भिवंडी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार !
ठाणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) – ‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल टुरिझम’पर्यंत हे वाढत चालले आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून इस्लामी संघटना आर्थिकदृष्ट्या पुष्कळ सक्षम होत आहेत. त्यामुळे ‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. त्या वेळी व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या सक्तीविरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार केला. येथील बाजारपेठ परिसरातील भिवंडी व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे बोलत होते.
भिवंडी येथील बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र आळशी आणि विश्व हिंदु परिषदेचे भिवंडी अध्यक्ष श्री. देवराज राका यांनी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार केला. या व्याख्यानाला पुष्कळ व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते.