९ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ !
मुंबई – हलाल प्रमाणपत्रातून येणारा पैसा देशविघातक कामांसाठी वापरला जात असल्याची दाट शक्यता आहे. हे केवळ हिंदुत्वावरील नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट आहे. यातून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हलाल सक्तीच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हलाल सक्तीविरोधी परिषद आयोजित करण्यात आली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विजय जंगम यांनी वरील आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय खाटिक समाजाचे राष्ट्रीय महासचिव श्री. विवेक घोलप, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी उपस्थित होते. समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी प्रस्तावना केली.
या वेळी डॉ. विजय जंगम म्हणाले, ‘‘हलाल आता केवळ मांसापुरते मर्यादित नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी अनेक उत्पादनेही ‘हलाल’ प्रमाणित असावीत, यासाठी हिंदु व्यावसायिकांना हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. या खासगी संस्थांना अशा प्रकारे ‘हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे का ? याविषयी अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. देशाची अर्थव्यवस्था कोणत्याही एका पंथाच्या हातात जाऊ नये. हलालचे जाळे भविष्यात संपूर्ण देशात पसरायला वेळ लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो की, अशा गोष्टींवर तात्काळ बंदी घालावी. याविषयीची भीषणता जाणून घेण्यासाठी सर्व देशबांधवांना मी विनंती करतो, की, त्यांनी हलाल सक्तीविरोधी परिषदेला उपस्थित रहावे.’’
परिषदेचे होणार ‘थेट प्रक्षेपण’ !या परिषदेचे ‘Facebook.com/SavarkarSmarak’ आणि ‘Facebook.com/JagoHinduMumbai1’ या लिंकवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याविषयीची अधिक माहिती 8080208958 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. |
परिषदेला पुढील मान्यवर उपस्थित रहाणार !या परिषदेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. विजय सोनकर शास्त्रीजी, वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, पितांबरी उद्योगसमूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन अन् वसई (मेधे) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला इत्यादी उपस्थित रहातील. |