍या मनात आला; कारण माझ्‍या घराच्‍या खाली कढीपत्त्याची अनेक रोपे उगवलेली असायची. माझ्‍या खोलीतील खिडकीतून कढीपत्त्याचे झाड दिसायचे. मी त्‍या झाडाला सांगत असे, ‘तुझ्‍या बिया कशा मिळवायच्‍या ? ते तूच मला सांग.’ साधारण जून-जुलैमध्‍ये मी त्‍या कढीपत्त्याच्‍या रोपाला फुले आलेली पाहिली. नंतर तेथे लहान लहान फळे आली. त्‍याच कालावधीत माझ्‍या बहिणीची मुलगी आली होती. तिने ती फळे काढली आणि मला म्‍हणाली, ‘‘ही फळे आंबट-गोड छान लागतात.’’ तिने मला त्‍यातील ‘बी’ दाखवले. त्‍या क्षणी मला गुरुमाऊलींप्रती (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती) पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. मी माझ्‍या मनातील विचार केवळ त्‍यांनाच सांगत होते. त्‍यांनीच मला माझ्‍या भाचीच्‍या माध्‍यमातून ‘कढीपत्त्याचे ‘बी’ कसे मिळवायचे ?’, ते सांगितले. त्‍यामुळे माझा लागवडीची सेवा करण्‍याचा उत्‍साह अधिक वाढला.

आता वांग्‍याच्‍या रोपालाही छान वांगी येतात. लिंबाच्‍या झाडालाही पुष्‍कळ लिंबे लागली आहेत. घरातच या गोष्‍टी सहज उपलब्‍ध होतात आणि मला त्‍याचा आनंदही घेता येतो. अंगणातील आंबा, चिकू आणि फुलझाडे यांच्‍याकडे पाहिल्‍यावर बाहेरून येणार्‍यांना चांगले वाटते.

कलियुगातील या रज-तमयुक्‍त वातावरणात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी लागवडीच्‍या माध्‍यमातून घराच्‍या सभोवतालचे वातावरण चैतन्‍यदायी केले, याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील, सांगली (१२.११.२०२२)


घरच्‍या घरी नैसर्गिक शेती करण्‍याने होणारे लाभ

‘मी आमच्‍या घराच्‍या आगाशीत भेंडी, वांगी, चेरी, टोमॅटो आणि वांगी लावले आहेत; तसेच ‘नागवेल, अळू, गूळवेल’, अशा औषधी वनस्‍पतीही लावल्‍या आहेत. त्‍यांचा उपयोग आपल्‍याला नित्‍याच्‍या वापरात होतो.

१. लोणी कढवतांना त्‍यात नागवेलीचे पान घातल्‍यास ‘कोलेस्‍टेरॉल’ न वाढणे

माझी आई लोणी कढवतांना त्‍यात नागवेलीचे एक पान घालते. ‘या तुपाच्‍या सेवनाने ‘कोलेस्‍टेरॉल’ वाढत नाही’, असे मला कुणीतरी सांगितले. पूर्वी तूप कढवण्‍यासाठी आईला बाजारातून पान विकत आणावे लागायचे; परंतु आता ते घरातच सहज उपलब्‍ध होते.

२. अळूच्‍या भाजीने ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य नियंत्रणात येणे

एकदा मी वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांना विचारले, ‘‘सध्‍या ‘थायरॉईड’ ग्रंथीशी संबंधित आजारांचे प्रमाण का वाढत आहे ?’’ त्‍या वेळी त्‍यांनी सांगितले, ‘‘पूर्वी प्रत्‍येकाच्‍या घरात अळू लावलेला असायचा. त्‍याची भाजी किंवा वडी करून खाल्ले जायचे. अळू ही भाजी ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य नियंत्रणात ठेवते. सध्‍या अळू खाण्‍याचे प्रमाणच न्‍यून झाल्‍याने हा त्रास वाढला आहे. अळूचे महत्त्व समजल्‍याने मी घरी अळूची लागवड केली. आता आमच्‍या घरात अळूची भाजी अनेकदा केली जाते.

३. मोदक उकडण्‍यासाठी हळदीची पाने उपयुक्‍त असणे

मी अंगणात हळदीचीही लागवड केली आहे. शेजारच्‍या काकूंना गणेशचतुर्थीच्‍या कालावधीत उकडीचे मोदक उकडण्‍यासाठी हळदीच्‍या पानांची आवश्‍यकता होती. त्‍यांना पेठेत हळदीची पाने मिळाली नाहीत. तेव्‍हा मी हळदीची पाने दिल्‍यानंतर त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. त्‍या वेळी माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील, सांगली (१२.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक