सातारा येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण’ !

(‘सी.पी.आर्.’ – ‘कार्डिओ पल्मोनरी रेसुसीटेशन’ म्हणजेच हृदय आणि फुफ्फुस यांचे कार्य चालू करणे)

प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना भूलतज्ञ डॉ. समीर विजय सोहनी

सातारा – येथील कोरेगाव रस्त्यावरील वेदभवन मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्‍या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘अखिल भारतीय भूल शास्त्रज्ञ संघटने’च्या सातारा शाखेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी लिमये, सचिव डॉ. वैशाली चव्हाण, भूलतज्ञ डॉ. समीर विजय सोहनी यांनी हे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा ७० जणांनी लाभ घेतला.

कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचा सौ. रूपा महाडिक यांनी परिचय करून दिला. या वेळी सौ. भक्ती डाफळे आणि श्री. हेमंत सोनवणे यांनी मान्यवरांचा पुष्प, श्रीफळ अन् ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.

या वेळी डॉ. माधुरी लिमये म्हणाल्या, ‘‘जीवन संजीवनी प्रशिक्षण म्हणजेच हृदय आणि श्वास बंद पडल्यावर केले जाणारे प्रथमोपचार ! हे प्रथमोपचार असल्यामुळे यासाठी कुठलीही शैक्षणिक पात्रता, उपकरणे यांची आवश्यकता नाही. केवळ कुणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असली पाहिजे.’’

या वेळी डॉ. वैशाली चव्हाण यांनी ‘प्रशिक्षण देतांना कशा पद्धतीने रुग्णांना हाताळायचे ?’ आणि ‘कशी सावधगिरी बाळगायची ?’, यांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. समीर विजय सोहनी यांनी प्रत्यक्ष करायची कृती ‘डमी’वर (बाहुल्याच्या स्वरूपातील निर्जिव मनुष्यावर) करून दाखवली, तसेच त्या वेळी कोणती काळजी घ्यावी ? याविषयीही माहिती सांगितली. यानंतर प्रशिक्षणार्थींकडून ‘सी.पी.आर्.’ आणि आपत्कालीन उपचार यांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.