यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !

  • रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे यांची स्पष्टोक्ती

  • चुकीच्या माहितीवरून ग्रामपंचायतीला अपकीर्त न करण्याचे आवाहन

वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंतगडाच्या तटबंदीला लागून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाला रेडी ग्रामपंचायतीने कोणतीही अनुमती दिलेली नाही, तसेच हे बांधकाम थांबवावे, अशी नोटीस संबंधितांना दिली आहे, अशी माहिती रेडीचे सरपंच रामसिंग राणे यांनी दिली.

सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले की,

१. यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे. गडावर होणारे विविध उपक्रम, शिवजयंती उत्सव यांमध्ये शिवप्रेमींसह रेडी ग्रामपंचायतही सहभागी होते. त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.

(सौजन्य : Kokan Now)

 २. ३० मार्च २०२२ या दिवशी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत या बांधकामाविषयीचा अर्ज आला होता. त्या वेळी बांधकामाविषयी तक्रार असल्यामुळे येथे अगोदर संरक्षक भिंत बांधून द्यावी आणि संबंधित अर्ज पुढील बैठकीत सर्व वैध कागदपत्रे असल्यास निर्णय घेण्यासाठी ठेवावा, असा ठराव झाला होता; पण पुढील बैठकीत हा विषय आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायीतने कोणतीही अनुमती दिली नाही.

३. काहीजण ग्रामपंचायतीला हेतूपुरस्सर अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बांधकामाविषयी पुरातत्व विभागाद्वारे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.