संपादकीय : छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या !

भारतीय सैन्याने पूर्व लडाख येथील चीनजवळच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा सीमेवरील पँगाँग तलावाच्या किनार्‍यावर म्हणजे समुद्रसपाटीपासून १४ सहस्र ३०० फूट उंचीवर उभारण्यात आला आहे. प्रत्येक शिवप्रेमीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हा पुतळा भारत-चीन सीमेवर उभारल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. चीनच्या भारतविरोधी कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनला भारताची अधिकाधिक भूमी बळकावून विस्तार करायचा आहे. त्यासह भारताच्या शत्रूंशी हातमिळवणी करून तो भारताला जेरीस आणत आहे. त्यामुळेच तो पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आदी भारताच्या शेजारी देशांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करतांना दिसतो, तसेच तो या देशांना स्वतःच्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न करतो. याचा परिणाम असा झाला आहे की, हे शेजारी देश भारताला डोळे वटारून दाखवत आहेत. चीन हा भारतापेक्षा कैकपटींनी युद्धसज्ज आहे. त्यासह तो कावेबाज आणि उद्दामही आहे. स्वतः शक्तीशाली असल्याने ‘जगातील कुठला देश आमचे काहीही वाकडे करू शकत नाही’, अशा तोर्‍यात चिनी राजकारणी वावरत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातही मोगल आणि अन्य मुसलमान आक्रमणकर्ते यांना अशाच प्रकारे गर्व चढला होता; मात्र छत्रपतींनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने या मुसलमान आक्रमणकर्त्यांच्या नाकावर टिच्चून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

चीनच्या विरोधात लढतांना भारतीय सैनिकांनी हाच आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे. डोकलाममध्ये जो संघर्ष झाला, त्या वेळी भारतीय सैनिकांनी अतुलनीय साहस दाखवून चिनी सैनिकांना पाणी पाजले. भारतीय सैनिकांकडे चिनी सैनिकांएवढी साधन-सुविधा उपलब्ध नसेलही; मात्र जेव्हा शौर्य आणि पराक्रम गाजवण्याची वेळ येते, तेव्हा जगात भारतीय सैनिकांचा हात कुणीही धरू शकत नाही. युद्धामध्ये शक्ती नव्हे, तर युक्ती आणि देवावरील भक्ती कामी येते, हे छत्रपतींच्या चरित्रातून आपल्याला ठायी ठायी दिसून येते. त्यामुळेच ते मोगल आक्रमकांना नामोहरम करू शकले. या पार्श्वभूमीवर लडाखसारख्या ठिकाणी कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांना छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याची प्रेरणा देत राहील.