‘सार्वजनिक न्यासाचे प्रशासन चालवत असतांना ‘बदल अर्ज’ प्रविष्ट (दाखल) करणे, ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ‘महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम’चे कलम १८ नुसार न्यासाची नोंदणी झाल्यानंतर त्या न्यासासंबंधीच्या नोंदी कलम १७ नुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयात ठेवल्या जातात. त्या नोंदींपैकी कोणत्याही नोंदीमध्ये पालट झाल्यास कलम २२ नुसार ‘बदल अर्ज’ प्रविष्ट करणे बंधनकारक असते. हा अर्ज पालट झालेल्या विहित नमुन्यात प्रविष्ट करावा लागतो. हा नमुना अनुसूची ३ मध्ये दिलेला आहे. हा अर्ज पालट झालेल्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत प्रविष्ट करावा लागतो. काही कारणांमुळे विहित मुदतीत ‘बदल अर्ज’ प्रविष्ट करता आला नाही, तर त्या अर्जासमवेत ‘विलंब माफीचा अर्ज’ सादर करणे आवश्यक असते. ‘बदल अर्ज’ प्रविष्ट करणे, हे विश्वस्तांचे उत्तरदायित्व असते.
१. ‘बदल अर्ज’ प्रविष्ट करण्याची कारणे
अ. विश्वस्तांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्या न्यासाच्या नियमावलीप्रमाणे नवीन विश्वस्तांची नेमणूक केली किंवा पूर्वीच्याच विश्वस्तांची फेरनिवड केली, तर पूर्वीच्या विश्वस्तांचे नाव वगळून नवीन विश्वस्तांच्या नावाची नोंद वहीमध्ये घेण्यासाठी किंवा फेरनिवड झालेल्या विश्वस्तांचा कालावधी वाढवण्यात आल्याची नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करावा लागतो.
आ. एखाद्या विश्वस्तांचा मृत्यू झाला किंवा एखाद्या विश्वस्ताला धर्मादाय आयुक्त यांनी कलम ४१(३) नुसार बडतर्फ केले अथवा कलम ४७ मध्ये दिलेल्या कारणावरून कमी केले आणि त्या जागी नवीन विश्वस्तांची नेमणूक केली, तर या पालटाची नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करणे क्रमप्राप्त असते.
इ. विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची अनुमती घेऊन न्यासाची स्थावर मिळकत विक्री केली, भाड्याने दिली, बक्षीस दिली किंवा अदलाबदल केली, तर त्याची नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करणे बंधनकारक आहे.
ई. विश्वस्तांनी न्यासाचे नावे स्थावर मिळकत खरेदी केली, तर त्याची नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करावा लागतो.
उ. मंदिरामध्ये भाविकांकडून देवाला अर्पण केलेले सोने, चांदी, हिरे, मौल्यवान धातू याची ही नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ प्रविष्ट करावा लागतो.
ऊ. न्यासाच्या नियमावलीमध्ये दुरुस्ती केली किंवा नवीन नियमावली केली, तर त्याची नोंद ‘परिशिष्ट १’मध्ये घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करणे, ही एक प्रक्रिया आहे.
ए. न्यासाच्या मिळकतीवर बोजा असेल, तर त्याची ही नोंद घेण्यासाठी ‘बदल अर्ज’ सादर करावा लागतो.
२. ‘बदल अर्ज’ कसा सादर करावा ? आणि त्याची पुढील प्रक्रिया
अ. न्यासामध्ये झालेला पालट जर अचल संपत्तीच्या संदर्भातील असेल, तर त्या अर्जासमवेत त्या मिळकतीचे वर्णन विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक असते. त्यावर विश्वस्तांची किंवा विश्वस्तांनी या कामासाठी नियुक्ती केलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी असणे आवश्यक असते.
आ. बदल अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची सत्यता पडताळून पहाण्यासाठी साहाय्यक / उपधर्मादाय आयुक्त त्या संदर्भात चौकशी करू शकतात.
इ. प्रविष्ट झालेला ‘बदल अर्ज’ विश्वस्तांची नावे आणि पत्ते पालटण्यासंबंधीचा असेल किंवा ‘विश्वस्त पालटण्याची रित’ यामधील पालटासंबधीचा असेल, तर तो ‘बदल अर्ज’ तात्पुरत्या स्वरूपात मान्य करण्याचे अधिकार साहाय्यक / उपधर्मादाय आयुक्त यांना आहेत. त्यानंतर ते ‘त्या ‘बदल अर्जा’संदर्भात कुणाचा आक्षेप असेल, तर प्रविष्ट करावा’, या संदर्भात नोटीस काढू शकतात.
ई. नोटीस प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत कुणाचा आक्षेप आला नाही, तर तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेला ‘बदल अर्ज’ अंतिमतः संमत होतो. विहित मुदतीत आक्षेप आला, तर साहाय्यक / उपधर्मादाय आयुक्त नियमाप्रमाणे चौकशी करतात आणि अर्ज संमत किंवा असंमत करतात.
उ. ‘बदल अर्ज’ संमत किंवा असंमत झालेल्या आदेशामुळे नाराज (अप्रसन्न झाल्यास) असतील, तर संबधित विश्वस्त / हितसंबंधी व्यक्ती सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील प्रविष्ट करू शकतात. यासाठी ६० दिवसांची मुदत असते.’
– श्री. दिलीप मा. देशमुख, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त, पुणे. (१५.१२.२०२४)