|
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – बांदावासियांनी विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या आस्थापनाच्या विरोधात गेले वर्षभर केलेले ‘त्याग’ आंदोलन अभिनंदनीय आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येकाला आपल्या देवता आणि धर्म यांविषयी अभिमान असलाच पाहिजे. व्यवसाय वृद्धीसाठी हिंदु देवतांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास ते खपवून घेणार नाही. हिंदूंचा सहिष्णुता हा गुण असला, तरी सहिष्णु किती असावे यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान करणार्या आस्थापनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवून सार्वजनिकरित्या क्षमा मागायला लावणार, अशी ग्वाही भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बांदा येथे दिली.
कापूर बनवणार्या एका आस्थापनाने प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान करणारे विज्ञापन प्रसिद्ध केले होते. याच्या निषेधार्थ बांदा शहरातील व्यापार्यांनी संबंधित आस्थापनाचा कापूर विकण्याचे बंद केले आहे. शहरातील सर्व देवस्थान समित्यांनीही मंदिरात तो कापूर वापरण्याचे बंद केले आहे. वर्षभर चाललेल्या या आंदोलनाचे प्रणेते येथील व्यापारी, श्री विठ्ठल मंदिराचे सेवक तथा पत्रकार आशुतोष भांगले यांनी सामाजिक माध्यमांतून राजकीय पक्षांना याविषयी आवाहन केले होते. याची नोंद घेत बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी आंदोलनाची माहिती दिल्यानंतर आमदार राणे यांनी बांदावासियांचे कौतुक करत प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार २७ सप्टेंबर या दिवशी बांदा येथील संत सोहिरोबानाथ मठात आमदार राणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी आमदार राणे यांनी धर्मरक्षणाच्या दृष्टीने मांडलेली सूत्रे . . .
१. हिंदु धर्माच्या व्यतिरिक्त अन्य धर्मांतील देवतांचा विज्ञापनांमध्ये उल्लेख करण्याची हिंमत कुणीही करत नाही. हे सर्व प्रयोग आपल्याच हिंदु धर्मावर केले जातात. स्वत:च्या धर्माचे रक्षण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हिंदु समाज जागृत होत नाही, हिंदू संघटित होत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे; मात्र बांदावासीय याला अपवाद ठरले आहेत.
२. बांदावासियांचा ‘कापूर त्याग’ आंदोलनाचा विषय लहान कि मोठा हे महत्त्वाचे नाही. त्यांनी दाखवलेला कडवटपणा प्रशंसनीय आहे.
३. संबंधित आस्थापनाला प्रभु श्रीरामचंद्रांची सार्वजनिकरित्या क्षमा मागायला भाग पाडू. त्याचे सर्व दायित्व तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्हाला अपेक्षित अशी कारवाई नक्कीच होईल.
या वेळी ‘त्याग’ आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व देवस्थान समिती प्रमुखांचे आमदार राणे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत श्री. आशुतोष भांगले यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली.
मी हिंदु धर्माला न्याय देणारा आमदार निश्चितच आहे !देशात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. मी हिंदु धर्माला न्याय देणारा आमदार निश्चितच आहे. देवतांचा अवमान करणार्या गोष्टी खपवून घेणार नाही. देवतांचा अवमान करणार्या संबंधित कापूर आस्थापनाची माहिती घेण्याचे काम चालू केले आहे, असे आमदार राणे यांनी या वेळी सांगितले. |
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांच्यासह बांद्यातील नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.