‘जग काय म्हणेल ?’, या विचाराने भारत गेल्या ७ दशकांहून अधिक काळ गांधीवादी भूमिका घेत आत्मघात करत आला होता; मात्र देशात मोदी सरकार आल्यापासून यात काही प्रमाणात पालट होत असल्याचे दिसू लागले आहे. जागतिक स्तरावर भारत आता ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याच्या भूमिकेत दिसू लागला आहे, हे एक चांगले लक्षण आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करणे हे नैतिकतेच्या दृष्टीने अयोग्य असते; मात्र जेव्हा देशाचा प्रश्न असतो किंवा अधर्माच्या विरोधात उभे रहायचे असते, तेव्हा असे वागावेच लागते. तो राजधर्मच असतो. आता या राजधर्माचे पालन भारत करत आहे, ही एक सकारात्मक गोष्ट मानायला हवी. हे दर्शवणारी घटना म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला काही वर्षांपूर्वी एफ्-१६ ही अमेरिकी बनावटीची लढाऊ विमाने दिली आहेत. त्या विमानांचे आता नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज संमत केले आहे. याला भारताने विरोध केला आहे. मुळात जेव्हा अमेरिकेने सर्वप्रथम पाकला ही विमाने दिली होती, तेव्हाही भारताने त्याला विरोध केला होता; मात्र त्या वेळची आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळी होती. तेव्हा अमेरिकेच्या लेखी भारताला किंमत नव्हती; मात्र आताची आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळी आहे. अमेरिका आता भारताला दुखावू शकत नाही. तसे केले, तर त्याला तोटा सहन करावा लागणार आहे. हा तोटा आर्थिक नसून धोरणात्मक असणार आहे. त्यामुळे युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी अमेरिका, तसेच युरोपीय देश यांनी रशियावर निर्बंध घातले असतांनाही भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यास चालू केले. यावर अमेरिकेने विरोध करण्याचे टाळत ‘भारत त्याच्या मित्रांशी संबंध ठेवण्यास मोकळा आहे’, असे म्हटले होते; मात्र या वेळेस ‘अमेरिकेने पाकला एफ्-१६ साठी पॅकेज देण्याची घोषणा करून चुकीचे का केले ?’, हे कोडेच आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे, ‘या विमानांचा वापर आतंकवाद्यांच्या विरोधात करण्यात येणार आहे.’ वास्तविक अमेरिकेला पाक या विमानांचा वापर कुणाविरुद्ध करणार ? हे स्पष्ट ठाऊक असल्याने अशा प्रकारचा निर्णय घेणे संपूर्णतः अयोग्य असतांना तो घेतला गेला आहे आणि यावरच भारताने बोट ठेवले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावतांना ‘एकीकडे ‘आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत’, असे सांगितले असले, तरी दुसरीकडे एफ्-१६ सारखी लढाऊ विमाने कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत ? हे आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे.
अशा गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवू शकत नाही. अमेरिकेची धोरणे सिद्ध करणार्यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत ? हे दाखवून देईन’, असे म्हटले आहे. अमेरिकेला थेट अशा शब्दांत ठणकावायची ही भारताची तरी पहिलीच घटना असेल, असेच म्हणावे लागेल; मात्र इथपर्यंत न थांबता पाकला देण्यात येणारे हे साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज रहित करण्यास अमेरिकेला भाग पाडण्यासाठी अमेरिकेचे नाक दाबणे आवश्यक आहे आणि ते कसे दाबायला हवे ? हे जयशंकर यांना ठाऊक आहे, असे येथे नमूद करावेसे वाटते. भविष्यात तसे झाले, तर आश्चर्य वाटू नये.
शस्त्रे परिणामकारक वापरण्याची क्षमता हवी !
पाकला देण्यात आलेली ही एफ्-१६ विमाने भारताच्या विरोधातच वापरली जाणार आहेत, हे स्पष्ट आहे. वर्ष २०१९ मध्ये भारताने पाकमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राईक’ नंतर पाकने भारतावर हवाई आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याने याच एफ्-१६ विमानांचा वापर केला होता आणि यातील एक विमान भारताच्या ‘मिग’ लढाऊ विमानाने म्हणजे वैमानिक अभिनंदन यांनी पाठलाग करून पाडले होते; मात्र पाकने ‘असे विमान पडलेच नाही’, असा कांगावा केला होता. अमेरिकेनेही अशा प्रकारचे विमान पाडण्यात आल्याच्या घटनेला दुजोरा दिला नव्हता. तसा दुजोरा दिला गेला असता, तर ‘मिग’सारख्या जुन्या पिढीचे विमानही अमेरिकेच्या अत्याधुनिक विमानाला पाडू शकते’, अशी अमेरिकेची नाचक्की झाली असती. याच कारणामुळे ‘पुढेसुद्धा ही नाचक्की होऊ नये; म्हणून अमेरिका आता पाककडे असलेल्या विमानांचे नूतनीकरण करू पहात आहे’, असे म्हणावे लागेल. अमेरिकेने असा कितीही प्रयत्न केला, तरी भारताचे सैन्यदल अशा विमानांना धडा शिकवेल, यात शंका नाही. वर्ष १९६५ च्या युद्धाच्या वेळी पाकने अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न या त्या वेळच्या अत्याधुनिक रणगाड्यांचा वापर केला होता; मात्र भारताने त्यांची दाणादाण उडवली होती, हा इतिहास सर्वश्रुत आहे.
‘पाक’ नावाचा प्रश्न कायमचा सोडवावा !
जयशंकर यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले असले, तरी पाकची समस्या सोडवणेही आवश्यक झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्थिती पालटल्यामुळे अमेरिका पूर्वीप्रमाणे पाकला आर्थिक किंवा सैनिकी साहाय्य करत नसली, तरी पाक नावाची डोकेदुखी भारतासाठी कायम आहे. ती घालवण्यासाठी भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यूहरचना करणे आवश्यक आहे. कदाचित् मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने तशी व्यूहरचना केलीही असू शकते, हे नाकारता येणार नाही; मात्र त्याचे परिणाम दिसून येणेही आवश्यक आहे. पाकमध्ये पूर आल्यानंतर भारताने आतापर्यंतचा इतिहास पहाता पहिल्यांदाच त्याला कोणत्याही प्रकारचे साहाय्य केलेले नाही. पाकच्या एका मंत्र्याने भारताने साहाय्य करण्याविषयी विधानही केले होते, तसेच मोदी यांनीही ट्वीट करून पूरग्रस्तांविषयी संवेदनाही व्यक्त केल्या होत्या; मात्र त्यापुढे जाऊन भारताने काहीही केले नाही. हे योग्यच झाले. जे पूर्वीच होणे आवश्यक होते, ते आता होऊ लागले आहे, ही चांगली गोष्ट असली, तरी आता निर्णायक स्थितीला जाणे आवश्यक आहे. पाक कधीही दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आता शेवटचा प्रहार करण्याची स्थिती निर्माण होत आहे. ही संधी भारताने साधावी आणि पाक नावाचा प्रश्न कायमचा सोडवावा !
भारताने अमेरिकेला सुनावणे, ही भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या शक्तीचे दर्शक ! |