(म्हणे) ‘लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी माध्यम स्वातंत्र्य आवश्यक !’ – नेड प्राईस, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते

अमेरिकेने ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटावरील भूमिकेवरून मारली कोलांटउडी !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते नेड प्राईस

वॉशिंग्टन (अमेरिका) – बीबीसी न्यूजने पंतप्रधान मोदी आणि गुजरात दंगल यांविषयी बनवलेल्या माहितीपटावर केंदशासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. त्यावरून भारतात काही ठिकाणी वादही झाला आहे. या माहितीपटाविषयी अमेरिकेने २ दिवसांत तिची भूमिका पालटली आहे. ‘आम्ही नेहमीच माध्यम स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे, ते आम्ही यापुढेही करत राहू. लोकशाहीतील माध्यमस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मावनाधिकाराचे महत्त्व आम्हाला ठाऊक आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी ते आवश्यक आहे. आम्ही भारतासह जगभरात हे सूत्र मांडले आहे’, असे वक्तव्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केले आहे.

२ दिवस आधी पत्रकार परिषदेत नेड प्राईस यांनी या माहितीपटाविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर म्हटले होते, ‘मला त्याविषयी काही ठाऊक नाही. मला केवळ अमेरिका आणि भारत या २ देशांतील संबंध भक्कम करण्यासाठी असलेल्या सामायिक मूल्यांची जाणीव आहे. भारतात जे काही घडत आहे, त्याविषयी आम्हाला चिंता आहे. आम्ही वेळोवेळी याविषयी आवाज उठवला आहे.’

संपादकीय भूमिका 

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी माध्यमांना स्वातंत्र्य हवे, हे कुणीही नाकारणार नाही; मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली खोटारडेपणा, हिंदुद्वेष आणि भारतद्वेष यांचा कंड कुणी सातत्याने शमवून घेत असेल, तर त्याच्यावर कठोर उपाय केलाच पाहिजे !