गीतोपदेशाची ‘जिहाद’शी तुलना : अतार्किक आणि काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता अधिक !

काँग्रेसमध्ये स्वतःच्या कुकर्मांनीच कलंकित म्हणून कारकीर्द गाजवलेले देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी एका कार्यक्रमात ‘श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतून ‘जिहाद’ सांगितला’, असे अत्यंत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे ‘सुंभ जळाला, तरी पीळ सुटत नाही’, या उक्तीनुसारच पाटील यांची हिंदुद्वेषाची मळमळही अशीच उफाळून आली.

४८ वर्षांची राजकीय कारकीर्द, त्यातही ३० वर्षे संसद सदस्य म्हणून गाठीशी असलेला प्रदीर्घ अनुभव, देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल यांसारखी अत्यंत महत्त्वाची पदे भूषवलेल्या नेत्याला ‘धर्मज्ञानाची प्राथमिक समज असावी’, ही तर किमान अपेक्षा; पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर या सर्वाला अपवादच ठरावे. याचे कारण त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या गीतोपदेशाला थेट ‘जिहाद’ची उपमा देऊन त्यांनी आपल्या अज्ञानाचे नव्हे, तर अधर्माचेच काँग्रेसदर्शन पुनःश्च घडवले. एवढ्यावरही न थांबता वयोमानापरत्वे ‘आपली जीभ सैल झाली’, हे मान्य करायचे सोडून ‘माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला’, असे पालूपद जोडून ते पुढे मोकळेही झाले. ‘मी काही चुकीचे बोललो नाही, तर माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, अशीही मल्लीनाथी त्यांनी जोडली.

 १. शिवराज पाटील यांच्या बोलण्यातून त्यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे आणि ते हिंदुद्वेष्टे पढतमूर्ख असल्याचे दिसून येणे

त्यातच भगवद्गीता आणि कुराण यांची अशी असंबद्ध तुलना केल्यानंतरही आपण ‘बायबल’पासून अगदी सगळे धर्मग्रंथ वाचल्याचा चाकूरकर यांचा फुकाचा आत्मविश्वास तर अधिकच बुचकळ्यात टाकणारा. त्यामुळे चाकूरकरांना ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का ?’, हा प्रश्न विचारण्यापेक्षाही चाकूरकरांचे डोके निश्चितच ठिकाणावर नाही, हेच त्यांच्या वायफळ बोलण्यातून विनासायास सिद्ध होते. जरा का त्यांनी भगवद्गीता, कुराण, बायबल आणि इतरही धर्मग्रंथ नुसते वाचले नसते, तर ते खोलात जाऊन समजून घेतले असते. त्यांनी त्यातील ज्ञान, उपदेश सर्वार्थाने आत्मसात् केले असते, तर आज त्यांच्या मुखातून अशी बरळवाणी बाहेर पडली नसती.

म्हणूनच समर्थ रामदासस्वामी म्हणतात तसे –

‘समूळ ग्रंथ पहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥’ (दासबोध, दशक ९, समास १०, ओवी ३)

अशीच लक्षणे या हिंदुद्वेष्ट्या पढतमूर्ख चाकूरकरांची व्यथा अन् कथा !

२. पाटील यांची मुलाखत घेणार्‍या पत्रकारांनी गीतेमध्ये जिहादची शिकवण नसल्यावरून कोणताही प्रश्न न विचारणे

शिवराज पाटील-चाकूरकर काय म्हणाले ? त्याचे चर्वितचर्वण इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही अगदी चवीने केले, तर समाजमाध्यमांवर मात्र त्यांना टीकेच्या चाबकाचेच चांगले फटकेही बसले. या सर्वानंतर चाकूरकरांची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या एकाही पत्रकाराला त्यांना त्यांनी तोडलेल्या या अकलेच्या तार्‍याविषयी एक साधा प्रतिप्रश्नही विचारावासा वाटला नाही. तो म्हणजे ‘कुराणातील जिहाद हा इतर धर्मांना, त्यांच्या मूर्ती प्रथेला, परंपरेला म्हणजेच काफिरांना नष्ट करा’, असा विनाशकारी उपदेश देतो, तर दुसरीकडे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने कुठेही ‘इतर धर्मांचेच समूळ उच्चाटन करा, त्यांचे अस्तित्वच या पृथ्वीतलावरून संपवून टाका’, असा अणूमात्रही उल्लेख नाही.

३. गीतेतील धर्मयुद्ध आणि कुराणमधील ‘जिहाद’ची संकल्पना यांचा संबंध जोडणे म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्याचेच लक्षण !

उलट श्रीकृष्णाने ‘धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे’ (धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो) हा उपदेश सांगत धर्मजागरणाचाच दैवी संदेश दिला. असे असतांना ‘गीतेतील धर्मयुद्ध आणि कुराणमधील ‘जिहाद’ची संकल्पना यांचा दुरान्वयेही संबंध नसून उगाच तो ओढून ताणून जोडणार्‍या चाकूरकरांची बुद्धी आणखीनच भ्रष्ट झाली’, असेच म्हणावे लागेल. चाकूरकर म्हणतात तसे सगळ्या धर्मग्रंथांत युद्ध आहेत; पण या प्रत्येक धर्मग्रंथातील युद्धांचे उद्देश, त्यामागील पार्श्वभूमी, संदर्भ आणि धर्महित यांचे आकलन चाकूरकरांच्या अल्पबुद्धीलाही कधी झालेले दिसत नाही. म्हणूनच पाश्चात्त्यांच्या बुद्धीभ्रमानुसार जिहाद म्हणजे युद्ध आणि गीतेतील महाभारताचे युद्ध अशी अत्यंत बालीश टीका करण्याचे दु:साहस त्यांच्या अल्पमतीने केले असावे.

४. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतरही शिवराज पाटील यांनी पाकविरोधात कोणतीही कारवाई न केल्याने त्यांना गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागणे

तसे बघितले, तर शिवराज पाटलांसह हिंदु धर्म, पूजा-परंपरा यांना शिव्या देण्याची काँग्रेसची रित तशी जुनीच. चाकूरकरही त्याच हिंदुविरोधी परंपरेचे पाईक. रामाचे, रामसेतूचे अस्तित्व नाकारण्यापासून ते राममंदिराला विरोध करण्यापर्यंत काँग्रेसने हिंदूंच्या भावभावनांशी खेळण्याची एकही संधी दवडली नाही. मणीशंकर अय्यर, दिग्विजय सिंह यांसारख्यांच्या टोळीतीलच एक म्हणून शिवराज पाटीलही तितकेच कुप्रसिद्ध. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी हेच शिवराज पाटील देशाच्या गृहमंत्रीपदावर होते. हे आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर पाकिस्तानवर ठोस कारवाई तर सोडाच; पण ते यासंबंधीच्या बैठकांसाठीही साधे वेळेवर पोचू शकले नाहीत. नंतर एकाच दिवशी झालेल्या ५ बैठकांमध्येही त्यांनी ५ वेळा पोशाख पालटले आणि तेच मात्र चर्चेचा विषय ठरले. त्यावरून ते टीकेचे धनी ठरले आणि शेवटी गृहमंत्रीपदावरून त्यांना पायउतार व्हावेच लागले.

५. काँग्रेसच्या वरिष्ठांना संतुष्ट करण्यासाठी पाटील यांनी कायमच हिंदुविरोधी विधाने करणे

असा निष्क्रियतेचा शिक्का माथी असल्यानंतरही ‘२६/११’च्या आक्रमणानंतर ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’ या नावांनी षड्यंत्र उभारणीत शिवराज पाटील यांनीही ‘हात’भार लावलाच. त्यामुळे सोनिया गांधींचे निकटवर्तीय असलेल्या पाटील यांनी कायमच त्यांच्या हायकमांडला खूश ठेवण्यासाठी अशी हिंदुविरोधी विधाने आणि भूमिका घेतल्याचे वेळोवेळी दिसून येते. आताही ज्या गीतेवर हात ठेवून शिवराज पाटील यांनी आजवर घटनात्मक पदांची शपथ घेतली, त्याच गीतेविषयी असा बुद्धीभेद करतांना त्यांची जीभ जराही आखडली नाही, याचेच सखेद आश्चर्य वाटते. ऐन दिवाळीच्या तोंडावर हिंदु सण-उत्सवांना अशा प्रकारे लक्ष्य करण्याची एक नवीन पद्धतच सध्या काँग्रेसवाले आणि पुरोगामी यांच्यामध्ये प्रचलित झालेले दिसते. त्याचेच हे आणखीन एक नामुष्कीजनक उदाहरण.

६. शिवराज पाटील यांनी लांगूलचालनासाठी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हिंदू काँग्रेसला जागा दाखवून देतील !

खरेतर अशी हिंदुविरोधी सनसनाटी वक्तव्ये करून मुसलमान मतपेढीला खूश करून लांगूलचालनाचे काँग्रेसचे हे उद्योग जुनेच. शिवराज पाटील यांनी केलेले विधानही त्याच मालिकेचा एक भाग म्हणता येईल; कारण आगामी हिमाचल प्रदेश, गुजरातच्या निवडणुकांमध्ये मुसलमान मतपेढीने आम आदमी पक्षापेक्षा काँग्रेसच्या पारड्यात मतदान करावे; म्हणून हिंदू, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवीदेवता यांना मुद्दाम लक्ष्य करण्याचाच हा करंटेपणा. असे असले, तरी वर्ष २०१४ पासून या देशातील हिंदू अधिक जागरूक आणि सजग झाला आहे. त्यामुळे शिवराज पाटील यांनी गीतोपदेशाची थेट ‘जिहाद’शी केलेली अतार्किक तुलना बुमरँगसारखी उलटण्याचीच शक्यता अधिक ! कारण ‘जय श्रीकृष्ण’ने स्वागत होणार्‍या गुजरातमध्ये श्रीकृष्णाचा असा अवमान आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा ‘हात’ त्यांच्याच घशात घातल्याखेरीज रहाणार नाही हे निश्चित !

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, २१.१०.२०२२)