पाश्‍चिमात्य देशांनी अनेक दशके भारताला शस्त्रपुरवठा केला नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – रशियाकडून भारताच्या शस्त्र खरेदीचे समर्थन करतांनाच पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करणार्‍या पाश्‍चिमात्य देशांना भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी चांगलेच खडसावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री वेनी वोंग यांच्यासमवेत १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने जयशंकर यांंना ‘रशिया-युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून होणारी शस्त्रास्त्र खरेदी अल्प करणार का ?’ आणि ‘रशियासमवेतच्या संबंधांसंदर्भात फेरविचार करणार का ?’, असा प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘भारत आणि रशिया यांच्यात प्रदीर्घ काळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते निश्‍चितपणे भारताच्या हिताचेच आहेत. आमच्याकडे सोव्हिएत रशियाच्या काळातील, तसेच रशियानिर्मित शस्त्रास्त्रांचे प्रमाण अधिक आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे अनेक पाश्‍चिमात्य देशांनी दशकानुदशके भारताला शस्त्रास्त्र पुरवठा केला नाही. उलट त्यांनी आमच्यापेक्षा हुकूमशहांनाच सहकारी बनवले.’’

या वेळी जयशंकर यांचा रोख थेट पाकिस्तानवर होता. पाकिस्तान अस्तित्वात येऊन ७५ वर्षे उलटली असून त्या ठिकाणी बहुतांश काळ लष्करशाहीच राहिली आहे.