कुंकवाच्या आडून !

‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो !’ या पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्यावरून पुरो(अधो)गाम्यांचा गदारोळ !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी नुकतेच मंत्रालयात गेले होते. त्या वेळी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या महिला पत्रकाराला त्यांनी ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे सांगितले. यावरून सर्व पुरो(अधो)गाम्यांनी पू. भिडेगुरुजी यांनी महिलांचा अपमान केल्याची आवई उठवली. कुंकू लावणे, हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. ‘कुंकू लावायला सांगितले म्हणून जर महिलेचा अपमान होतो’, असे या मंडळींना वाटत असेल, तर ‘इस्लाममध्ये ‘तलाक’ दिलेल्या महिलेला पुन्हा पतीसमवेत नांदायचे असेल, तर तिला परपुरुषासमवेत शरीरसंबंध ठेवावे लागतात’, ही त्या महिलेची केवढी मोठी मानहानी आहे. या ‘हलाला’ पद्धतीविषयी या मंडळींनी रान उठवायला नको का ? चारचौघांत नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी स्वत:चा चेहराही झाकून रहावे लागते, अशा बुरखा पद्धतीमध्ये महिलांचे स्वातंत्र्य दडपले जाते, त्याला तरी या मंडळींनी प्राणपणाने विरोध करायला हवा होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पू. भिडेगुरुजी यांना नोटीस पाठवली. अशी नोटीस चाकणकर यांनी कधीतरी ‘हलाला’ करणार्‍या धर्मांधांना किंवा तसे करण्यास भाग पाडणार्‍या मौलवींना पाठवली होती का ? असे झाले असते, तर या मंडळींना महिलांच्या मानसन्मानाविषयी थोडीशी तरी चाड आहे, असे म्हणता आले असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर याविषयी हिंदु धर्माला प्रतिगामी ठरवणारी कविताच सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केली. प्रश्न हिंदु धर्माचा असेल, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’; पण इस्लाम असेल, तर मात्र ‘धार्मिक अधिकार’, हेच का यांचे पुरोगामित्व ? पू. भिडेगुरुजींवर तुटून पडणार्‍या या मंडळींना महिलांच्या मानसन्मानाची चाड असती, तर त्यांनी धर्मावरून असा भेदभाव केला नसता.

एका घोटाळ्याच्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका नेत्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेशी दूरभाषवरून बोलतांना असभ्य शब्दांचा प्रयोग केला. हा ऑडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला. त्या वेळी या पुरोगामी मंडळींपैकी एकालाही ‘त्या महिलेचा अपमान झाला’, असे का वाटले नाही ? महाराष्ट्रात लव्ह जिहादमध्ये अडकत असलेल्या हिंदु युवतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धर्मांध हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करतात, नंतर अत्याचार करत धर्मांतर करण्यासाठी दबाव आणतात. असे होत असतांना याविषयी एकही पुरोगामी आवाज का उठवत  नाही ? महिलांच्या मानसन्मानाचा सोयीनुसार उपयोग करणारी ही मंडळीच खर्‍या अर्थाने स्त्रियांचा अपमान करत आहेत. महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. उच्चभ्रू महिला उघडपणे धूम्रपान करतात. अशा वेळी भारतीय संस्कृती काय आहे ? याचे धडे महिला आयोगाने द्यायला नको का ? महिला आयोगाने राजामाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाईयांचा आदर्श महिलांपुढे ठेवला असता, तर त्यांच्या मानसन्मानाला हात लावण्याचे कुणाचेही धारिष्ट्य झाले नसते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘माझ्या नातीला विवाह न करताही आई व्हायचे असेल, तर मला त्याचे काही वाटणार नाही’, असे वक्तव्य केले. ‘ते चुकीचे आहे’, हेही सांगण्याचे धारिष्ट्य महिला आयोग दाखवत नाही; कारण काय तर त्या पुरोगामी आहेत ? व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलायचे का ? स्वत:चा चंगळवाद शमवायला या पुरोगामी मंडळींना भारतीय संस्कृतीचा अडथळा वाटतो. त्यामुळे ‘हलाला’, ‘बुरखा’ याचे वावडे न वाटणार्‍या मंडळींना मात्र मंगळसूत्र, कुंकू यांचे वावडे वाटते. कुंकू, मंगळसूत्र यांना ‘जोखड’ म्हणायचे आणि ‘हलाला’विषयी गप्प बसायचे, हे यांचे दुटप्पी धोरण !

स्वैराचारी पुरोगामी मंडळी !

भारतीय संस्कृतीमधील कुटुंबव्यवस्थेत पती-पत्नी यांनी आयुष्यभर एकमेकांशी एकनिष्ठ रहाणे, हे व्रतच आहे. असे व्रत पेलवणे स्वैराचारी मंडळींना कसे शक्य होणार ? स्वैराचार करण्याचा एक कुमार्ग या अधोगामी मंडळींना सापडला आहे, तो म्हणजे ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’. त्याच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी तंग कपडे घालून फिरणे, स्वत:ची अर्धनग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे, सार्वजनिक ठिकाणी व्यभिचार करणे आदी योग्य आणि याला चुकीचे ठरवणार्‍यांना प्रतिगामी ठरवता येते.

पू. भिडेगुरुजी यांनी अथक परिश्रमाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना उभी केली आहे. सहस्रावधी युवकांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेम वृद्धींगत केले आहे. या संघटनेत सहभागी झालेल्या शेकडो युवकांनी व्यसन सोडून दिले आहे. एवढ्या वयातही एखाद्या तपस्वीप्रमाणे ते युवकांसह त्यांच्या कुटुंबाला सुसंस्कारित करत आहेत. याविषयी एखादी ओळही प्रसारित करायची नाही; मात्र त्यांना अडचणीत आणण्याचा, त्यांची अपकीर्ती करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा, ही कसली पत्रकारिता ? पू. भिडेगुरुजी यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात; मात्र राष्ट्रकार्य करणार्‍या एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातील मतीतार्थ न समजता विडा उचलल्याप्रमाणे केवळ त्यांची अपकीर्ती करणे, हे पत्रकारितेत कितपत योग्य ? चूक ते चूक म्हणून दाखवणारी आणि समाजाला योग्य काय ? याची दिशा देणारी पत्रकारिता असायला हवी. प्रश्न केवळ टिकली आणि कुंकू यांचा नाही, तर नीतीमत्तेचा आहे. भारतीय संस्कृती कधीही प्रतिगामी आणि अवैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित नाही; परंतु विज्ञानवाद अन् पुरोगामित्व यांच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन देणे योग्य नाही. जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणा पत्रकार, खासदार किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची आवश्यकता भासणार नाही.

कुंकू लावायला सांगितल्याने महिलांचा अपमान झाल्याची ओरड करणारे ‘हलाला’विषयी गप्प रहातात, हा पुरो(अधो)गाम्यांचा हिंदुद्वेष होय !