हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर लादली जात आहे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, केंद्रशासनाचे अधिवक्ता

देहली येथे ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन !

ग्रंथप्रकाशन करताना डावीकडून भाजपचे नेते, तसेच ‘हिंदु इकोसिस्टम’चे श्री. कपिल मिश्रा, ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि केंद्रशासनाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन

नवी देहली, ११ सप्टेंबर (वार्ता.) – येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेल्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे नेते, तसेच ‘हिंदु इकोसिस्टम’चे श्री. कपिल मिश्रा आणि ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘हलाल प्रमाणित पदार्थांचे सेवन आणि वापर करून हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर लादली जात आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्राद्वारे बहुसंख्य समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशा अनेक पदार्थांची माहिती, हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाज आणि भारतीय अर्थव्यवस्था यांवर होणार्‍या विपरीत परिणामांची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाला मिळणार आहे.’’
या वेळी देहलीतील उद्योगपती डॉ. विवेक अग्रवाल, पत्रकार श्री. संदीप देव, इतिहासकार डॉ. रिंकू वढेरा, बालाजी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे संचालक श्री. जगदीश चौधरी आदी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला दोन दशके पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ समितीचे पश्‍चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके यांनी विविध विषयांत समितीला मिळालेल्या यशाविषयी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.

प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवर व इतर

सर्वांनी संघटित होऊन विरोध केला, तर हलाल अर्थव्यवस्था वाढण्यापासून नक्कीच रोखता येईल ! – श्री. रमेश शिंदे

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कुठे वापरला जात आहे, हादेखील आज अन्वेषणाचा विषय आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना हलाल प्रमाणपत्र देणार्‍या जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे. मध्यप्रदेशात जेव्हा ‘इस्कॉन’ने मुलांना शाळांमध्ये माध्यान्ह भोजन देण्यास सांगितल्यावर इस्लाम धर्मियांनी त्यावर बहिष्कार टाकला आणि सांगितले, ‘आम्ही हे अन्न घेणार नाही; कारण ते भगवान जगन्नाथाला अर्पण करून वाटले जाते.’ मग आमच्यावर हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू का लादल्या जात आहेत ? भारत सरकारच्या मांस निर्यात करणार्‍या  संस्थेमध्ये केवळ हलाल मांसच निर्यात करता येते, या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी भारत सरकारशी झालेल्या पत्रव्यवहाराची नोंद घेत या संस्थेने आता ते थांबवले आहे. इस्लाममध्ये ‘हलाल खा’ असे लिहिलेले असेल; पण हलाल विकण्याविषयी लिहिलेले नाही. त्यामुळे आम्हाला हलाल खरेदीसाठी कुणीही बळजोरी करू शकत नाही. आपण सर्वांनी संघटित होऊन विरोध केला, तर हलाल अर्थव्यवस्था वाढण्यापासून नक्कीच रोखता येईल.

स्वत:च्या विरोधात असलेली समांतर अर्थव्यवस्था थांबवणे हा प्रत्येक हिंदूचा मूलभूत अधिकार ! – श्री. कपिल मिश्रा

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे आमच्या खिशातून बलपूर्वक पैसे काढून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. स्वत:च्या विरोधात असलेली समांतर अर्थव्यवस्था थांबवणे हा प्रत्येक हिंदूचा मूलभूत अधिकार आहे. बहुसंख्य समाजाला आर्थिकदृष्ट्या दूर केले पाहिजे, त्याचे कारस्थान या माध्यमातून चालू आहे.

हिंदु राष्ट्राची मागणी चालू ठेवण्याची आवश्यकता ! – श्री. सुरेश चव्हाणके

आज हिंदू समाजावर विविध प्रकारची संकटे आहेत, त्यांतील एक म्हणजे हलाल जिहाद. आज सर्व हिंदूंनी त्यांच्यावर लादल्या जात असलेल्या हलाल प्रमाणपत्राला विरोध करण्याखेरीज हिंदु राष्ट्राची मागणी चालू ठेवण्याची आवश्यकता आहे.